नगर तालुका |१३ ऑक्टोबर | प्रतिनिधी
Politics सध्या महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जवळ आली. निवडणूक आचारसंहिता कधीही लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजी माजी आमदार व हौशी उमेदवारांसह अनेक राजकीय नेते विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन करण्यात व्यस्त आहेत. एका दिवसात दहावीस उदघाटने करण्याचा सर्वत्र धडाका सुरू असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. मतदारांवर सरकारी योजनांचा पाऊस नव्हे तर पार वादळ पडत आहे. गणपती काय नवरात्र काय मतदारांची आत्ताच चंगळ सुरू झाल्याचे दिसते आहे.
नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी परिसरात माजी खा. सुजय विखे पा. व माजी आ. शिवाजी कर्डिले यांच्या माध्यमातून विविध विकासकामे मंजूर झाली. त्याचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा काल ता.१३ रोजी श्रीराम मंदिर परिसर, पिंपळगाव माळवीमध्ये आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे तयारी ग्रामपंचायत पिंपळगाव व शिवाजी कर्डिले मित्रमंडळ यांच्यावतीने करण्यात आली होती.
परंतु आज दुपारी गावातील एका ग्रामस्थाचे अपघाती निधन झाले. त्यांचा अंत्यविधी कार्यक्रमापूर्वी नुकताच झाला. त्यामुळे माजी आमदार कर्डिले यांनी राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून उद्घाटन सोहळा रद्द केला. उपस्थित सर्व ग्रामस्थांसमवेत अपघाती मृत व्यक्तीस श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रम आटोपता घेतला. अपघातात मृत झालेल्या व्यक्तीच्या घरी भेट देऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.
यावेळी पिंपळगाव माळवी ग्रामपंचायत सरपंच राधिका प्रभुणे, उपसरपंच मच्छिंद्र झिने, ग्रामपंचायत सदस्य सुधीर गायकवाड, बापू बेरड, मेजर विश्वनाथ गुंड, प्रा.देवराम शिंदे, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन, संचालक व ग्रामस्थ यांनी श्रद्धांजली वाहिली. माजी आमदार कर्डिलेंची सह्रदयता आणि राजकीय प्रगल्भता परिसरात चर्चेचा विषय होती.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा