Student Protest Analysis | विद्यार्थी आंदोलन केवळ 'बायनरी'तून समजणार नाही; दत्ता देसाई यांचे विश्लेषण; बदलत्या सामाजिक वास्तवाचे 1भान ठेवण्याची वेळ - Rayat Samacharविद्यार्थी आंदोलनाचे सामाजिक वास्तव : दत्ता देसाई यांचे Student Protest Analysis

Student Protest Analysis | विद्यार्थी आंदोलन केवळ ‘बायनरी’तून समजणार नाही; दत्ता देसाई यांचे विश्लेषण; बदलत्या सामाजिक वास्तवाचे 1भान ठेवण्याची वेळ

राहुल-मोदी, हजारे-केजरीवाल, वांगचुक-सीजेपी या चौकटींपलीकडे जाऊन विद्यार्थीयुवा आंदोलन समजून घेण्याची गरज

rayatsamachar
5 Min Read
दत्ता देसाई : विद्यार्थी आंदोलनाचे सामाजिक व राजकीय विश्लेषणSubEditor | Dipak Shirasath

समाजसंवाद | २०.७ | दत्ता देसाई

(Student Protest Analysis) काही मित्र, पत्रकार व कार्यकर्ते अजूनही विद्यार्थ्यांचे आंदोलन हे “केजरीवाल-२ प्रयोग” आहे का, ते राहुलच्या विरोधात आहे का, ते संघ हस्तकांचे आहे का, मुळात CJP हा पक्ष तरी आहे का वगैरे चर्चेत आहेत. यातील काही मुद्द्यांत तथ्यांश असेलही, त्यांनी असा शोध जरूर घेत राहावे.

(Student Protest Analysis) पण मुद्दा इथंच न थांबता, आणखी थोडं खोलात जाण्याचाही आहे. गंभीर विश्लेषक, पत्रकार, कार्यकर्ते यांनी फक्त व्यक्ती [मग ते वांगचुक असोत, दिपके असो, राहुल असो वा केजरीवाल], पक्ष, प्रचार आणि दर्शनी घडामोडी यांच्यात अडकायचे नसते. त्यांच्या पाठीमागेही जे काही वास्तव असते, ते शोधायचे असते. राजकारणात ‘डिझाईन’ व कट-कारस्थाने नक्की असतात, पण त्यांच्या मागे व पलीकडे काही प्रक्रिया असतात. अपप्रचार, गैरसमज आणि वैचारिक गंडवागंडवी असते, पण त्याच्या मागे लोकांची काही शहाणीव, काही अनुभवजन्य जाणीवा आणि सैल-घट्ट विचारसरणी असतात. अस्मिता वा अनागोंदी कार्यरत असते, पण त्याच्या मागे वर्गीय-जातीय शक्तींचे चलनवलन असते. याचेही भान ठेवावे लागते. ते न ठेवल्याने सरधोपट उत्तरे मिळाल्याचं समाधान तर साधतं, पण प्रश्न सुटत नाहीत.

(Student Protest Analysis) एक ‘लोकप्रिय’ प्रकरण घ्या. अण्णा हजारे-केजरीवाल. या प्रकरणात संघ-भाजप-माध्यमे वगैरे गुंतले होते की नाही? नक्की होते. पण केवळ त्यामुळे कॉंग्रेसचा पाडाव झाला हे झाले सोपे- सोयीस्कर ‘सत्य’ [अर्धसत्य]. मुळात अडीच दशकांची बाजारवादी-जातजमातवादी धोरणे आणि कोंडी यामुळे लोकांमध्ये काही असंतोष होता की नाही? उपजीविकेची- नोकऱ्यांची असुरक्षितता, शेतकरी आत्महत्या, विविध समूहांचे उखडले जाणे- विस्थापन, महागडे शिक्षण- आरोग्य, विकासाची कुंठीतावस्था, सांस्कृतिक हरवलेपण, जातजमातवादी ध्रुवीकरण आणि कार्पोरेटकेंद्री व विषमता वाढवणारा विकास यातून चीड व असंतोष हे उद्भवू लागले होते की नाही? वेगवेगळ्या कारणांनी मध्यमवर्ग, कामगार-कर्मचारी, शेतकरी, ओबीसी, दलित- आदिवासी विभाग अस्वस्थ झाले होते की नाही? देशातील वर्गीय- जातीय व केंद्रीय- प्रादेशिक बलाबल बदलत चालले होते की नाही?

Student Protest Analysis विद्यार्थी आंदोलनावरील दत्ता देसाई यांचे विश्लेषणात्मक लेख

या साऱ्यात एक गोष्ट विसरता कामा नये ती ही की लोकांची अस्वस्थता व त्यांचा असंतोष, युवापिढी- महिला- ओबीसी- अल्पसंख्य- दलित आदी विभागांची नवा पर्याय शोधण्याची आस ही खोटी नव्हती. त्या शोधात यातील अनेक विभाग भाजपकडे वळले.
याचं कारण या साऱ्याला भ्रष्टाचारविरोध, देशभक्ती, रामभक्ती, विकास आणि महासत्ता वगैरेच्या स्वत:च्या सोयीच्या संदेशात परिभाषित करून संघ- भाजपने हजारे- केजरीवाल प्रकरणाच्या मदतीने हवं तसं वळण दिलं. यात सट्टेबाज व मक्तेदारी व्यापारी- वित्त भांडवल, कंत्राटदार- दलाल- सटोडिये आणि फिक्सर्स, प्रशासकिय व सरकारी यंत्रणा [हे सारे मोठ्या प्रमाणावर पूर्वी कॉंग्रेसबरोबरच होते, बाय द वे!] याना हवं असलेलं अधिक बाजारवादी, ‘उजवं’, लोकविरोधी वळण आणखी स्पष्टपणे आकाराला आलं. देशी- विदेशी शक्ती व यंत्रणा त्यांच्या त्यांच्या स्वार्थासाठी अधिक क्रियाशील झाल्या. त्यांचे संघ- भाजप- समाजमाध्यमे- गोदी मिडिआशी लग्न लागलं. असं जर असेल तर मग केवळ ‘हजारे-केजरीवाल केंद्री’ वा उलट बाजूने ‘मोदी-राहुल गांधी केंद्री’ विश्लेषणाचे चष्मे कसे पुरे पडतील?
आज परिस्थिती आणखी वाईट झाली आहे, टोकाला चालली आहे, गुणात्मक दृष्ट्या अधिक घातक अवस्थेला भाजप-संघाने नेऊन पोहोचवली आहे. लोक कोंडी आणि घुसमट अनुभवताहेत, प्रत्येक ठिकाणी नैराश्य आणि चीड आहे…अशावेळी मिळेल ते – लक्षात घ्या इतिहासात हे हजार वेळा दिसलेलं आहे की ‘मिळेल ते’ – माध्यम वा हत्यार घेऊन लोक अभिव्यक्त होतात, कृती करतात, लढतात. आज भारतात युवक-युवती आपापल्या संघटना वा पक्ष घेऊन [यात कॉंग्रेस, डावे, प्रादेशिक व अन्य लोकशाहीवादी पक्ष आले], किंवा विस्कळीतपणे पण उत्स्फूर्तपणे CJP- वांगचुक निमित्ते उभ्या झालेल्या माध्यमातून व या विशिष्ट क्षणाला [moment] व्यक्त होताहेत, लढताहेत. त्यात जाणीवा व राजकीय समज ही विविध स्वरूपाची, वेगवेगळ्या पातळीची, मतभेदाची आणि काही वेळा गोंधळाची असणे स्वाभाविक आहे.

हे ही पहा : Protest | अहिल्यानगरमधील सोनम वांगचुक समर्थनार्थ निघालेला पहिला मोर्चा Live पहा 

- Advertisement -
ज्यांना बदलते वर्गीय- जातीय बलाबल व सामाजिक शक्तींची जुळणी कळत नाही, ज्यांना उत्स्फूर्तपणा व संघटीत- जाणीवपूर्वक कृती यातील अस्थिर नातं समजत नाही, ज्यांना त्या त्या क्षणी फक्त त्यांनी स्वत: निवडलेल्या भूमिका व पर्याय हेच अचूक व योग्य वाटतात आणि ज्यांना संमिश्र व गोंधळाच्या अवस्थेत देखील जागणाऱ्या, विकसित व क्रियाशील होणाऱ्या आम जनतेच्या- युवा वर्गाच्या- कष्टकऱ्यांच्या शक्तींमधील संभाव्य क्षमता ओळखता येत नाही, ते जुन्या चष्म्यांना व चाकोरींना चिकटू पाहतात.
आजच्या नव्या घडामोडींमध्ये अस्थिरता, अनिश्चितता व ताण आहे म्हणून त्यात जसे धोके आहेत तशा नव्या सर्जनशील शक्यताही आहेत. या विद्यार्थी-युवा आंदोलनाचे स्वरूप, मागण्या, परिभाषा, संयम-चिकाटी आणि पाठिंबा पाहता त्याला नाकारणे, खच्ची करणे, मोडीत काढणे हे करंटेपणाचे ठरेल. राहुल/मोदी, हजारे-केजरीवाल/दिपके-वांगचुक, भाजप/कॉंग्रेस या ‘बायनरी’च्या पलीकडेही काही सामाजिक वास्तव आहे, आकार घेऊ शकते आणि घेते आहे याचं भान ठेवणं आज घडीला आवश्यक आहे.

Tukaram Abhang | संतवाणी : ‘संतां नाहीं मान’ तुकोबांच्या अभंगाचा खरा अर्थ !

विद्यार्थी आंदोलनाचा अर्थ केवळ मोदी-राहुल किंवा केजरीवालच्या चौकटीत शोधू नका : दत्ता देसाई

विद्यार्थी आंदोलनामागे नेमके काय घडते आहे? हे फक्त मोदी-राहुल, केजरीवाल-हजारे किंवा वांगचुक-सीजेपी या चौकटीतून समजणार नाही, असे प्रतिपादन दत्ता देसाई यांनी या सविस्तर लेखातून केले आहे.


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading