समाजसंवाद | २९ सप्टेंबर | भैरवनाथ वाकळे
ahmednagar news महाराष्ट्रातील ख्यातनाम आर्किटेक्ट अर्शद शेख हे केवळ आर्किटेक्ट नाही तर ‘सोशल आर्किटेक्ट’च्या माध्यमातून समाज प्रबोधनासाठी सतत कार्यरत असणारे अहमदनगर शहरातील जागरूक नागरिकही आहेत. ‘अर्शद’ या शब्दाचा एक अर्थ ‘सगळ्यात प्रामाणिक’ किंवा ‘योग्य मार्गावरील व्यक्ती’ असाही होतो. अर्शदभाई हे नावाप्रमाणेच प्रामाणिक किंवा योग्य मार्गावरील व्यक्ती आहेत यात काहीच शंका नाही. ते व्यवसायाने आर्किटेक्ट असल्यामुळे इमारती निर्माण करणे हे तर ते करतातच पण त्याचबरोबर एक संवेदनशील व्यक्ती असल्यामुळे ज्या समाजातून आपण आलेलो आहोत त्या समाजाचे आपण काही देणे लागतो, या भावनेने ते सतत कार्यरत असतात. त्यांनी समाज प्रबोधनासाठी लेखणी हातामध्ये घेतली, मात्र त्यांना लिखाणाचे कोणतेही औपचारिक शिक्षण नसल्यामुळे त्यांनी लेखनाची गरज म्हणून पत्रकारिता आणि जनसंवादात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यातूनच त्यांचा महाराष्ट्रातील अनेक पत्रकार आणि संपादकांशी परिचय झाला. त्यामुळे व त्यांनी लिहीलेल्या समाज उपयोगी विषयांमुळे त्यांचे लेख महाराष्ट्रातील विविध नियतकालिकातून प्रसिद्ध झाले आहेत.
अर्शदभाई सातत्याने विविध वर्तमानपत्रात लिहीत असतात. त्यांनी लिहिलेल्या गेल्या काही वर्षातील निवडक लेखांचा संग्रह ‘अर्शदनामा’ या नावाने प्रसिद्ध होत आहे. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. यामध्ये एकूण पस्तीस लेखांचा समावेश आहे. त्यांनी या पुस्तकाची सुरुवातच मुळी ‘ही कसली लोकशाही?’ या लेखाने केली आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना ज्या स्वातंत्र्यासाठी आमच्या पूर्वजांनी संघर्ष केला त्याचे काय झाले? ‘लोकशाही’ची आजची अवस्था काय आहे? याचे वास्तव चित्र त्यांनी या लेखात रेखाटले आहे. अत्यंत सामान्य मागण्यांसाठी आपल्याच लोकांना रस्त्यावर येण्यास भाग पाडणारी ‘ही कसली लोकशाही?’ हा भेदक प्रश्न ते उपस्थित करतात. मुठभर लोकांच्या राजकीय आकांक्षा पूर्ण करण्यासाठी शिखरस्थ नेत्याने अविवेकी बुद्धीने संपूर्ण राष्ट्रच वेठीस धरले तर काय होईल? हे ते ‘गोली मारो सालों को…’ या लेखातून मांडतात. विविध प्रकारच्या सामाजिक प्रश्नांची चर्चा करत असतानाच ते आगामी काळात अधिकाधिक तीव्र होत जाणाऱ्या कचऱ्याच्या समस्यावर ‘कचऱ्याच्या विळखात भारत’ या लेखातून प्रकाश टाकतात. आमच्या शिवाय आहेच कोण? हे विचारणारे ‘भ्रामक युक्तिवाद’ करत आहेत, हे ते स्पष्टपणे दाखवून देतात तर राष्ट्रवादाची व्याख्या करताना राष्ट्रवादाच्या नावाखाली अधिमान्यता मिळालेल्या बहुसंख्यांकांच्या जमातवादाला विरोध करत भारतीय राज्यघटनेने प्रदान केलेल्या स्वातंत्र्य, समता, बंधूता आणि न्याय यावर आधारित एकात्म अशा भारतीय राष्ट्रवादाचा पुकारा करतात.
‘अज्ञान हे भीतीचे कारण असते’ हे सांगत ते ‘हिंदू खतरें में हैं’ या लेखात अधिकृत आकडेवारीसह मुस्लिमांच्या तथाकथित धोक्याची शास्त्रीय पद्धतीने जी चिरफाड करतात ती मुळातून वाचण्यासारखी आहे. ते केवळ प्रश्नांची मांडणी करूनच थांबत नाही तर दोन जागतिक महायुद्धात बेचिराख झालेल्या आजच्या प्रगत ‘जर्मनीच्या यशाचे रहस्य’ उलगडून दाखवत जर आपणही त्या मार्गाने गेलो तर आपलाही उत्कर्ष कोणी रोखू शकणार नाही हे सांगतात. जिहाद, तलाक, दहशतवाद इत्यादी संकल्पनावर ते वेगवेगळ्या अंगाने प्रकाश टाकतात. त्यासोबतच प्रतिगाम्यांनी या शब्दांचे अर्थ कसे बदलून टाकले आहेत, याकडे आपले लक्ष वेधतात.
अहमदनगर शहरावर त्यांचे मनापासून प्रेम आहे. एकेकाळी कैरो आणि बगदाद सारख्या जागतिक दर्जाच्या शहरांशी स्पर्धा करणाऱ्या अहमदनगर शहराच्या आजच्या वाताहातीबद्दल ते अस्वस्थ होतात. त्यातूनच ‘अहमदनगरच्या वैभवशाली परंपरेचा वारसा कोण जपणार?’ असा विकल प्रश्न विचारत ‘अहमदनगर शहराच्या वाहतुकीच्या समस्या आणि समाधान’ शोधण्याचा प्रयत्न करत ‘शहर ‘अहमदनगर’ होण्याची आतुरतेने वाट पाहत आहे’ असे लेख लिहितात. या व्यतिरिक्त समाजातील विविध तत्कालीन प्रश्नांवर त्यांनी लेखन केले आहे. याची प्रचिती आपल्याला ‘अर्शदनामा’ वाचताना कायम येते. ते केवळ लेखन करूनच थांबत नाही तर जे स्वप्न ते पाहतात त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी ‘पीस फाउंडेशन’च्या माध्यमातून ते सतत कार्य करताना दिसतात. वेळप्रसंगी संघर्ष देखील करतात. सामाजिक प्रश्नांसाठी एका बाजूला रस्त्यावर उतरणे आणि दुसऱ्या बाजूला त्या प्रश्नांचे तत्त्वज्ञानात्मक उत्तर शोधणे अर्थात रस्त्यावरील कार्यकर्ता आणि विचारशील कार्यकर्ता अशा दुहेरी भूमिकेत ते काम करत आहेत. ही फारच दुर्मिळ बाब आहे.
प्रस्तुत ग्रंथाचे डिझाईन ‘रुबीकॉन मीडिया’ अहमदनगर यांनी केले आहे. तर मुखपृष्ठ योगेश हराळे यांचे आहे. सुमारे सव्वाशे पानाच्या या पुस्तकाची किंमत आठशे रुपये ही जरा जास्तच आहे, यात काहीच शंका नाही. पण ज्या गुळगुळीत कागदावर ‘अर्शदनामा’ छापला गेला आहे ते पाहिल्यानंतर किंमत कमीच ठेवली आहे. हे आपल्या लक्षात येईल. या लेखसंग्रहाला एका सूत्रात गुंफणारी माध्यमतज्ञ संजय आवटे यांची प्रस्तावना आहे.
या प्रस्तावनेतील ‘Disinformation’ चा उदघाता स्टॅलिन आहे, या संजय आवटे यांच्या मताशी सहमत होता येत नाही, हा अपवाद वगळता उर्वरित प्रस्तावना वाचनीय आहे.
असो, ‘अर्शदनामा’चे आपण सर्वजण ‘तहेंदिल सें’ स्वागत करून त्यांच्या नव्या पुस्तकाची वाट पाहूया.
कृपया, लेख वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा
अर्शद भाईंचा आर्शद नामा म्हणजे काही वैचारिक खुराक असणारच,त्यांचे अहमदनगर शहरांवर असणारे प्रेम निर्विवाद आहे