पारनेर | २२ सप्टेंबर | अशोक जाधव
तालुक्यातील अस्तगाव, रायतळे परिसरातील Public Issue शेतकरी खडी क्रेशरच्या धुळीमुळे हवालदिल झाले असून शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. प्रदुषण मंडळाच्या अहमदनगर अधिकाऱ्यांचे याकडे अर्थपुर्ण दूर्लक्ष असल्याने टी.व्हि.सेन्टर येथील प्रदूषण मंडळावरच मोर्चा काढण्याची चर्चा होत आहे.
खडी क्रेशरच्या धुळीच्या फुफाट्यात पिकांचे झालेले नुकसान, खडी क्रेशर व डांबर प्लांटच्या प्रदूषणाने धोक्यात आलेले आरोग्य, सुरुंगाच्या स्फोटाने खालावलेली पाणीपातळी, खडी क्रेसरच्या धुळीमुळे भाजीपाल्यासह अन्नपिकांचे पिकांचे झालेले नुकसान या अनेक कारणामुळे पारनेर तालुक्यातील रायतळे अस्तगाव येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत.
या परिसरात ३ खडी क्रेशर व एक डांबर प्लांट असून या ‘उद्योगा’मुळे लगत असणाऱ्या शेतकऱ्यांचे तसेच लोकांचे धुळीमुळे व डांबरधुरामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. फुपाट्यामुळे अन्नपिकांची नासाडी होते. शेतकऱ्याचे कुटुंब शेतीवर अवलंबून असून या नुकसानीमुळे त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला.
प्रदूषण मंडळ, महसूल प्रशासन व खडी क्रेशर चालकांनी शेतकऱ्यास सहकार्य करून चांगल्या पद्धतीने शेती करू द्या. अन्यथा फासावर लटकून आत्महत्या करू देण्याची भावना या भागातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे तसेच लवकरच अहमदनगरमधील टी.व्ही.सेन्टर येथील प्रदूषण मंडळ कार्यालयावर मोर्चा काढण्याची चर्चा सुरू आहे.
दगडखाणीत एकाच वेळी अनेक सुरुंग लावून मोठे स्फोट घडून आणले जात आहेत. सुरुंगाच्या धक्क्याने देखील ग्रामस्थ वैतागले असून या भागातील विहिरींची, बोरवेलची पाणीपातळी देखील घटलेली आहे. खडीक्रेशर हे वनविभागाच्या वनक्षेत्रालगत असून संबंधित खडी क्रेशरला वन विभागाने कोणत्या धोरणाअंतर्गत परवानगी दिली, हा संशोधनाचा विषय आहे. खडीक्रेशरच्या दीर्घ मुदतीच्या खानपट्ट्या करिता वनविभागाचे ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता असते. विशेष म्हणजे वनक्षेत्रापासून २५० मीटर अंतरावर खडी क्रेशरची स्थापना करणे अभिप्रेत असून सुद्धा याचे पालन झालेले प्रथमदर्शी दिसून येत नाही.
स्थानिक राजकीय पुढाऱ्याच्या मालकीचे खडी क्रशर अस्तगाव, रायतळे शिवेवरती असून त्याकडे जाणारा रस्ता वनक्षेत्रातून असल्याचे मत येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. जागेवरील परिस्थिती पाहता सहज लक्षात येत आहे की, हा रस्ता वनहद्दीतून जात आहे. वन विभागाच्या कायद्यानुसार कुठल्याही प्रकारच्या उद्योगासाठी विनापरवाना वनक्षेत्राचा वापर हा कायद्याने गुन्हा ठरतो, मग या ठिकाणी वनविभाग मूक गिळून गप्प का आहे ? असा सवाल परिसरातील शेतकरी विचारत आहेत.
शेतकऱ्यांचे प्रश्न तत्काळ सुटले नाहीत तर या गंभीर प्रश्नांविषयी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची लेखी निवेदन जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून करणार आहेत.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा