Cultural Politics अहमदनगर जिल्ह्यात नुकत्याच विधानसभा निवडणूका पार पडल्या. यामधील सर्व विधानसभा मतदारसंघात चुरशीच्या ‘राजकीय गुंड्या’ झाल्या. अनेक मतदारसंघात किरकोळ वाद वगळता फार मोठे लफडे झाले नाही. बुधवारी ता.२० रोजी मतदान पार पडले. त्यापुर्वी जिल्ह्यात महाविकास आघाडीचे उध्दव ठाकरे यांची श्रीगोंदा, शरद पवार यांची वांबोरी व शेवगाव, शिर्डीमधे प्रियंका गांधी-वाड्रा, सुप्रिया सुळे व अभिनेते अमोल कोल्हे यांची अहमदनगर शहर, कर्जत जामखेडला जयंत पाटील यांच्या सभा झाल्या तर महायुतीच्या एकनाथ शिंदे यांची नेवासा, अजित पवार यांची भाळवणी व पारनेर, पाथर्डी येथे पंकजा मुंढे यांनी सभा घेतल्या.
महाविकास आघाडी आणि महायुतीने आपापल्या परीने मतदारांना आवाहन केले. याचा निकाल शनिवारी ता.२३ रोजी लागला. त्यात १२ आमदारांपैकी श्रीरामपूर, कर्जत – जामखेड वगळता १० आमदार हे महायुतीचे निवडून आले. आख्खा जिल्हा ‘भगवा’ झाला आणि शरद पवारांनी सभा घेतलेल्या उमेदवारांचा सुपडा साफ झाल्याचे चित्र पहायला मिळाले.
काही वर्षापूर्वी राष्ट्रवादीचे शरद पवार हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार कै. पी.बी. कडू पाटील याच्या स्मरणार्थ कार्यक्रमास आले असता त्यांनी, “एकेकाळी ‘लाल’ असलेला अहमदनगर जिल्हा ‘भगवा’ कधी झाला हे समजलेच नाही” अशा आशयाचे वक्तव्य केल्याची आठवण झाली. ते ‘करिश्मा’ असलेले शरद पवार आणि जिल्ह्यात दोन सभा घेऊनही ‘आपले’ आमदार निवडून आणू न शकलेले शरद पवार पाहिले की, त्या वक्तव्याची खंत वाटली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेत पुरोगामित्वाचा आव आणणार पक्ष आहे. ही पुरोगामी संघटनांना जाणीव असूनही ‘दगडापेक्षा वीट मऊ’ या न्यायाने संभाजी ब्रिगेडसह डावे पक्ष, पुरोगामी संघटना सतत सहकार्य करत असल्याचे दिसते. ‘निर्भय बनो’ चळवळ आपल्या बौध्दिक शक्तीसह सोबत असते. महान संतपरंपरेच्या पुरोगामी महाराष्ट्राला, भारतीय राज्यघटनेला असलेला धोका या पक्ष संघटनांनी वेळीच ओळखलेला आहे. यात राष्ट्रवादीवाले कुठेच नसतात.
राष्ट्रवादीने वेळोवेळी रा.स्व.संघाच्या प्रतिगामी शक्तींशी राजकारणाच्या नावाखाली हातमिळवणी केल्याने पुरोगामी संघटनांना अनेकदा खाली माना घालाव्या लागल्या. भाषणात फुले, शाहू, आंबेडकर तर वागण्यात सावरकर, गोळवलकर, टिळक असल्याचे अनेकदा दिसून आले. राष्ट्रवादीचे अनेक नेते कार्यकर्ते रोजच्या जीवनात प्रत्यक्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा राबवित असल्याचे दिसत असतात. ते रा.स्व. संघाच्या सांस्कृतिक राजकारणाच्या जाळ्यात अडकल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले, हे त्रिकालाबाधित सत्य आहे.
लाल जिल्ह्याला भगवा करण्यात हेच रा.स्व.संघाचे सांस्कृतिक राजकारण कारणीभूत आहे हे, शरद पवारांनी त्यांच्याच नेत्या कार्यकर्त्यांना सांगण्याची वेळ आली. राष्ट्रवादी पक्षाने सर्वात आधी आपल्या नेत्या कार्यकर्त्यांचा ‘सांस्कृतिक राजकारण’ या विषयावर ‘क्लास’ घेतला पाहिजे. त्यांना झोपेतून जागे केले पाहिजे. महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा पुरोगामी वारसा सांगितला पाहिजे. राज्यघटनेला असलेला धोका सांगितला पाहिजे. त्यांना या दिशेने कार्यरत केले पाहिजे. सांस्कृतिक राजकारणाची युध्दनिती समजून सांगितली पाहिजे.
‘निर्भय बनो’ची ॲड. असीम सरोदे, विश्वंभर चौधरी यांची अहमदनगर शहरात होणारी ता.१७ नोव्हेंबरची जाहीर सभा ‘शरद पवारांच्या राष्ट्रवादी’ उमेदवाराने रद्द केली, कारण काय तर “भाजपावाले मदत करणार आहेत, त्यांना या सभेतील वक्तव्याने वाईट वाटेल”. याच मनोवृत्तीने ‘लाल’ अहमदनगर जिल्ह्याला ‘भगवा’ करण्यात हातभार लावल्याचे स्पष्ट होत आहे.
पुरोगामी चळवळी, डावे पक्ष त्याबाबतीत पुढारलेले आहेत. त्यांना संकटांची जाणीव असून ते सतत कार्यरत असतात, हे लक्षात ठेवले पाहिजे.