Urban bank | 22 कोटींच्या घोटाळ्याला 8 वर्षे; ठेवीदारांना न्याय कधी? गांधींचा संतप्त सवाल

व्हॉईट कॉलर आरोपी मोकाट

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

अहमदनगर | ३.६ | रयत समाचार

(Urban bank) नगर अर्बन बँक पिंपरी चिंचवड शाखेतील २२ कोटी रुपयांच्या घोटाळ्याला तब्बल आठ वर्षे उलटून गेली, मात्र अद्याप आरोपींवर ठोस कारवाई होत नसल्याने ठेवीदारांना न्याय कधी मिळणार, असा संतप्त सवाल अर्बन बँक बचाव समितीचे प्रमुख शिलेदार आणि नगर अर्बन बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी उपस्थित केला.

(Urban bank) गांधी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ मार्च २०१८ रोजी नगर अर्बन बँकेत तब्बल २२ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात बँकेचे तत्कालीन चेअरमन, संचालक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा थेट सहभाग असल्याचा दावा करत त्यांनी ही लूटमार लपवून ठेवण्यात आल्याचे म्हटले आहे. ऑडिटर व्यवस्थापित केल्यामुळे ऑडिट अहवालात गंभीर बाबी समोर आल्या नसल्याचाही आरोप त्यांनी केला.

(Urban bank) या प्रकरणातील गैरप्रकार भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आल्यानंतर बँकेच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होऊ शकतो, या कारणास्तव तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त करून १ ऑगस्ट २०१९ पासून प्रशासक नेमण्यात आल्याचे गांधी यांनी सांगितले.

प्रशासकांनी जानेवारी २०२१ मध्ये चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. काही संचालक, कर्जदार आणि संबंधित व्यक्तींना अटक झाली असली तरी उर्वरित बहुतांश आरोपी फरार झाल्यानंतर कोरोना काळाचे कारण पुढे करत अटकपूर्व जामीन मिळवण्यात यशस्वी झाले.

विशेष म्हणजे, ठेवीदारांची थेट फसवणूक झाल्याचे दिसत असूनही तपास यंत्रणांनी ‘महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्या’अंतर्गत (MPID) गुन्हे दाखल केले नाहीत, तसेच कोरोना संपल्यानंतर आरोपींचे जामीन रद्द करण्यासाठीही प्रयत्न झाले नाहीत, असे गांधी यांनी म्हटले.

या प्रकरणाचा तपास पूर्ण करण्यासाठी तब्बल चार वर्षे लागली आणि एप्रिल २०२५ मध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले. मात्र त्यानंतर झालेल्या कोणत्याही सुनावणीस आरोपी हजर राहिले नसल्याचा आरोप करत आरोपींना न्यायालयात हजर करण्यासाठी पोलिसांनी प्रभावी प्रयत्न केले नसल्याची टीका गांधी यांनी केली.

Production of Accused या एकाच कारणामुळे प्रकरणात ‘तारीख पे तारीख’ सुरू असून आरोपी निर्धास्त फिरत आहेत. ठेवीदारांचे संपूर्ण पैसेही परत मिळालेले नाहीत. लूट होऊन आठ वर्षे झाली, आता आणखी किती वर्षे वाट पाहायची? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

या प्रकरणाची पुढील सुनावणी उद्या होणार असून ठेवीदारांचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे.

India news | आरक्षण, स्पर्धा परीक्षा आणि लॅटरल एन्ट्री : नेमकं कुणासाठी चाललंय सरकार?


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading