अंबाजोगाई | २३ ऑगस्ट | प्रतिनिधी
भारतीय संस्कृतीने, संत परंपरेने स्त्रीयांच्या women सन्मानाची भूमिका मांडलेली आहे. असे असताना संतांच्या महाराष्ट्रात स्त्रीयांवरील अत्याचाराच्या घटना रोज कानावर आदळत आहे. याला पायबंद घालायचा असेल तर कीर्तनातून महिलांची टिंगल- टवाळी करणारे विनोद करण्यापेक्षा त्यांच्या सुरक्षेबद्दल जनजागृती करावी, असे आवाहन ह.भ.प.शामसुंदर महाराज सोन्नर यांनी केले. येल्डा येथील अखंड हरिनाम सप्ताहातील तिसरे कीर्तनपुष्प गुंफताना ते बोलत होते.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. वारकरी संतांनी इथल्या मातीची वैचारिक मशागत केली आहे म्हणूनच महाराष्ट्रात सुधारणावादी चळवळी रुजल्या. वारकरी संत परंपरेने महिलांचा सन्मान केलेला आहे. म्हणूनच या परंपरेत अनेक बंडखोर महिला संत होऊन गेल्या. त्यांनी अभंगाची रचना करून समाजाला वैचारिक बळ दिले. वारकरी संतांनी कधी, जातीवरून, धर्मावरून किंवा स्त्री आहे म्हणून कुणाला कमी लेखलेले नाही परंतू याच वारकरी कीर्तन परंपरेला आज विकृत स्वरूप येत आहे. कीर्तनातून महिला सन्मानाची मांडणी होण्याऐवजी महिलांवर पांचट विनोद केले जात आहेत. महिलांचा अपमान केला जात, याबद्दल शामसुंदर महाराज यांनी खेद व्यक्त केला.
ज्या वारकरी संतांनी महाराष्ट्रात स्त्री सन्मानाची पेरणी केली तिथेच आज महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. रोज धक्कादायक प्रकार कानावर येत आहेत. किती विकृती वाढावी? घरात कुरबूर झाली म्हणून एक महिला आश्रयासाठी मंदिरात जाते आणि तिथले तीन पुजारी तिला आधार देण्याऐवजी तिच्यावर बलात्कार करतात. आपलं पाप उघड होऊ नये म्हणून तिची हत्या करतात. तीन वर्षांच्या मुलींवर शाळेतील शिपाई अत्याचार करतो. जो कुठल्या तरी संप्रदायाच्या बैठकीला जाणारा साधक आहे. याशिवाय दर रोज महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्या कानावर आदळत आहे. अशा काळात संत विचारांच्या आधारे प्रबोधन करणाऱ्या कीर्तनकारांची जबाबदारी वाढते. त्यांनी स्त्रीयांचा सन्मान आणि सुरक्षितता बळकट करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. संत विचारांवर निष्ठा असणाऱ्या कीर्तनकारांनी त्याबाबत प्रबोधन करावे, असे आवाहनही ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांनी केले.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा