बेळगांव | १६ ऑक्टोबर | प्रतिनिधी
Cultural Politics गेली ६७ वर्ष सुरू असलेल्या सीमालढ्यात तसेच माय मराठी भाषेच्या संवर्धनासाठी बेळगाव सीमा भागातील मराठी पत्रकारांनी दिलेले योगदान मोलाचे असल्याचे प्रतिपादन, माजी महापौर आणि मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी केले. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानिमित्त मराठी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
काही दिवसापूर्वी केंद्र सरकारच्या वतीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला, मराठी भाषिकांच्या वतीने अनेक वर्षाच्या मागणीची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला त्यामुळे सर्व मराठी भाषिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला त्याचे औचित्य साधून युवा समितीच्या वतीने कावळे संकुल, टिळकवाडी येथे मंगळवारी सायंकाळी बेळगावमधील मराठी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
युवा समितीचे सरचिटणीस श्रीकांत कदम यावेळी म्हणाले, सीमाभागातील मराठी भाषा टिकविण्यासाठी आणि मराठीवर होणाऱ्या अन्यायाची वाचा फोडण्याचे काम बेळगावमधील सर्व मराठी भाषिक पत्रकार करत असतात, त्याच्या कार्याची दखल घेवून हा सन्मान करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला मालोजी अष्टेकर यांच्यासह मध्यवर्ती समितीचे ज्येष्ठ नेते प्रकाश मरगाळे, रमाकांत कोंडुसकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मराठी पत्रकारांचा स्मृतीचिन्ह पुस्तक आणि पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. जळगाव सीमा भागात मराठी पत्रकारांनी आजवर केलेल्या कार्याचे कौतुक प्रकाश मरगाळे यांनी केले. राजेंद्र पवार, कृष्णा शहापूरकर, श्रीकांत काकतीकर यांनी समायोजित विचार मांडताना सन्मानाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. अध्यक्ष अंकुश केसरकर, कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष वासू सामजी, राजू कदम, सिद्धार्थ चौगुले, सरचिटणीस श्रीकांत कदम, माजी उपमहापौर संजय शिंदे, माजी नगरसेवक प्रशांत भातखांडे, अमित देसाई यांच्यासह युवा समितीचे पदाधिकारी यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा