Cultural Politics: नेतासुभाष मित्रमंडळासमोर 'उडता हनुमान' पहाण्यासाठी रेकॉर्डब्रेक गर्दी ! - Rayat Samachar

Cultural Politics: नेतासुभाष मित्रमंडळासमोर ‘उडता हनुमान’ पहाण्यासाठी रेकॉर्डब्रेक गर्दी !

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
67 / 100

अहमदनगर | १७ सप्टेंबर | तुषार सोनवणे

Cultural Politics सालाबादप्रमाणे होत असलेल्या गणेशोत्सवात यंदा चितळेरोड येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मित्र मंडळाने साकारलेल्या ‘हनुमान संजीवनी बुटी’ देखावा पाहण्यासाठी नगरकरांनी तोबा गर्दी केली. शहरातील लहानमुलांमधे उडता हनुमान पहाण्यासाठी झुंबड उडाली होती, तर नागरिक तो क्षण मोबाईलमधे कैद करताना दिसत होते. मंडळाचे अध्यक्ष विक्रम राठोड लहान मुलांना खाऊ वाटप करून त्यांच्या आनंदात सहभागी होताना दिसले.

लोकसभेनंतर होणारा हा पहिलाच गणेशोत्सव. त्यात विधानसभेची लागलेली चाहूल पहाता सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या मंडळांना ‘रसद’ पुरवलेली दिसून आली. शहरभर चौका- चौकात लागलेले नेते मंडळींचे बॅनर त्याची साक्ष देत होते. माळीवाडा स्टॅन्डपरिसर त्याचबरोबर उपनगरात आ.संग्राम जगताप यांचे बॅनर मोठ्या प्रमाणात दिसत होते तर मध्यशहरात त्याच्या विरुद्ध चित्र दिसत होते. आरास पहाण्यासाठी कोण जास्त गर्दी खेचतो यातही मंडळांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळाली.

चितळेरोड आणि राजकारण हे शहरातील जुने समीकरण. त्यात भाजपचे माजी नगरसेवक प्रदीप परदेशी आणि बागडपट्टीचा राजा मित्र मंडळाचे अध्यक्ष दिलदारसिंग बीर या दोन युवा आक्रमक नेत्यांची झालेली ‘घरवापसी’ याने मूळ ठाकरेंच्या शिवसेनेत चैतन्याचे वातावरण दिसत आहे. हे दोन्ही नेते मूळचे शिवसैनिक त्याचबरोबर कै.आ.अनिलभैय्या राठोड यांचे खंदे समर्थक मानले जातात. चितळेरोड, तोफखाना परिसरात बदलले हे चित्र स्पष्ट दिसत होते आणि ‘आरास’ पाहायला आलेल्या नागरिकांमध्ये यावर ‘खमंग’ चर्चा होताना दिसली. तर बच्चेकंपनी आरास पहाण्याचा मनसोक्त आनंद घेत होती.

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा

हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा
Share This Article
Leave a comment