देशमुख कुटुंबीयांनी घेतली महंत नामदेव शास्त्री यांची भेट
पाथर्डी | राजेंद्र देवढे, विशेष प्रतिनिधी
(politics) माझ्या वडिलांची अत्यंत अमानुषपणे हत्या केली गेली. एकही अवयव शाबूत नव्हता. हत्येमागचे कारण व पार्श्वभूमी ऐकून घेऊन त्यानंतरच तुम्ही वक्तव्य करायला हवे होते. गुन्हेगारांना कुणीही पाठीशी घालू नये. चांगले काम करायला गेले म्हणून माझ्या वडिलांची हत्या झाली. आरोपींचे समर्थन ज्यांना करायचे त्यांनी अवश्य करा. त्याबद्दल आम्हाला काही बोलायचे नाही. ज्यांना आरोपींची पाठराखण करायची तेच जातीवाद करतात. माझ्या वडिलांनी कधीही जातिवाद केला नाही. आमच्या शेतीत काम करणारे मजूरही वंजारी समाजाचे आहेत. जो माणूस दलितांना वाचवण्यासाठी गेला, ज्याने कधीही जातिवाद केला नाही, त्याला न्याय मिळावा म्हणून चाललेल्या लढ्याला एवढे फाटे का फुटतात ? तुम्ही आमचे गुरु आहात. तुमचा दर्जा खूप मोठा आहे. तुम्ही सर्व ऐकून घ्यायला पाहिजे होते. अशी आर्त साद वैभवी देशमुख यांनी भगवानगडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री यांना घातली.
(politics) संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी भगवानगडाला भेट देऊन गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांच्याशी चर्चा केली होती. मुंडे यांच्या समर्थनार्थ महाराजांनी पत्रकार परिषदेत घेत धनंजय यांना गुन्हेगार कसे ठरवता, असा सवालही केला. त्यानंतर संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी आज भगवानगडावर येऊन महतांबरोबर चर्चा केली. त्यांना पुरावेही दिले. गावाची सामाजिक व राजकीय पार्श्वभूमीही सांगितली. सुमारे तासभर जाहीररित्या ही चर्चा झाली. देशमुख कुटुंबीय काही मुद्द्यांवर आपला संताप लपवू शकले नाही. परंतु, त्यांनी अत्यंत संयमी शब्दात महाराजांना सूचक सवाल केले. महाराजांनीही लगेचच भूमिका जाहीर करत तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला. गडाचा पाठिंबा देशमुख कुटुंबियांच्या बाजूने राहील असे आश्वासन महंत डॉ. नामदेव शास्त्रींकडून घेऊन भगवानगडाच्या भूमिकेबाबत पुनर्विचारही करायला लावला. जेवढ्या तत्परतेने भगवानगडाने मंत्री धनंजय मुंडे यांना समर्थन दिले होते तितक्याच तत्परतेने देशमुख कुटुंबालाही तुम्ही गडाचे भक्त आहात, गड तुमच्या बरोबर राहील, असे महाराजांनी सांगितले. आज दुपारी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय व मुलगी वैभवी भगवानगडावर पोहोचले. तणावपूर्ण परिस्थितीत काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पाथर्डी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. वैभवीने अत्यंत पोटतिडकीने साश्रू नयनांनी कुटुंबाची बाजू व घटनेची पार्श्वभूमी महंतांसमोर मांडली.
(politics)यावेळी, धनंजय देशमुख म्हणाले की, आमच्या कुटुंबियांच्या संबंधात कधीच कोणता वाद झाला नाही. अवादा कंपनीत सुरक्षारक्षकाचे काम करणाऱ्या दलित बांधवाची ॲट्रॉसिटीची तक्रार घेतली असती तर संतोष देशमुख यांचा खून झाला नसता. गेल्या ५४ दिवसांपासून देशमुख कुटुंब न्यायासाठी झगडतेय. आरोपींची खरी मानसिकता तपासली असती तर ही गोष्ट घडली नसती. अनेक वेळा मी गडावर आलो. बाबांचे समाधीचे दर्शन घेतले. धार्मिक सामाजिक कार्यामध्ये सहभागी झालो. संतोष यांची शेती मुंडे परिवाराचे शेतकरी कुटुंब करत आहे. गावात जातीय सलोखा, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम नेहमी होत. गावाला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. आरोपींच्या विरुद्ध ४० ते ५० गुन्हे नोंदलेले आहेत. सगळ्या गावच्या तक्रारी एकीकडे आणि या आरोपींविरुद्ध असलेले गुन्हे एकीकडे एवढी गंभीर त्यांची पार्श्वभूमी आहे. गावाची गुन्हेगारी वृत्ती नाही. ज्याला आरोपीची बाजू घ्यायची तो जातीवादाचा रंग देतोय. त्या आडून कोणी जातिवाद करत असेल तर ते खरे जातीवादी आहेत. राज्यातील सर्व लोकप्रतिनिधी न्यायाच्या भूमिकेत असताना त्यांना चुकीचे ठरवू नका.
(politics) महंत डॉ. नामदेव शास्त्री म्हणाले की, जातिवाद न करता सामाजिक सलोखा कायम राहावा यासाठी देशमुख कुटुंब येथे आले आहे. माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला. संपूर्ण केज तालुका मस्साजोग गाव भगवानबाबांबरोबर आहे. मी तुमच्या पाठीशी आहे. तुम्हीही गडाचे शिष्य आहात. अनेक वर्षांपासून आपण येथे येत असल्याचे फोटो तुम्ही दाखवले. गुन्हेगारांचे फोटो व कागदपत्रे मला दाखवली. गड कधीही गुन्हेगारांच्या बाजूने नाही. भगवानबाबांच्या गादीवर बसलोय. आरोपींना पाठीशी घालणार नाही. त्यांना माफ करणार नाही. गादीवर बसून तुम्हाला शब्द देतो. संतोष व धनंजय देशमुखच्या पाठीशी गड उभा राहील. तुम्ही चिंता करू नका. तुम्ही गडाचेच आहात. कुठेतरी जातीचा रंग दिला जातोय. त्याला थांबवण्याची गरज आहे. संतोष देशमुख बाबांना मानणारे होते. ते मला आज कळाले. खऱ्या आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे. दरम्यान पुरावे बघितल्यानंतर उपस्थित सर्वांना त्यामधील मजुकराची अपेक्षा होती पण महंतांनी गडाचा महाप्रसाद घेण्याचा आग्रह देशमुख कुटुंबांना करत पुन्हा स्वतंत्रपणे चर्चा करत माहिती जाणून घेतली. यादरम्यान समजलेल्या माहितीनुसार भगवानगडानंतर देशमुख कुटुंब बीड जिल्ह्यातील नारायणगडावर सुद्धा जाणार आहे. नारायण गडावरील महंत शिवाजी महाराज यांची देखील देशमुख कुटुंब भेट घेऊन चर्चा करणार आहे सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील पुरावे घेऊन तेथील महंतांनाही वस्तुस्थिती सांगितली जाईल, अशी माहिती तेथील चर्चेतून समजली.
हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – श्रध्दा कुंभोजकर
Leave a Reply