धर्मवार्ता | ५ सप्टेंबर | माया गुगळे जैन
Religion भारतीय ऋतू तीन, त्यातील एक पावसाळा म्हणजे, ‘जैन परपंरे’नुसार चार महिन्यांचा चातुर्मास कालखंड, १२० दिवसांचा सोहळा ऋषीमुनि आणि भगवंताच्या वक्तव्यावरून असे वाटते की, पृथ्वी ही याच वेळी गर्भवती असते म्हणूनच जैनमुनि हे जीवांची रक्षा म्हणून पायी प्रवास करीत नाही. अनेक जीवांची उत्पती, अहिंसक कृत्य होवू नये म्हणून सद्विवेकबुध्दीने एका पर्वाची आठ दिवस उपासना चालू असते, त्याला ‘पर्युषण पर्व’ संबाेधले जाते.
वैष्णव मान्यतेनुसार श्रावणी सोमवार, हरतालिका असे अनेक उपवास केले जातात तेही याच दिवसांत, कारण या मान्यतेनुसार कुठलेही देव या चार महिन्यात पृथ्वीतलावर नसतात. ते सर्व पाताळात असल्याकारणाने आराधना, साधना आणि उपासनेशिवाय पर्याय नाही. खर म्हणजे नवरात्रीतदेखील नऊ दिवस देवी ही उपासनेला आणि तपश्चर्येला बसलेली असते. तेव्हा घंटा वाजवायचा किंवा दर्शनाचा अधिकारही नाही, पण काही अज्ञानपणे किंवा चुकीच्या परंपरामुळे ही प्रथा पडली असावी. दसऱ्याच्या दिवशी जेंव्हा देवी राक्षसांचा वध करून पुन्हा झोपते ते खरे दर्शन, देवी म्हणजे शक्ती होय.
पुढे जावून दिवाळीनंतर विष्णु एका महिन्यासाठी पृथ्वीतलावर असतात; म्हणूनच काही ज्योतीषकार किंवा वास्तुकार गृहप्रवेशाला मान्यता देतात. जैन परंपरा ही तशी रूक्ष आणि जाणून घेण्याइतपत क्लिष्टही आहे. ‘पर्युषण पर्व’ ही आठदिवस आपली खरी कमाई, आत्मपरिक्षण व आत्मकल्याणाचे आणि पुण्य साठविण्याचे एकमेव वर्षातील केवळ आठच दिवस. जीजी उच्च कोटीतील आत्मे मोक्षगामी झाली ती याच काळात. अंतगडसूत्रात वर्णन केलेले अनेक मुक्त आत्म्यांचे दर्शनही याच आठ दिवसात वाचनात पहायला मिळते. २२ वे तीर्थंकर श्री अरिष्टनेमी भगवंता पासून व श्रीकृष्ण महाराजांपर्यंतचे वर्णन व भगवान महावीरांपासून ते ऐवंतीमुनिंपर्यंतचे वर्णन वाखाणण्याजोगे आहे.
बाह्यप्रदर्शनास महत्व न देता आत्मप्रदर्शन आणि आत्मभेद विज्ञानास महत्व देता आले पाहिजे. त्यासाठी असा एक पर्व वर्षातून एकदा येतो. तो दिवस म्हणजे ‘संवत्सरी पर्व’ सामुहिक क्षमापना दिवस. वर्षातून झालेल्या काही चुका आत्मपरिक्षण आणि स्वदर्शनातून समोरच्याला माफीचा भाव, प्रत्येक जीवांशी मैत्रीभाव, करुणाभाव, अहोभाव असावा. प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे असे दर्शन करवणारा एकमेव ‘जैन दर्शन’ आगळे-वेगळे बघायला मिळणारे असे हे पर्व आहेत. मनुष्य जन्माने नाही तर कर्माने महान असतो. ‘जैन’ जै वर दोन मात्रा म्हणजे राग आणि द्वेषाला सोडतो, तो खरा जैन. जिनेश्वर भगवंताच्या आज्ञेत राहून कार्य करतो, तोच खरा जैन.
जैन ही वेगळी जात किंवा समाज नाही. जैन हा धर्म आहे. जो जैन धर्मात राहून जैनांसारखे आचरण करतो तो कुणीही जैनी असू शकतो. रात्रीभोजन, कंदमुळ हे साधनेला वर्जनीय आहेत. म्हणून या दिवसात उपवास, उपासना, साधना करावी, अशी भगवंताची इच्छा. खरे ज्ञान हे संपन्न लोकांपर्यंत पोहोचावे आणि आत्म्याचे कल्याण व्हावे हीच, आमुची प्रार्थना.
(लेखिका माया गुगळे जैन या वास्तूशास्त्र मार्गदर्शक आहेत : 8275201366)
कृपया, लेख वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा
लेख आवडल्यास अथवा काही सुचना असल्यास येथे कॉमेंट करून कळवाव्यात