मुंबई | गुरुदत्त वाकदेकर
भारताने मंगळवारी श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या t20 world cup सामन्यात शानदार विजयाची नोंद केली. हा सामना भारताने सुपर ओव्हरमध्ये जिंकला. यासह भारतीय संघाने मालिका ३-० अशी खिशात घातली. गौतम गंभीरचा कार्यकाळ सुरू झाल्यानंतर भारताचा हा पहिला मालिका विजय आहे.
पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय संघाने २० षटकांत ९ गडी गमावून १३७ धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेनेही २० षटकांत ८ गडी गमावून १३७ धावा केल्या. अशा प्रकारे सामना टाय होऊन सुपर ओव्हरमध्ये पोहोचला.
सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेकडून कुसल मेंडिस आणि कुसल परेरा प्रथम फलंदाजीला आले. त्याचवेळी भारतीय संघाकडून कर्णधाराने चेंडू वॉशिंग्टन सुंदरकडे सोपवला. सुंदरने षटकाची सुरुवात वाईडने केली आणि धावसंख्या १/० झाली. पहिल्या चेंडूवर मेंडिसने धाव घेतली आणि धावसंख्या २/० झाली. दुसऱ्या चेंडूवर सुंदरने परेराला रवी बिश्नोईकरवी झेलबाद केले आणि धावसंख्या २/१ झाली. यानंतर पथुम निसांका फलंदाजीला आला. तिसऱ्या चेंडूवरही सुंदरने विकेट घेतली. त्याने निसांकाला रिंकू सिंगकरवी झेलबाद केले. अशाप्रकारे श्रीलंकेची धावसंख्या २/२ झाली आणि भारताला केवळ तीन धावांचे लक्ष्य मिळाले.
भारताकडून सुपर ओव्हरमध्ये तीन धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल मैदानात उतरले. पहिला चेंडू महिष तिक्षणाने टाकला ज्यावर सूर्यकुमार यादवने शानदार चौकार मारून सामना जिंकला.
श्रीलंकेच्या डावातील शेवटच्या दोन षटकांमध्ये सामना रोमांचक झाला. श्रीलंकेला शेवटच्या १२ चेंडूत ९ धावांची गरज होती. या स्थितीत कर्णधाराने चेंडू रिंकू सिंगकडे सोपवला. रमेश मेंडिस आणि कुसल परेरा खेळपट्टीवर उपस्थित होते. धावसंख्या १२९/४ होती. परेराने पहिल्या चेंडूवर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला यश आले नाही. दुसऱ्या चेंडूवर रिंकूने कुसल परेराला झेलबाद केले. धावसंख्या १२९/५. कामिंडू मेंडिस सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने एक धाव घेतली. रमेश मेंडिसने चौथ्या चेंडूवर दोन धावा घेतल्या. पाचव्या चेंडूवर एकही धाव आली नाही. सहाव्या चेंडूवर रिंकू सिंगने पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीची जादू दाखवत रमेश मेंडिसला शुभमन गिलकरवी झेलबाद केले. आता श्रीलंकेला सहा चेंडूत सहा धावांची गरज होती. धावसंख्या १३२/६.
कर्णधार सूर्यकुमार यादव स्वतः डावातील शेवटचे षटक टाकायला आला. चामिंडू विक्रमासिंग आणि कामिंडू मेंडिस खेळपट्टीवर उपस्थित होते. पहिल्या चेंडूवर एकही धाव आली नाही. दुसऱ्या चेंडूवर सूर्याने कामिंदू मेंडिसला रिंकू सिंगकरवी झेलबाद केले. आता श्रीलंकेला चार चेंडूत सहा धावांची गरज होती. धावसंख्या १३२/७. तिसऱ्या चेंडूवर सूर्याने नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या महिष तिक्षणाला लक्ष्य केले. धावसंख्या १३२/८. आता असिथा फर्नांडो फलंदाजीला आला. सूर्याने चौथा चेंडू टाकला ज्यावर असिथाने धाव घेतली. पाचव्या चेंडूवर विक्रमसिंघेने दोन धावा घेतल्या. श्रीलंकेला एका चेंडूवर तीन धावांची गरज होती. सहाव्या चेंडूवर विक्रमसिंघेने पुन्हा दोन धावा घेतल्या आणि श्रीलंकेची धावसंख्या १३७/८ झाली. अशाप्रकारे हा सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला.
लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेची या सामन्यात चांगली सुरुवात झाली. पथुम निसांका आणि कुसल मेंडिस यांच्यात पहिल्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी झाली. निसांका २६ धावा करून तंबूमध्ये परतला. यानंतर कुसल परेराने मेंडिससोबत दुसऱ्या विकेटसाठी ३९ चेंडूत ५२ धावा जोडल्या. मेंडिसच्या रूपाने श्रीलंकेला दुसरा धक्का बसला. ४३ धावांवर तो बाद झाला. परेराने ४६ धावा केल्या. या सामन्यात हसरंगाने तीन, असलंकाने शून्य, रमेश मेंडिसने तीन, कामिंदू मेंडिसने एक, विक्रमसिंघेने नाबाद चार, महिश तिक्षणाने शून्य आणि असिथा फर्नांडोने नाबाद एक धावा केल्या. भारताकडून वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, रिंकू सिंग आणि सूर्यकुमार यादव यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेला भारतीय संघ या सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर झुंजताना दिसला. जैस्वाल अवघ्या १० धावा करून बाद झाला. त्याचवेळी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला संजू सॅमसन खातेही न उघडता तंबूमध्ये परतला. यानंतर महिष तिक्षणाने रिंकू सिंगच्या रूपाने भारताला तिसरा धक्का दिला. त्याला एकच धाव करता आली. या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवची बॅटही चालली नाही. तो अवघ्या आठ धावा करून तंबूमध्ये परतला. या सामन्यात शुभमन गिलने ३९ धावा, शिवम दुबेने १३ धावा, रायन परागने २६ धावा, वॉशिंग्टन सुंदरने २५ धावा, मोहम्मद सिराजने शून्य धावा आणि रवी बिश्नोईने नाबाद आठ धावा केल्या. श्रीलंकेकडून महिष तिक्षणाने तीन तर वानिंदू हसरंगाने दोन गडी बाद केले. त्याचवेळी विक्रमसिंघे, असिथा फर्नांडो आणि रमेश मेंडिस यांना प्रत्येकी एक यश मिळाले.
वॉशिंग्टन सुंदरला सामनावीर तर सूर्यकुमार यादवला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
तीन सामन्यांची एक दिवसीय मालिका ता. २ ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. त्यात सहभागी होण्यासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली देखील श्रीलंकेला पोहोचले आहेत.
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा