मुंबई | गुरुदत्त वाकदेकर
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ५० षटकांत ८ गडी गमावून २३० धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने ४७.५ षटकांत १० गडी गमावून २३० धावा केल्या. भारताला विजयासाठी १५ चेंडूत अवघ्या एका धावेची गरज असताना शिवम दुबे बाद झाला. यानंतर अर्शदीप सिंग फलंदाजीला आला आणि पहिल्याच चेंडूवर पायचीत बाद झाला.
मालिकेतील दुसरा सामना रविवारी (४ ऑगस्ट) आर प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. भारताकडून पहिल्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार रोहित शर्माने ५८ धावा केल्या. त्याने ३३ चेंडूत आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील ५६ वे अर्धशतक झळकावले. त्याच वेळी, श्रीलंकेकडून वानिंदू हसरंगा आणि चारिथ असलंका यांनी प्रत्येकी सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.
पथुम निशांक आणि दुनिथ वेललागे यांच्या अर्धशतकांच्या जोरावर श्रीलंकेने पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतासमोर २३१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना वेलालगेच्या ६५ चेंडूत नाबाद ६६ धावा आणि निशांकाच्या ५६ धावांच्या खेळीच्या जोरावर श्रीलंकेने ५० षटकांत आठ गडी गमावून २३० धावा केल्या. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली नाही आणि १०१ धावांवर पाच विकेट गमावल्या. मात्र, प्रथम निशांक आणि नंतर वेलालगे यांनी शानदार अर्धशतके झळकावत श्रीलंकेच्या डावावर ताबा घेतला आणि भारतासमोर आव्हानात्मक लक्ष्य ठेवण्यात यश मिळवले. भारताकडून वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन तर मोहम्मद सिराज, शिवम दुबे, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
एकदिवसीय सामन्यात या दोन्ही संघांची एकमेकांविरुद्ध बरोबरी होण्याची ही दुसरी वेळ आहे. ड्युनिथ वेललागे हा सामनावीर ठरला.
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा