religion:श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद - टी.एन.परदेशी - Rayat Samachar

religion:श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी

रयत समाचार वृत्तसेवा
4 Min Read
65 / 100

साहित्यवार्ता | टी.एन.परदेशी

religion श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद

ऐसे केले या गोपाळे | नाही सोवळे ओवळे ||
काटे केतकीच्या झाडा | आंत जन्मला केवडा ||
फणसाअंगी काटे | आंत अमृताचे साठे ||
नारळ वरूता कठिण | परी अंतरी जीवन ||
शेख महंमद अविंध | त्याचे हृदय गोविंद ||

पंधराव्या – सोळाव्या शतकातील अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा येथील थोर वारकरी संत शेख महंमद यांचा हा अभंग आहे. जातीधर्माने मुस्लिम असणाऱ्या या शेख महंमदाच्या हृदयांतरी गोविंद वसला आहे असे निःसंदिग्धपणे सांगणाऱ्या या संतांचा काळ सन १५६० ते १६५० (अदमासे) आहे. वाहिरा (ता.आष्टी, जि.बीड) हे त्यांचे मूळगाव असून श्रीगोंदा (चांभारगोंदा) ही कर्मभूमी होय.
याकाळात हिंदुस्थानात मोगल सत्ता होती तर अहमदनगरला निजामशाही. शेख महंमद यांनी त्याकाळात हिंदू धर्मशास्त्र, योगशास्त्र आणि वारकऱ्यांचा भक्तीमार्ग अनुसरला हे विशेष होय. त्यांनी स्वतःचा धर्म न सोडता एतद्देशीय संस्कृती व धर्मरिवाज अनुसरले. ते सुफी होते तसेच नाथ, दत्त व वैष्णव संप्रदायांचाही त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांनी अद्वैत तत्वज्ञान अंगीकारले होते.
औरंगजेबाची शेख महंमद यांच्यावर खफा मर्जी झाली होती परंतु शेख महंमद यांचे व्यक्तिमत्त्व एवढे प्रभावी की औरंगजेब त्यांना शरण आला, असे म्हणतात.
छत्रपती शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले हे शेख महंमद यांच्या पहिल्या भेटीतच त्यांचे आध्यात्मिक व यौगिक सामर्थ्य जाणून चुकले व त्यांनी शेख महंमद यांना “तुम्ही आमचे गुरू आहात व आपण तुमचे शिष्य आहोत” असे म्हणून शेख महंमद यांचे शिष्यत्व स्वीकारले. मालोजीराजे भोसले यांनी शेख महंमद यांच्या श्रीगोंदा (जुने नाव – चांभारगोंदा) येथील मठास बारा बिघे जमीन खरेदी करून इनाम लावून दिली तसेच मठाचे बांधकाम करून कोट बांधून दिला. असा चकनामा इतिहासप्रसिद्ध आहे. जेव्हां कधी मालोजीराजे श्रीगोंदा मार्गे प्रवास करत तेव्हा ते शेखबाबांच्या दर्शनास जात असत.
योगसंग्राम हा शेख महंमद यांचा एक महत्वाचा ग्रंथ होय. त्याच्या पंधराव्या प्रसंगाच्या प्रारंभी ते म्हणतात की,

ॐ नमोजी श्रीसद्गुरू चांद बोधले | त्यांनी जानोपंता अंगिकारिले |
जानोबाने एका उपदेशिले | दास्यत्वगुणे ||

यातील जानोपंत म्हणजे देवगिरीचे थोर सत्पुरूष जनार्दनस्वामी, एका म्हणजे संत एकनाथ. या दोघांचे गुरूशिष्याचे नाते सर्वज्ञात आहे. जनार्दनस्वामींचे गुरू कोण तर चांद बोधले ! हेच चांद बोधले शेख महंमद यांचेही गुरू आहेत. म्हणजे संत एकनाथांचे गुरू जनार्दनस्वामी यांचे शेख महंमद हे गुरुबंधू होत !

चांद बोधले : जनार्दन स्वामींना दत्त संप्रदायी मानले जाते. वारकरी संप्रदायात संत ज्ञानेश्वरांचे मूळ नाथपंथात, संत तुकाराम हे चैतन्य संप्रदायी व एकनाथ हे दत्त संप्रदायी असूनही त्यांनी वारकरी संप्रदाय चालवला ही धारणा आहे. मग हे चांद बोधले दत्त संप्रदायी होते का आणि त्यांचे नाव चांद याचे रहस्य काय?
चंद्रगिरीचे चंद्रभट ब्राह्मण हेच चांद बोधले अशी मान्यता आहे. या चंद्रभट यांनी उत्तरायुष्यात सुफी संप्रदाय स्विकारला होता, त्यामुळे त्यांच्या चंद्रभट नावाचे चांद बोधले असे रूपांतर झाले. त्यांचा आध्यात्मिक व यौगिक अधिकार त्याकाळी सर्वमान्य होता.

आता हे त्रैराशिक बघा. चांद बोधले मुस्लिम म्हणावेत तर जनार्दन स्वामी हे ब्राह्मण त्यांचे शिष्य आहेत व चंद्रभट हे ब्राह्मण म्हणावेत तर शेख महंमद हे मुस्लिम त्यांचे शिष्य आहेत !

जनार्दन स्वामी यांनी आपले गुरू चांद बोधले यांचा दर्गा देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी बांधला. येथे वार्षिक संदल उत्सव होत असतो व सध्याही हिंदू व मुस्लिम लोक त्यात समंजसपणे सहभागी होतात. संदलच्या रात्री दर्ग्यात कव्वाली होते तशीच भजनेही गायिली जातात. कबरीच्या एका बाजूस हिंदू तर दुस-या बाजूस मुस्लिम बसलेले असतात. हिंदू कव्वालीचा आनंद घेतात तर मुस्लिम भजनांचा.
योगसंग्राम, पवनविजय, निष्कलंक प्रबोध, साठी संवत्सर, ज्ञानगंगा, मदालसा अशी शेख महंमद यांची ग्रंथसंपदा असून त्यांचे बरेच स्फुट हिंदी आध्यात्मिक काव्य आहे तसेच मराठी अभंग रचनाही आहेत.

चित्र सौजन्य : ह.भ.प.सिध्देश्वर महाराज मेटे

ईपेपरमधील लेख वाचा : शेख महंमद महाराज

हे हि वाचा : नाथसिध्द संप्रदायातील योगपट्ट – विशाल फुटाणे

Share This Article
113 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *