मुंबई | गुरुदत्त वाकदेकर
भारताची २२ वर्षीय युवा नेमबाज मनू भाकर हिने पॅरिस olympic २०२४ मध्ये दोन पदके जिंकून इतिहास रचला आहे. तिने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आणि त्यानंतर मिश्र सांघिक १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत तिने कांस्यपदक जिंकले. मिश्र संघात मनूसोबत सरबजोत सिंग होता. टोकियो ऑलिम्पिक ते पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यापर्यंतचा प्रवास मनूसाठी सोपा नव्हता. या काळात ती नैराश्यातून गेली, पण तिने हिंमत न गमावता कठोर परिश्रम केले आणि आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. टोकियोमधील खराब कामगिरीनंतर ती खेळ सोडण्याच्या विचारात होती, पण देव जेव्हा देतो तेव्हा तो छप्पर फाडतो, असेच काहीसे मनूच्या बाबतीत घडले आहे.
ऑलिम्पिक नेमबाजीत पदक जिंकणारी मनू ही पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. त्याचबरोबर एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली आहे. नॉर्मन प्रिचर्ड यांनी १९००मध्ये असे केले होते, परंतु ते भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीचे होते आणि प्रिचर्ड हे ब्रिटीश वंशाचे ऍथलीट होते. आता मनूने इतकं यश मिळवलं आहे की ती आपली भूतकाळातील सर्व दु:खं विसरली आहे. ऑलिम्पिकमधील नेमबाजीतील सांघिक प्रकारातील भारताचे हे पहिले पदक आहे. यापूर्वी नेमबाजीतील सर्व पदके वैयक्तिक होती. २००४ मध्ये राज्यवर्धन सिंह राठोडने कांस्य, २००८ बीजिंगमध्ये अभिनव बिंद्राने सुवर्ण, २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये गगन नारंगने कांस्य आणि विजय कुमारने रौप्यपदक जिंकले. मनूने या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावले आणि आता सांघिक स्पर्धेतही पदक जिंकले आहे.
मनूला टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरी गाठता आली नाही. पात्रता फेरीदरम्यान तिच्या पिस्तूलमध्ये बिघाड झाल्याचे उघड झाले. शेवटच्या क्षणी तिच्या पिस्तुलाने दगा दिला होता. पात्रता फेरीत मनू ५७५ गुणांसह १२वी राहिली. पिस्तुलमध्ये बिघाड झाल्याने मनूला पाच मिनिटे थांबावे लागले. मनूचे वडील रामकिशन भाकर आणि नॅशनल रायफल असोसिएशनच्या अधिकाऱ्यानेही मनूच्या पिस्तूलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे मान्य केले होते. तेव्हा मनूने पात्रता फेरीत ९८ गुण मिळवले होते. दुसऱ्या फेरीत तिचे पिस्तूल खराब झाले. यानंतर ती टार्गेट सोडून बाहेर आली आणि सुमारे पाच मिनिटांनी तिची पिस्तुल फिक्स झाली. तिने दुसऱ्या फेरीत ९५, तिसऱ्या फेरीत ९४, चौथ्या फेरीत ९५, पाचव्या फेरीत ९८ आणि सहाव्या फेरीत ९५ गुण मिळवले. ती अंतिम फेरी गाठण्यात दोन गुणांनी कमी होती. यानंतर मनू रडताना दिसली. ती भावूक झाली होती.
पण आयुष्य तिथेच संपले नाही. तिने ऑलिम्पिकनंतर महिनाभर शूटिंग सरावही केला नाही. मनू सांगते की, जर तुम्हाला यश मिळाले नाही तर तुम्ही त्याचा विचार सोडू नका. मी पुढेही यश मिळवू शकते हा विश्वास तुम्ही केला पाहिजे. जीवनात तुमचा आनंद तुमच्यासाठी सर्वात महत्वाचा आहे. पराभवानंतरही आनंदी राहण्याची क्षमता तुमच्यात असेल, तर तुम्ही भविष्यातही तो क्षण पुन्हा निर्माण करू शकता. आता मनूने हे खरे असल्याचे सिद्ध केले आहे. तिने तो क्षण पुन्हा निर्माण केला आणि आता तो जगत आहे. तिच्या यशाबद्दल संपूर्ण भारतात आनंद साजरा केला जात आहे.
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा