अहमदनगर | ९ सप्टेंबर | प्रतिनिधी
Crime आरएसएस भाजपाचा पुढारी दिवंगत दिलीप गांधीच्या उचापतींमुळे २९१ कोटी रूपयांपेक्षा जास्त रकमेच्या घोटाळ्यामुळे जिल्ह्यासह राज्यात गाजत असलेल्या अर्बन बँकेचा नवाच पैलू समोर येत आहे. बँकेच्या कोणत्याही पदावर नसलेला फरार सीए विजय मर्दा याने अर्बन बँक मल्टीस्टेटच्या प्रकरणात उच्च न्यायालयात अगोदरच कॅव्हेट दाखल करून ठेवले होते.
याबाबत सविस्तर माहिती देताना बँक बचाव समितीचे शिलेदार तथा माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी सांगितले, फॉरेंसिक ऑडीटरने फ्रॉड कर्जप्रकरणांची वेगळी यादी केली. या फ्रॉड कर्जप्रकरणांमध्ये एकूण २९१ कोटींचा घोटाळा झाल्याचा निष्कर्ष काढला. या फ्रॉड कर्जप्रकरणांमुळेच बँक बंद पडली, हे त्यांनी सिध्द केले. ही सर्व फ्रॉड कर्जप्रकरणे ४.४.२०१३ नंतरची आहेत. ता.४.४.२०१३ रोजी आपल्या नगर अर्बन बँकेचे रूपांतर मल्टीस्टेटमध्ये करण्यात आले.
ते पुढे म्हणाले की, बँक मल्टीस्टेट करून लूटायचा प्लान त्यावेळच्या २५ पैकी १३ संचालकांच्या लक्षात आला. या सजग संचालकांनी प्रथम केंद्रीय निबंधकांकडे तक्रार करून “मल्टीस्टेट दर्जा नको” अशी रितसर मागणी केली. नंतर उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात तशी मागणी केली. आम्ही उच्च न्यायालयात जाणार ही शक्यता गृहीत पकडून मल्टीस्टेट दर्जाचा कट रचणारे दोन ‘मास्टर माइंड’ दिलीप गांधी व सीए विजय मर्दाने उच्च न्यायालयात अगोदरच कॅव्हेट दाखल करून ठेवले होते. विशेष म्हणजे दिलीप गांधी चेअरमन होते त्यांनी कॅव्हेट दाखल करून ठेवणे समजू शकते, परंतु विजय मर्दा हा तर बँकेच्या कोणत्याच पदावर नव्हता मग त्याने कॅव्हेट का दाखल केले?
नगर अर्बन बँकेची अनेक फ्रॉड कर्जे ही विजय मर्दाशी संबंधित आहेत व विजय मर्दा सध्या फरार आहे. नगर अर्बन बँक लूटमारीची पुर्ण कहानी यात आली आहे, अशी माहिती माजी संचालक तथा बँक बचाव समितीचे राजेंद्र गांधी यांनी दिली.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा