साहित्यवार्ता |२७ ऑगस्ट|टी.एन.परदेशी
atheism या विषयावर सध्या बरेच लिहिले जात आहे. देव, ईश्वर, आत्मा, पुनर्जन्म, विधिलिखित, नशीब व महत्वाचा म्हणजे धर्म अशा सर्व संकल्पना व श्रद्धा नाकारणे म्हणजे नास्तिकता होय. आस्तिकता जेवढी प्राचीन व आदिम तितकी नास्तिकता प्राचीन नाही. देव ईश्वरासह सर्व संकल्पना व त्याविषयीच्या श्रद्धा आधी निर्माण झाल्या व नंतर दीर्घकाळाने बुद्धीवादी माणसांनी ‘बाप दाखव, नाहीतर श्राद्ध कर, या न्यायाने त्या नाकारण्यास सुरूवात केली. माणसाचा जन्म व मृत्यू ही एक जैविक प्रक्रिया असून ईश्वर, आत्मा आदि संकल्पना म्हणजे निव्वळ कवीकल्पनांचा खेळ असल्याविषयीची मांडणी होऊ लागली व ती धर्म संकल्पनांच्या विकासाइतकीच विकसित होत राहिली आहे.
आपल्याकडील लोकायत व चार्वाकांचे तत्वज्ञान व पाश्चात्यांचा कम्युनिझम या नास्तिकतेच्या प्रमुख विचारधारा आहेत. भारतासह जगात साधारणपणे १५ ते १८ % लोक निधर्मी व नास्तिक आहेत. प्रत्यक्षात २०११ च्या जनगणनेत भारतातील सुमारे २८ लाख लोकांनी आपला धर्म नोंदवलेला नाही. रशिया व विशेषकरून चीन हे दोन देश नास्तिक मानले जातात, पण चीनपेक्षा रशिया हा धर्म आचरणाबाबत बराच सैल असला पाहिजे. रशियाचे अध्यक्ष पुतिन हे सनातनी ख्रिश्चन असून ते चर्चमधेही जात असल्याचे सांगितले जाते.
नास्तिकतेच्या विरोधात अर्थातच उजवे – मूलतत्त्ववादी गट कार्यरत असतात, ते नास्तिकांना आपला प्रथम शत्रु मानतात. आपल्याकडील उजवे व डावे यांचे अहि नकुल संबंध प्रसिद्धच आहेत. वैदिकांच्या विरोधात असलेले ते सारे नास्तिक अशी एक जुनी धारणा होती. बौद्ध व जैन धर्माचे तत्वज्ञान हे नास्तिकतेचे होते. धर्मविचार तर आहे परंतु सोबतीस अनिश्वरवाद आहे, अशी या धर्मांची मांडणी होती. या दोन्ही धर्मांमधे विविध पंथ निर्माण झाले. बौद्ध व जैन धर्मांना मूळात मूर्तिपूजा मान्य नाही, परंतु चौथ्या शतकानंतरच्या काळात निर्माण झालेल्या लेण्यांमधे बुद्ध व महावीराच्या – तीर्थ॔करांच्या मूर्ती निर्माण झाल्या. त्याआधीच्या चैत्यगृहांमधे केवळ स्तूप होते तर नंतरच्या काळात स्तूपासमोर बुद्धमूर्ती कोरल्याचे दिसते. नंतरच्या काळात मैत्रेय आणि अवलोकितेश्वर अशा बोधीसत्वांच्याही विविध शैलींमधे मूर्ती निर्माण झाल्या. बाहेरच्या देशांमधे बुद्धमूर्ती असलेले मठही आहेत. तेथे विशिष्ट परंपरांचे पूजाविधीही आहेत. जैन धर्मात मंदिरगामी पंथ निर्माण झाला. मंदिरांमधील तीर्थ॔करांच्या मूर्तींची अभिषेक, धूप, दिप नैवेद्यादि उपचारांनी पूजा होते. श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या भव्य व अद्वितीय अशा निरावलंब मूर्तीचा बारा वर्षांनी विविध द्रव्यांनी विधीवत अभिषेक सोहळा बराच काळ साजरा होत असतो.
सध्या भारतात नास्तिक विचार एकदम उफाळून आल्यागत झाला आहे, त्यास राजकीय प्रतिक्रियेचे स्वरूप आधिक्याने आहे. भाजप हा उघडपणे धर्माधिष्ठित राजकारण करणारा पक्ष असून त्याने त्याचा हा अजेंडा कधीही लपवून ठेवलेला नसल्याने तसेच हा ‘ब्राह्मण्य’प्रणित पक्ष असल्याची दृढ धारणा ज्यांच्या मनात आहे असा बराच मोठा जनसमूह आस्तित्वात आहे. भाजप हा केडरबेस पक्ष आहे. त्याची संघटना अत्यंत बांधीव व सर्वदूर मूळे रुजलेली असल्याची तसेच या पक्षास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाठबळ असल्याची जाणीव असणारा विरोधी जनसमूह मोठ्या संख्येने आहे. मात्र या लोकांना आपण भाजप व एकच एक संघटनेच्या बांधीव स्वरूपात नसल्याचीही जाणीव मनोमनी आहे. ‘पुरोगामी’ म्हणून ओळखला जाणाऱ्या या वर्गात दलित पददलितांच्या विविध संघटना, समाजवादी, कम्युनिस्ट या आणि अशा अनेक गटांशिवाय ज्यांच्या जन्मदाखल्यावर धर्माच्या रकान्यात ‘हिंदू’ असा उल्लेख आहे असे खूप लोक आहेत. यातील काही लोकांच्या मनातील हतबलता अनेकदा ‘नास्तिक’ म्हणून प्रकर्षाने बाहेर पडते. “मी नास्तिक आहे, मी देव मानत नाही, मी मंदिरात जात नाही” हे या ना त्या स्वरूपात उच्चरवाने सांगण्यात एक प्रकारे प्रेशर कुकरच्या शिटीसारखी मनातील घालमेल व अस्वस्थता ‘रिलिज’ करण्याचे हे नकळतपणे घडणारे वर्तन असते.
माझ्या एका स्नेह्याने २०१४ पासून टी.व्ही.बंद करून ठेवला आहे का तर रोज रोज एका विशिष्ट राजनेत्याचे दर्शन नको ! तो ‘धार्मिक’ होता. पूजाअर्चा- तीर्थक्षेत्र दर्शन करत होता पण गेल्या दहा वर्षांपासून तो आता पूजा करत नाही. मंदिरात जात नाही. कधीकधी उद्विग्न होऊन हिंदू धर्म व त्यातील देवतांविषयी अनर्गल भाषेत बडबडतो. धर्म त्याग करण्याची भाषा बोलतो. त्याच्या या वर्तनास कसलेही वैचारिक अधिष्ठान नाही. त्याच्या सर्व प्रतिक्रिया राजकीय हतबलतेतून आलेल्या आहेत.
नास्तिक असणे व नास्तिकतेची शैली अंगीकारणे हे वैचारिक अधिष्ठानाचे कार्य आहे. ती एक सुदृढ जीवनशैली आहे !
नास्तिकतेला हतबलतेची पार्श्वभूमी असता कामा नये व असे झाले तर ती घोर आत्मवंचना ठरेल, याची जाणीव राखली पाहिजे.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा