अहमदनगर | २० नोव्हेंबर | प्रतिनिधी
Social मानवाधिकार अभियान, सीएसआरडी समाजकार्य व संशोधन संस्था, सहायक आयुक्त कार्यालय समाजकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व जिल्ह्यातील समविचारी संस्था, संघटना, महाविद्यालये व सामाजिक कार्यकर्ते यांच्या पुढाकारातून अहमदनगरमध्ये ता.२६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त ‘संविधान जागर महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले. यादृष्टीकोनातून संविधान जागर महोत्सव समन्वय समितीची बैठक नुकतीच पार पडली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा.महेबूब सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीमध्ये सामाजिक चळवळीमध्ये अग्रेसर असणारे ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक सब्बन यांची ‘संविधान जागर महोत्सवा’च्या स्वागताध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
या बैठकीस मानवाधिकार अभियानाचे प्रदेशाध्यक्ष ॲड.संतोष गायकवाड, संध्या मेढे, सॅम्युअल वाघमारे, युनूसभाई तांबटकर, दीपक अमृत, डॉ.प्रशांत शिंदे, सुधीर लंके, संजय कांबळे, डॉ.बापू चंदनशिवे, कॉ.भैरवनाथ वाकळे, अविनाश कांबळे, उद्धव काळापहाड आदी समन्वय समितीचे सदस्य उपस्थित होते.
अशोक सब्बन हे मागील ३० वर्षापासून अण्णा हजारे यांच्या समावेत कार्यरत असून भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे जिल्हाध्यक्ष म्हणून यापूर्वी त्यांनी कार्य केले आहे. सध्या ते राज्य सरचिटणीसपदी कार्यरत आहेत. यासोबत ते राष्ट्रीय लोकआंदोलनाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून तर भारतीय जनसंसद या संघटनेचे राज्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तसेच ते राज्यस्तरीय सल्लागार समिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे व विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती नाशिक विभागाचे अशासकीय सदस्य म्हणून कार्यरत आहेत. यशदा, पुणे व हैदराबाद येथील राष्ट्रीय पंचायत राज प्रशिक्षण केंद्राचे मास्टर ट्रेनर म्हणून माहिती अधिकार अधिनियम, पंचायतराज, आमचं गाव, आमचा विकास, शाश्वत विकास, ग्रामसभा, पाणलोट, दारूबंदी, रेशन धोरण, दप्तर दिरंगाई, सेवाहमी कायदा याविषयासह महापुरुषांचे विचार, संविधान जागृती आदी पुरोगामी विषयावर राज्यभर अनेक व्याख्याने व प्रशिक्षणे दिली आहेत.
त्यांनी पुरोगामी चळवळीत व अनेक सामाजिक जनआंदोलनामध्ये सक्रीय सहभाग व नेतृत्व केले. दिल्लीतील चार आंदोलनाचे नियोजन व नेतृत्व करत आपले योगदान दिले. संविधानातील नितीमुल्ये समाजामध्ये खोलवर रुजावीत म्हणून ते अविरत कार्यरत आहेत. संविधान जागर महोत्सवाच्या स्वागताध्यक्षपदी त्यांनी निवड झाल्यामुळे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
संविधान जागर महोत्सवाविषयी अधिक माहिती देतांना मानवाधिकार अभियानाचे प्रदेशाध्यक्ष ॲड.संतोष गायकवाड यांनी सांगितले, मानवाधिकार अभियानाच्या माध्यमातून दरवर्षी ‘संविधान दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. संविधान जागर महोत्सवाचे यंदाचे ७ वे वर्ष आहे. याही वर्षी २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन मोठ्या उत्सवाच्या स्वरुपात साजरा करण्याचा मानवाधिकार अभियान तसेच जिल्ह्यातील सर्व पुरोगामी संस्था संघटना यांचा मानस आहे.
समन्वय समितीच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार संविधान जागर महोत्सवांतर्गत यावर्षी संविधान रॅलीच्या सोबतच संविधनाचा अधिकाधिक प्रचार व्हावा म्हणून संविधान जागर रथ, पथनाट्य, संविधान गीते, प्रबोधनपर व्याख्याने, चर्चासत्रे, शासकीय योजनांची प्रचार प्रसिद्धी या स्वरुपात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर