फोंडा | ३० सप्टेंबर | प्रतिनिधी
goa news गोव्यात भौतिक प्रगती आणि आर्थिक प्रगतीचे प्रदर्शन करणारे अनेक क्लब आहेत. मात्र आंतरिक आत्म्याची सुबत्ता वाढविणारा आणि वैश्विक मानवतेशी आपले नाते वृध्दिंगत करणारा सम्राट क्लब हा एकमेव असल्याचे उद्गार ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर ढगे यांनी येथे काढले.
येथील कवळे पंचायत सभागृहात आयोजित सम्राट क्लब कपिलेश्वरीच्या पदग्रहण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून ढगे बोलत होते. यावेळी नूतन अध्यक्ष मच्छिंद्र च्यारी, सचिव सचिव सचिन प्रभुदेसाई, कोषाध्यक्ष रत्नदीप नाईक, राजेश्री खांडेपारकर, प्रशांत चिमुलकर, दिवाकर शिंक्रे, सुधाकर नागेशकर आदी मंचावर उपस्थित होते.
प्रभाकर ढगे पुढे म्हणाले, गेल्या ५० वर्षांत ५० संस्था उभ्या करणाऱ्या सम्राट क्लबने कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रात मोठी कामगिरी करून दाखविली. नृत्य, नाट्य, संगीत, गायन या कलांचे जतन आणि संवर्धन करण्याबरोबरच कायमस्वरूपी संस्था उभ्या केल्या आहेत. गोव्याच्या सांस्कृतिक संचिताचे देशातच नव्हे तर जागतिक पातळीवर दर्शन घडविले, ही फार मोठी कामगिरी आहे.
सम्राट क्लबच्या आजपर्यंतच्या लौकिकास साजेसे कार्य करण्याबरोबरच जास्तीत जास्त शाखा आणि सदस्य वाढविण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे मच्छिंद्र च्यारी यांनी अध्यक्षीय मनोगतात सांगितले.
यावेळी सम्राट क्लबच्या ५० वर्षांच्या वाटचालीवर चित्रफित दाखविण्यात आली. सुचित्रा बांदेकर व शर्मिला प्रभुदेसाई यांनी प्रास्तविक केले. अनिता तारी यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. राजेश्री खांडेपारकर, ममता बदामी यांनी मनोगत व्यक्त केले. सचिव सचिन प्रभुदेसाई यांनी आभार प्रदर्शन केले.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा