श्रीगोंदा | १५.९ | माधव बनसुडे
Mi Savitribai Phule Bolte: महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त निमगाव खलू (ता. श्रीगोंदा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा राहुल भुजबळ यांनी ‘मी सावित्रीबाई फुले बोलते’ हे प्रभावी एकपात्री नाटक सादर केले. या नाट्यप्रयोगातून सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संघर्षमय जीवनाचा तसेच समाजपरिवर्तनासाठी केलेल्या कार्याचा प्रेरणादायी जीवनपट विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांसमोर उलगडण्यात आला.
सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेतून सुवर्णा भुजबळ यांनी स्त्रीशिक्षणासाठी केलेला संघर्ष, सामाजिक रूढी-परंपरांना दिलेले आव्हान, शिक्षणाचा प्रसार, सामाजिक समता, अस्पृश्यता निर्मूलन आणि वंचित घटकांसाठी फुले दाम्पत्याने केलेले कार्य प्रभावीपणे मांडले. प्रतिकूल परिस्थिती, समाजाचा विरोध आणि अनेक अडचणींचा सामना करूनही सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांनी शिक्षण व सामाजिक सुधारणेचा घेतलेला वसा कसा पुढे नेला, याचे प्रभावी चित्रण नाट्यप्रयोगातून करण्यात आले.

विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांनी केलेला संघर्ष, शिक्षिका म्हणून बजावलेली भूमिका तसेच समाजातील उपेक्षित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी फुले दाम्पत्याने केलेले प्रयत्न विद्यार्थ्यांसमोर नाट्यरूपातून मांडण्यात आले. सावित्रीबाईंच्या जीवनातील त्याग, धैर्य, संघर्ष आणि समाजपरिवर्तनाची तळमळ यांचे प्रभावी सादरीकरण झाल्याने उपस्थित विद्यार्थी व ग्रामस्थ भारावून गेले.
केवळ पाठ्यपुस्तकातील माहिती न देता इतिहासातील महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वांचे कार्य नाट्यरूपातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम ठरला. फुले दाम्पत्याचे विचार, शिक्षणाचे महत्त्व, स्त्री-पुरुष समानता आणि सामाजिक समतेचा संदेश विद्यार्थ्यांच्या मनावर ठसविण्यात या कार्यक्रमाला यश आले.
कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री. रमेश दत्तू कुसळकर, श्रीमती आरती चौघुले, श्री. रवींद्र त्रिभुवन, श्रीमती वृषाली दगडे, श्री. नामदेव गवळी यांच्यासह मार्गदर्शक प्रा. पुंडलिकराव भामोदे (जि. अकोला), सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री. जनार्धन गणपत भागवत (पुणे शहर), सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती ताई मोहन खेडेकर आणि श्रीमती शकुंतला जनार्धन भागवत यांची प्रमुख उपस्थिती होती.
फुले दाम्पत्याच्या विचारांचा व सामाजिक कार्याचा परिचय विद्यार्थ्यांना नाट्यरूपातून करून देणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला. विद्यार्थ्यांनी एकपात्री नाट्यप्रयोगाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचा संदेश दिला.
Observational Short Film | चित्रपटनिर्मिती शिकणाऱ्यांसाठी : निरीक्षणप्रधान लघुपट म्हणजे काय?
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


