शेवगाव | १९ ऑगस्ट | प्रतिनिधी
सुमारे १४० कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या भारत देशात सर्वांना विकासाची समानसंधी उपलब्ध होण्यासाठी जातीनिहाय जनगणना होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सामाजिक, राजकीय अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते आनंद शितोळे यांनी केले. politics भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शेवगाव येथे रविवारी ता.१८ रोजी आयोजित जिल्हा जातीनिहाय जनगणना परिषदेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ.ॲड.सुभाष लांडे होते.
जिल्हा जातीनिहाय जनगणना परिषदेचे उद्घाटन शितोळे यांच्या हस्ते झाले. यावेळी शितोळे म्हणाले की, आजही ग्रामीण भागात, आदिवासी खेडीपाडी विकासापासून कोसो दूर आहेत. मुंबईसारख्या शहरात सर्व सुविधा उपलब्ध आहेत तर ग्रामीण भागातील शाळा विद्यार्थी संख्येचे कारण सांगून बंद केल्या जात आहेत किंवा खासगी क्षेत्रातील कंपन्यांना विकायला सुरुवात केली आहे. देशाच्या आणि राज्याच्या आर्थिक नियोजनासाठी उपलब्ध संसाधनांचे समान न्यायाने वाटप करण्यासाठी जातीनिहाय जनगणना आवश्यक आहे असे ते म्हणाले.
आर्किटेक्ट अर्शद शेख यांनी सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली. ते म्हणाले, ‘सबका साथ सबका विकास नसून सबका साथ आणि ठराविक कार्पोरेट आणि सत्ताधारी यांचा विकास’ असे सध्याच्या सरकारचे धोरण आहे. सर्वांचा विकास करायचा असेल तर जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, असा आग्रह त्यांनी केला.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसेक्रेटरी कॉ.डॉ.राम बाहेती म्हणाले की, राज्यभर जिल्ह्याजिल्ह्यांत जातीनिहाय जनगणना परिषदा सुरू असून ता.६ सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथे राज्यव्यापी परिषद होणार आहे. त्याची तयारी सुरू असून कोल्हापूरचे नवनिर्वाचित खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत व स्त्री आणि लिंगभाव अभ्यास विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणेचे प्रा.डॉ.संजयकुमार कांबळे व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव कॉ.डॉ.भालचंद्र कांगो यांना निमंत्रित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जातिनिहाय जनगणना करा व ५० टक्के आरक्षण मर्यादा उठवण्यात यावी, अशी मागणी या परिषदेत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा सेक्रेटरी कॉ.ॲड.बन्सी सातपुते यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कॉम्रेड बाबा अरगडे, कारभारी उगले पक्षाचे जिल्हा सहसेक्रेटरी कॉ.ॲड.सुधीर टोकेकर, कॉ.संतोष खोडदे, प्रा.किसनराव माने, श्रीधर आदीक, पांडुरंग शिंदे, किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष बबनराव सालके, सेक्रेटरी कॉ.आप्पासाहेब वाबळे, आर.डी.चौधरी, प्रताप साहाणे, ॲड.ज्ञानदेव साहाणे, ॲड.भागचंद उकिर्डे, कॉ.भगवान गायकवाड, दशरथ हासे, गणेश कसबे, बापूराव राशिनकर, प्रा.विलास नवले,भास्कर खांडगे, लता मेंगाळ, निवृत्ती दातीर, नंदु उमाप, लक्ष्मण शिंदे, संतोष लहासे, मंगल कोल्हे, वैशाली देशमुख, सुवर्णा देशमुख, शितल थोरवे, सुधाकर निळ, गोरक्षनाथ काकडे आदी उपस्थित होते.
कॉ.संजय नांगरे यांनी स्वागत केले तर बबनराव लबडे यांनी आभार मानले. तालुका सेक्रेटरी कॉ.संदिप इथापे व वैभव शिंदे यांनी सुत्रसंचलन केले.
महायुती सरकारने केवळ लाडकी बहिण, भाऊ अशा मतांसाठी घोषणाबाजी करण्यापेक्षा खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण व्हावे, यासाठी प्रयत्न करावेत. जातीनिहाय जनगणना आणि स्त्रियांची आजची परिस्थिती सक्षम करण्याची गरज आहे.
– कॉम्रेड स्मिता पानसरे, प्रदेशाध्यक्षा भारतीय महिला फेडरेशन, महाराष्ट्र
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा