Anand Parshva Gurukul: आनंद पार्श्व गुरुकुलमध्ये 7 डिजिटल बोर्डांचे अनावरण; विद्यार्थ्यांना मिळणार आधुनिक शिक्षण

Anand Parshva Gurukul: आनंद पार्श्व गुरुकुलमध्ये सात डिजिटल बोर्डांचे अनावरण; आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणार गुणवत्तापूर्ण शिक्षण

rayatsamachar
3 Min Read
SubEditor | Dipak Shirsath

अहिल्यानगर | ३०.१० | पंकज गुंदेचा

Anand Parshva Gurukul: महाराष्ट्र प्रवर्तक प.पू. कुंदनऋषीजी म.सा. आणि संस्कार दिवाकर प.पू. आलोकऋषीजी म.सा. यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या आनंद नवकार परिवार ट्रस्टच्या वतीने अकोळनेर रोड, केडगाव येथील आनंद पार्श्व गुरुकुलमध्ये सात डिजिटल बोर्ड बसविण्यात आले आहेत. या डिजिटल बोर्डांचे अनावरण आणि अध्यापन शुभारंभ सोहळा आज संतांच्या सानिध्यात तसेच दानशूर व्यक्ती व लाभार्थी परिवारांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.

 

आनंद पार्श्व गुरुकुलच्या नवीन इमारतीमध्ये पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग सुरू असून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, या उद्देशाने सात डिजिटल बोर्ड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया, उपाध्यक्ष नंदकुमार भटेवरा, सचिव मनोज शेटिया, खजिनदार सीए रवींद्र कटारिया, श्री भगवानदास गुगळे, श्री प्रतीक पारस चोरडिया, ए.यू. बँक, स्वर्गीय अरुणकाका जगताप ट्रस्ट आणि श्री अशोक पारख या दानशूर व्यक्ती व संस्थांनी आर्थिक सहकार्य केले.

Anand Parshva Gurukul

कार्यक्रमाची सुरुवात प.पू. कुंदनऋषीजी म.सा. यांच्या मंगलाचरणाने झाली. संस्थेचे सचिव श्री मनोज शेटिया यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया यांनी संस्थेच्या आजपर्यंतच्या कार्याचा आणि वाटचालीचा आढावा घेतला.

यावेळी सीए रवींद्र कटारिया यांनी आधुनिक शिक्षणाचे महत्त्व विशद करताना, आजच्या स्पर्धात्मक आणि तंत्रज्ञानप्रधान युगात विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची जोड देणे आवश्यक असल्याचे सांगितले. डिजिटल बोर्डच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा अभ्यास अधिक रंजक, प्रभावी आणि गुणवत्तापूर्ण होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच शाळेत राबविण्यात येणारे डिजिटल बोर्ड आणि रोबोटिक्स तंत्रज्ञानाशी संबंधित उपक्रमांची माहिती दिली.

प.पू. आलोकऋषीजी म.सा. यांनी संस्थेच्या भविष्यातील योजनांची माहिती देताना हॉस्टेल बिल्डिंग, स्टेडियम, मेडिटेशन सेंटर आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांसारख्या प्रस्तावित उपक्रमांविषयी मार्गदर्शन केले.

यावेळी गुरुकुलच्या शैक्षणिक प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या दानशूर व्यक्ती, मान्यवर आणि लाभार्थी कुटुंबीयांचा शाल देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया, उपाध्यक्ष नंदकुमार भटेवरा, सचिव मनोजकुमार शेटिया, खजिनदार सीए रवींद्र कटारिया, विश्वस्त शैलेश मेहेर, प्रतीक चोरडिया, मेघा बोरा, मनोज बाफना, सौ. निकिता गांधी, मुख्याध्यापिका सौ. मोना सूर्यवंशी, दानशूर शैलेजा संजय ताथेड, पारस लोढा, दिनेश गुगळे, श्रेयांस कटारिया, सिद्धांत कटारिया आणि सौ. आकांक्षा चोरडिया यांचा समावेश होता.

या कार्यक्रमाला विश्वस्त मंडळाचे सदस्य, शाळा समितीचे सदस्य, दानशूर व्यक्ती, लाभार्थी कुटुंबीय, पालक, शिक्षक आणि अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया, सचिव मनोज शेटिया, विश्वस्त मेघा बोरा, मुख्याध्यापिका सौ. मोना सूर्यवंशी तसेच शाळेतील शिक्षकवृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.

‘Digital Learning – Better Tomorrow’ अर्थात ‘आधुनिक शिक्षण, समृद्ध भविष्य’ या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना दृश्याधारित, परस्परसंवादी आणि तंत्रज्ञानस्नेही शिक्षण मिळणार असून त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यास मदत होईल, असा विश्वास संस्थेच्या विश्वस्तांनी व्यक्त केला.

सविस्तर वाचा : सावित्रीबाई फुलेंच्या शिक्षिका सिंथिया फरार यांच्या समाधीचा नगरमध्ये शोध, जाणून घ्या त्यांचं कार्य

- Advertisement -


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading