पाथर्डी | १४ सप्टेंबर | राजेंद्र देवढे
गणपती विसर्जनाच्या मिरवणुका नाईक चौकात एकमेकींच्या समोरासमोर येताच, कोणाच्या डीजेचा आवाज मोठा ! अशी खुन्नस सुरू लागल्याने आवाजाची स्पर्धा सुरू झाली. अतीउत्साही तरुण धुंदीमध्ये डीजेवर चढून नाचू लागले. हावभाव व इशाऱ्यांवरुन वाद उद्भवल्याने काही कळायच्या आत Crime हाणामारी सुरू झाली. पोलिसांनी तात्काळ धाव घेत लाठीचार्ज करत जमाव पांगवला. दिसेल त्याला लाठ्यांचा प्रसाद मिळाल्याने पाच मिनिटांतच पोलिसांनी जमावावर पूर्ण नियंत्रण मिळवले.
याबाबत समजलेली माहिती अशी की, नाथनगर व वामनभाऊनगरमधील दोन मंडळांच्या मिरवणुका गणपती विसर्जनासाठी निघाल्या. उडत्या चालीच्या गाण्यांवर विक्षिप्त हावभाव करत डीजेपुढे उत्साही तरुण नाचत होते. डीजे व लेझरलाईटला परवानगी नसतानाही एका मंडळाचे कार्यकर्ते राजरोसपणे डीजे लेझरलाईटवर बेधुंदपणे नाचत होते. लेझरलाईटचा रस्त्याने वावरणाऱ्या सर्व स्तरांतील नागरिकांना व व्यापाऱ्यांना मोठा त्रास झाल्याने मिरवणूक कार्यकर्त्यांना काही बोलण्याऐवजी व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद करणे पसंत केले.
अहमदनगर व शेवगाव रस्त्याने आलेल्या दोन्ही मंडळांचा सामना जुन्या बसस्थानकाजवळील नाईक चौकात झाला. काही काळ दोन्ही मंडळांचा दणदणाट सुरू होता. आवाजाच्या सर्व मर्यादा ओलांडून डीजेवर तरुणांनी ताल धरला. सुमारे अर्धा किलोमीटर लांब असलेल्या कसबा विभागातही डीजेचा आवाज ऐकू येत होता. एका मंडळाच्या मिरवणुकीसमोर काही महिलाही काही काळ नाचत होत्या. काही कळायच्या आत पाठोपाठ चाललेले डीजे समोरासमोर आले. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बाजारपेठ बंद होतच होती. कर्णकर्कश आवाजाने दुकानदारांच्या मांडण्यांवरील सामानही खाली पडले, एवढा जोराचा आवाज होता. काहींचा रक्तदाब वाढला. तर काहींना चक्कर आल्यासारखे झाले. अन्य मंडळाचे कार्यकर्ते रस्त्याच्या दुतर्फा थांबले होते. एका मंडळाचे काही उत्साही कार्यकर्ते डीजेच्या पाचव्या थरावर चढून नाचू लागले. बेभान झालेल्या कार्यकर्त्याला अन्य एका कार्यकर्त्याचा धक्का लागून तो खाली पडला. जबर जखमी झालेल्या कार्यकर्त्याला पाहण्यासाठी गर्दी जमली. मारहाण झाल्याचे वाटून दोन्ही बाजूकडील कार्यकर्ते परस्परांना भिडले. बातमी कळतात काही सेकंदांत पोलिसांचा संपूर्ण फौज फाटा पोहोचला व त्यांनी लाठीचार्ज सुरू केला. त्यामध्ये काही बघ्यांनाही पोलिसांचा प्रसाद मिळाला.
पोलीस स्टेशनमध्ये गणेशोत्सवानिमित्त सत्यनारायण पूजा व महाप्रसाद कार्यक्रमानिमित्त पोलीस, त्यांचे कुटुंबीय व मान्यवर उपस्थित होते. सर्व पोलीस योगायोगाने एकत्रित असल्याने वेळेवर मदत पोहोचून मोठा अनर्थ टळला. डीजे मालकाची यंत्रसामग्री पोलिसांनी ताब्यात घेताच कारवाई करू नये, यासाठी मोठमोठ्या नेत्यांचे फोन सुरू झाले. जखमी युवकाला तातडीने अहमदनगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती आता सुधारत असल्याने त्याच्या जबाबानंतर पुढील कारवाई होईल. अद्यापपर्यंत काहीही नोंद पोलीस स्टेशनला दाखल झालेली नाही.
रात्री पोलिसांनी बळाचा वापर करून जमाव पांगवला नसता तर मोठी दंगल घडली असती. यामध्ये हिंदू मुस्लिम दोन्ही कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी होते. विनाकारण जातीय तणावाचे गालबोट गणेशोत्सवाला लागले असते.
डीजे व लेझर लाईटला परवानगी कोणी दिली, प्रमुख नेत्यांनी उत्सवाचे पावित्र्य राखण्याऐवजी नियम मोडून कायदा धाब्यावर बसवणाऱ्यांविषयी सहानभूती का दाखवली ? असे विविध प्रश्न यानिमित्ताने नागरिकांमधून विचारले जात आहेत.
याबाबत माहिती देताना पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे म्हणाले, काल रात्री नऊ-साडेनऊच्या सुमारास माहिती मिळताच पोलीसांचा फौजफाटा घटनास्थळी पोहोचला. परिस्थितीचे गांभीर्य पहात बळाचा वापर करून जमाव पांगवला. जखमी व्यक्तीच्या जबाबानंतर गुन्ह्याची नोंद होईल, असे ते म्हणाले.
सध्या शहरातील वातावरण शांत व तणावपूर्ण असून याचा परिणाम देखावे पाहणाऱ्यांवर व मिरवणुकीवर होऊन गणेशोत्सवाचे पावित्र्य नष्ट होत आहे. उत्सवाच्या परंपरेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यंदा पहिल्या दिवसापासूनच गणेशोत्सवात उत्साह नाही. स्थापना मिरवणुकीतही वलयांकित मंडळाच्या कार्यकर्त्यांसह दुसऱ्या फळीतल्या मंडळांकडेही कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली. काही मंडळांमध्ये तर वाजंत्रीवाले व गणपती धरून बसणारे असेच कार्यकर्ते उपस्थित होते. अशा पद्धतीचे वातावरण राहिल्यास येत्या चार दोन वर्षात गणेशोत्सवाची शहरातील मिरवणुकीची परंपरा बंद होऊ शकते अशी शंका नागरिकांना वाटत आहे.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा