ग्रंथपरिचय |२४ ऑगस्ट श्रध्दा कुंभोजकर
‘द इंडियन्स‘ हे पुस्तक एक ठाम संशोधकीय विधान करतं. दक्षिण आशियाचा गेल्या सुमारे बारा हजार वर्षांचा म्हणजे होलोसीन युगाचा इतिहास History लिहिण्याची जबाबदारी या पुस्तकानं पेलली आहे. भारतीय उपखंडात या बारा हजार वर्षांमध्ये माणसाच्या जगण्यात कसकसे बदल होत गेले यावर विविध विषयांच्या एकशे पाच अभ्यासकांनी आपापल्या अभ्यासांचा अनुभव गाठीशी ठेवून आणि संशोधनाचं पद्धतिशास्त्र सांभाळून पुराव्यांनिशी या कालखंडावर लेख लिहिले आहेत. ज्याला शास्त्रीय संशोधनाचं पद्धतिशास्त्र म्हणतात, त्याची पथ्यं पाळून संशोधकीय शिस्तीने लिहिलेला असा हा दक्षिण आशियाच्या इतिहासाच्या अभ्यासकांसाठी उपयोगी पडेल असा संदर्भग्रंथ आहे.
खरं तर ज्या विषयात आपण विशेष प्रशिक्षण घेतलं आहे त्यावर संशोधनाची शिस्त पाळून लिहिणं यात काही विशेष आहे असं मानायला नको. पण इतिहास हा विषय माणसांनी आपापल्या ओळखीसोबत, अस्मितेसोबत जोडलेला असल्यामुळे, त्या विषयाबाबत आस्था असणाऱ्या पण प्रशिक्षण नसणाऱ्या कुणीही उठून इतिहासाबाबत विधानं करावीत, संदेश, चित्रं एकमेकांकडे ढकलावीत आणि त्यातली आपल्या अस्मितेला कुरवाळतील ती कथनं खरी मानून चालावं अशी सध्याची रीत आहे. ज्ञान या गोष्टीचं अतोनात किरकोळीकरण केलं गेलं आहे. कुणी आपलं संपूर्ण आयुष्य देऊन केलेल्या अभ्यासावर जे ज्ञान निर्माण करतात, त्या ज्ञानाला बहुतेक वेळा काही किंमत दिली जात नाही. स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान् सर्वत्र पूज्यते असं संस्कृत वचन असेल, तरीही विद्वत्तेपेक्षा आपल्या मनातल्या प्रतिमेला सुसंगत असणारी माहितीच हा समाज खरी धरून चालतो. हातात आलेल्या पुराव्यांचा अस्सलपणा, विश्वासार्हता तपासून पाहून त्यानंतर लिहिला गेलेला इतिहास ही गोष्ट दुर्मिळ झालेली आहे. त्यामुळे संशोधनाच्या पद्धतिशास्त्राची पथ्यं पाळून लिहिलेल्या या पुस्तकात लेख लिहिण्याची संधी मिळाली याबाबत मला कृतज्ञता वाटते.
भारतीय उपखंडाचा गेल्या बारा हजार वर्षांचा इतिहास लिहिण्याची जबाबदारी देऊन केंद्र सरकारनं स्थापन केलेल्या समितीमध्ये नर्मदेच्या दक्षिणेकडचा एकही माणूस नाही, एकही स्त्री नाही, हिंदू सोडून कोणत्याही धर्माची माणसं नाहीत. आश्चर्य म्हणजे केंद्र सरकारनं इतकी महत्त्वाची जबाबदारी देऊनही २०१७ पासून आजतागायत एक ओळदेखील या समितीनं प्रकाशित केली नाही.
२०१९-२० च्या दरम्यान समितीच्या स्थापनेला तीन वर्षे लोटली आणि तिची सदस्यसंख्या वाढवली तरीही इतिहासलेखनात काही प्रगती झाली नाही. अशा स्थितीत प्रा. देवींनी ही जबाबदारी घेऊन जे काम केंद्र सरकारच्या समितीनं करायला हवं होतं, ते काम अंगावर घेतलं. इतकंच नाही तर चार वर्षांत ते पूर्ण करून शास्त्रशुद्ध पद्धतीनं लिहिलेला बारा हजार वर्षांचा इतिहास प्रकाशित केला. अर्थातच तो अतिशय लोकप्रिय झाला आणि त्याच्या अनेक आवृत्त्या लगोलग संपल्या.
“इतिहास हा चंद्रप्रकाशातल्या जगासारखा असतो. आपल्याला त्यातलं जे दहा टक्के दिसतं, त्याचा आपल्या परीनं आपण अर्थ लावत असतो.” असं सुंदर विधान प्रा. देवींनी मराठी आवृत्तीच्या प्रकाशन समारंभात केलं. इतिहासाचं असं अनिश्चित आणि बदलतं स्वरूप प्रा. देवी आणि त्यांचे सहकारी जाणत असल्यामुळे समाजाच्या विविध घटकांपर्यंत हा इतिहास पोचवावा यासाठी त्यांनी या पुस्तकाची चार भाषांमध्ये भाषांतरं करायला सुरुवात केली. मराठी भाषांतर ता. २४ ऑगस्ट रोजी प्रकाशित झालं.
मराठी वाचक म्हणून आपल्याला यातल्या अनेक गोष्टींचा विशेष आनंद वाटण्यासारखी परिस्थिती आहे. या पुस्तकात अनेक मराठी लेखक आहेत. जगाच्या पाठीवरच्या उत्तमोत्तम अभ्यासकांमध्ये इतके मराठी इतिहाससंशोधक समाविष्ट झाले आहेत ही चांगली गोष्ट आहे. इंग्रजीत लिहिली गेलेली सुप्रसिद्ध पुस्तकं वर्षानुवर्षांची प्रतीक्षा करूनही मराठी वाचकांना मराठी भाषेत मिळणं दुरापास्त असतं. मनोविकास प्रकाशनानं ते साहस केलं आहे.
याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे एके काळी मराठी लेखकवाचकांच्या जगात अतिशय मोकळिकीनं अभ्यासाच्या विषयांवर वाद-संवाद झडत असत. उदा. ‘भारतीय समाज आणि संस्कृती’ या ग्रंथात प्रा. म. अ. मेहेंदळे यांनी नवभारत मधल्या अनेक लेखांना प्रतिसाद म्हणून दिलेली अभ्यासपूर्ण पत्रं लेखाच्या स्वरूपात संग्रहित केलेली आहेत. अशी सशक्त वादाची परंपरा सध्या कुंठित झाल्यासारखी दिसते. लोक मुद्द्यांवर न बोलता गुद्द्यांनी बोलायला सरावत आहेत. या पुस्तकातल्या सर्वच लेखकांची मतं एकमेकांशी तंतोतंत जुळणारी नाहीत. पण संशोधन या गोष्टीचं सौंदर्यच यात आहे, की जे एखाद्या संशोधकाला दिसतं, ते मांडलं जातं. दुसऱ्या संशोधकाला काही वेगळं दिसलं, तर संवाद पुढे चालू ठेवून आपापले मुद्दे सर्व संशोधक मांडत राहतात. द इंडियन्स या पुस्तकाच्या माध्यमातून या संवादाच्या दिशेनं एक पाऊल पडलं आहे.
अशा स्थितीत या पुस्तकाचं मराठी वाचकांनी स्वागत करावं, त्यात जे खटकेल, त्यावर मुद्द्यांसहित टीका करावी, जे आवडेल, नवं कळेल-त्याचा आनंद मिळवावा असं या पुस्तकातल्या एका लेखाची लेखिका म्हणून आणि अनेक लेखांची वाचक म्हणून मला वाटतं.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा
संग्रही असावा असा संदर्भग्रंथ