प्रासंगिक | २७ ऑगस्ट | शरद दारकुंडे
राज्यभरात एकाच आठवड्यात लहान मुलींवर अत्याचाराच्या दहा घटना घडल्या. दिवसेंदिवस Women व लहान मुलींवर अत्याचाराच्या घटनेत वाढ झालेलीच दिसते. बदलापूर येथे झालेल्या बाललैंगिक अत्याचाराची घटना दुर्दैवी व मानवतेला काळिंबा फासणारी आहे. छत्रपतींच्या महाराष्ट्रात अजून किती कोवळ्या कळ्यांवर अत्याचार होताना आपण सर्वजण पाहणार आहात?
बलात्कार या शब्दातूनच एका स्त्रीत्त्वाचं उघडं नागड शरीर समोर उभं राहतं आणि तिच्या ओरबडलेलं शरीर कधी राजकीय पक्षांच्या खुर्चीसाठी, माध्यम आपल्या हेडलाईनसाठी, बातम्या टीआरपीसाठी तर कधी लोकांच्या गप्पांसाठी हा विषय चवीने चघळला जातो.
बाललैंगिक अत्याचार विषयासंदर्भात जसे ज्येष्ठ व मोठ्याने जागरूक होणे गरजेचे आहे. तितकेच मुलांना याबद्दल जागरूक करणे गरजेचे झाले आहे. हाच अतिशय संवेदनशील असणारा विषय पालक, शाळा, महाविद्यालय किती कौशल्याने आपल्या पाल्यांना व विद्यार्थ्यांना समजून सांगतात हे महत्त्वाचे आहे. आज अनेक शाळा महाविद्यालय मधून ‘चांगला स्पर्श, वाईट स्पर्श’ (गुड टच, बॅट टच) याबद्दल कोणतीही जनजागृती होताना दिसत नाही. काही शाळा विद्यालय याला अपवादही असतील परंतु आज पाहिजे तेवढ्या प्रमाणात ‘गुड टच बॅड टच’ विषयी जनजागृती होताना दिसत नाही. ही समाज व्यवस्थेची शोकांतिका मानावी लागेल.
एखाद्या मुलीची छेडछाड झाली बॅड टच’ झाला किंवा लैंगिक अत्याचाराची घटना घडल्यास मुलीला ती मोकळ्यापणाने न घाबरता सांगता येईल अशी वातावरण आज पालक, शिक्षक, शाळा, महाविद्यालय व समाजाने तयार करणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडल्यास त्यांना वैद्यकीय व मानसशास्त्रीय उपचार तातडीने मिळू शकतील. या साऱ्या अपेक्षा सांगायला सोप्या वाटत असल्या तरी त्या पूर्ण करणे तितकेसे सोपे देखील नाही, हेही वास्तव आपण नाकारू शकत नाही.
सावित्रीबाई फुले यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून प्रत्येक शाळेमध्ये राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार १० मार्च २०२२ पासून सखी सावित्री समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र अनेक शाळांमध्ये सखी सावित्री समिती स्थापन केलेलीच दिसत नाही. काही शाळांमध्ये समिती स्थापन झालेले असली तरी ती फक्त कागदोपत्रीच असलेली दिसते. अनेक शाळा या समितीविषयी उदासीन असलेल्या दिसतात. शाळेमध्ये मुलामुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप समतामुलक वातावरण निर्मितीसाठी शाळा केंद्र व तालुकास्तरावर सखी सावित्री समिती स्थापन केली जाते. कोणतेही विद्यार्थी विद्यार्थिनी कोणतेही अत्याचाराला बळी पडणार नाहीत अशी निकोप वातावरण निर्मिती करणे हे या समितीतील महत्त्वाचे तत्त्व आहे. अपवादात्मक परिस्थितीमध्ये अशा अत्याचाराच्या घटना घडल्यास तक्रार दाखल करण्याबाबत लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा पोक्सोनुसार गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे.
लैंगिक शिक्षणाविषयी आज समाजव्यवस्थेत मोकळ्यापणाने बोलले देखील जात नाही. आपल्या शालेय अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षणाविषयी पूर्णपणे मौन बाळगलेले आहे. लैंगिकता व व्यक्तिगत सुरक्षितता या बाबी अभ्यासक्रमात न येण्याचे मूळ कारण समाजाच्या लैंगिकते बाबतच्या अवघडलेपणात आहे. लहान मुलांवर लहान वयात होणाऱ्या लैंगिक अत्याचारांच्या घटना दीर्घकालीन दूरगामी परिणाम करीत असतात. शारीरिक जखमा व होणारी हानी काही काळानंतर भरून निघत असते. मात्र अत्याचारामुळे मनावर होणारी मानसिक भावनिक हानी फार गुंतागुंतीचे असते. ती भरून निघणे फार अवघड असते. बदलापूर मधील शाळेत घडलेल्या बाललैंगिक अत्याचारामुळे मुलीला व त्यांच्या पालकांना सध्या कोणत्या मानसिक यातनांतून व सामाजिक ताण-तणावातून जावे लागत असेल याची कल्पना करणे देखील अवघड आहे.
वेगवेगळ्या देशांमध्ये अशा अत्याचाराच्या घटना घडल्यास त्या देशांमध्ये कठोर शिक्षा करण्याच्या तरतुदी आहेत. दक्षिण कोरियामध्ये बलात्कारी माणसाला गोळ्या मारल्या जातात. चीनमध्ये बलात्कारी माणसाचे गुप्तांग कापले जाते. आखाती देशात बलात्कारी माणसाचे तलवारीने सरळ डोके उडून दिले जाते. इराकमध्ये बलात्कारी माणसाला दगडाने ठेचून मारले जाते. मात्र आपल्याकडे मेणबत्ती पेटवून तिच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना केल्या जातात, कारण कायदा हातात घेता येत नाही.
अलीकडे घराघरात मुलींच्या असुरक्षिततेची भावना निर्माण होताना दिसत आहे. घराबाहेर पडणारी प्रत्येक मुलगी कोणत्या ना कोणत्या नराधमाच्या वासनेचे शिकार ठरू पाहत आहे. तिच्यासोबत पुरेसे आत्मरक्षणाची यंत्रणा नसल्याची जाणीव झाल्यानंतर ही नराधम वासनाधीन झालेली मंडळी आपली वासना क्षमविण्यासाठी बलात्काराचे कृत्य निर्दयी पद्धतीने करत असतात. अशा वासनांध प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी कठोरातील कठोर शिक्षेचाच गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. यासाठी आवश्यक असणारे साक्षी व प्रत्यक्षदर्शीचे पुरावे अधिक भक्कमपणाने कोर्टात कसे सादर करता येतील यासाठी योग्य पाठपुरावा होणे गरजेचे आहे. पुन्हा नव्याने असे वासनांध प्रवृतींचा धाडस असे कृत्य करण्यासाठी होणार नाही अशी सक्षम उपाय योजनेची यंत्रणा निर्माण होणे गरजेचे आहे. घटणारी घटना त्रस्थपणाने न पाहता असे कृत्य करणाऱ्यांना रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी सजगपणे पुढे येणे काळाची गरज ठरली आहे.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा