पाथर्डी | पंकज गुंदेचा
तालुक्यातील पिंपळगाव कासार येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात माजी आमदार कै.ग.रा. तथा रावसाहेब म्हस्के यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. education कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक आर.वाय.म्हस्के, प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नागरिक सदाशिव तुपे तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब राजळे आणि पालक माजी ग्रा. सदस्य गणेश भगत उपस्थित होते.
एसएससी परीक्षा मार्च २०२४ मध्ये प्रथम येणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना स्मृती विश्वस्त मंडळ तिसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथम विद्यार्थ्यास ट्रॉफी व रोख रक्कम रूपये २०१/- तसेच विद्यालयात द्वितीय व तृतीय विद्यार्थ्यास रोख रक्कम रूपये १५१/- बक्षीस देण्यात आले. तसेच होतकरू विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक व सर्व स्टाफच्या वतीने गणवेशाचे वाटप करण्यात आले.
भताने विजय यांनी आपल्या मनोगतातून कै. रावसाहेब म्हस्के यांचे समाजातील दीनदलित लोकांबद्दलची तळमळ व समाजासाठी त्यांचा परोपकार व्यक्त केला. यावेळी पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी कै.आ.रावसाहेब म्हस्के यांच्या जीवनपटाचे माहिती दिली.
मुख्याध्यापक गोरखनाथ रेपाळे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले तसेच कै.रावसाहेब यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल माहिती सांगितली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी लवांडे, अनुमोदन राजेंद्र वांढेकर यांनी तर आभार भागवत आव्हाड यांनी मानले.