अमरावती | २३.९ | रयत समाचार
Maharashtra Pakshimitra Awards 2026: पक्षी संवर्धन आणि जनजागृतीच्या क्षेत्रात सातत्याने कार्य करणाऱ्या तसेच पक्षीविषयक संशोधन, संवर्धन, जनजागृती, पक्षी उपचार, सेवा व सुश्रुषा या क्षेत्रात कार्यरत व्यक्ती आणि संस्थांचा गौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने महाराष्ट्र पक्षिमित्रच्या वतीने २०१९ पासून विविध पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत. महाराष्ट्र पक्षिमित्र पुरस्कार २०२६ साठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
यंदा पक्षिमित्र जीवन गौरव पुरस्कार, पक्षी संशोधन पुरस्कार, पक्षी संवर्धन व सुश्रुषा पुरस्कार, पक्षिमित्र जनजागृती पुरस्कार, पक्षिमित्र पत्रकारिता पुरस्कार आणि पक्षिमित्र पक्षी साहित्य पुरस्कार अशा एकूण सहा पुरस्कारांचा समावेश आहे. जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ व्यक्तीस, तर अन्य पुरस्कार व्यक्ती किंवा संस्थांना देण्यात येणार आहेत.

जीवन गौरव पुरस्कार
स्व. रमेश लाडखेडकर स्मृती ‘महाराष्ट्र पक्षिमित्र जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ हा दीर्घकाळ पक्षिमित्र चळवळीत राहून पक्षी संवर्धन, अधिवास संवर्धन आणि पक्षीविषयक जनजागृतीसाठी कार्य केलेल्या व वयाची ६० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ व्यक्तीच्या कार्याचा गौरव करण्यासाठी देण्यात येणार आहे.
पक्षी संशोधन पुरस्कार
स्व. डॉ. जी. एन. वानखेडे स्मृती ‘महाराष्ट्र पक्षी संशोधन पुरस्कार-२०२६’ हा पक्षिमित्र चळवळीत राहून पक्षी अभ्यास, संशोधन आणि त्यातून संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला देण्यात येणार आहे. यासाठी पीएच.डी. संशोधन, प्रकल्पातील कार्य, संशोधन निबंध, प्रकाशित साहित्य, पेपर, रिपोर्ट, पक्षी नोंदणी अहवाल आदींचा विचार करण्यात येणार आहे.
पक्षी संवर्धन व सुश्रुषा पुरस्कार
श्री. अनिल बहादुरे, नागपूर यांच्या वतीने प्रायोजित नामदेवराव बहादुरे पक्षी संवर्धन व सुश्रुषा पुरस्कार-२०२६ हा पक्षिमित्र चळवळीत राहून पक्षी संवर्धन, अधिवास संवर्धन तसेच जखमी पक्ष्यांवरील उपचार व सुश्रुषा या क्षेत्रात कार्यरत व्यक्ती किंवा संस्थेला देण्यात येणार आहे.
पक्षी जनजागृती पुरस्कार
रामभाऊ शिरोडे (वाणी) स्मृती, महाराष्ट्र पक्षिमित्र जनजागृती पुरस्कार-२०२६ हा पक्षिमित्र चळवळीत राहून पक्षी अभ्यास, त्यातून जनजागृती आणि संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला देण्यात येणार आहे.
पक्षिमित्र पत्रकारिता पुरस्कार
पक्षीविषयक जनजागृती व संवर्धनासाठी सकारात्मक पत्रकारिता करणाऱ्या नियमित पत्रकारांना दर एक वर्षाआड देण्यात येणारा स्व. प्रकाशसिंह नारायणसिंह मोरे स्मृती पक्षिमित्र पत्रकारिता पुरस्कार-२०२६ यंदा पक्षीविषयक जनजागृती, संवर्धन आणि संशोधनपर पत्रकारिता करणाऱ्या पत्रकार पक्षीमित्राला देण्यात येणार आहे.
पक्षी साहित्य पुरस्कार
श्रीमती सुशीला पाटकर स्मृती, महाराष्ट्र पक्षिमित्र पक्षी साहित्य पुरस्कार-२०२६ हा पक्षीविषयक साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी देण्यात येणार आहे. प्रकाशित साहित्यामुळे पक्षीविषयक ज्ञानाचा प्रसार व प्रचार होण्यासाठी झालेली मदत तसेच पक्षीविषयक जनजागृतीमध्ये साहित्याचे योगदान याचा प्रामुख्याने विचार करण्यात येणार आहे.
दरवर्षी प्रत्येक पुरस्कार एक व्यक्ती किंवा संस्थेला देण्यात येईल. गरज भासल्यास जीवन गौरव पुरस्कार वगळता अन्य पुरस्कार विभागून देण्यात येऊ शकतात. सर्व पुरस्कार त्या वर्षीच्या पक्षिमित्र संमेलनात प्रदान करण्यात येणार आहेत.
पुरस्कारासाठी निवड करताना संस्थेच्या बाबतीत महाराष्ट्र पक्षिमित्रशी संलग्न असलेल्या संस्थेचा, तर व्यक्तीच्या बाबतीत महाराष्ट्र पक्षिमित्रचे सभासदत्व, पक्षिमित्र संमेलनातील सहभाग आणि पक्षिमित्र चळवळीतील सहभाग यांचा प्राधान्यक्रमाने विचार करण्यात येणार आहे.
वरील पुरस्कारांसाठी स्वतः किंवा इतर व्यक्ती अथवा संस्थेमार्फत प्रस्ताव सादर करता येतील. एखाद्या गटात योग्य प्रस्ताव प्राप्त न झाल्यास त्या पुरस्काराची घोषणा करण्यात येणार नाही. महाराष्ट्र पक्षिमित्र कार्यकारिणीतील सदस्य किंवा त्यांचे कुटुंबीय या पुरस्कारांसाठी अर्ज करू शकणार नाहीत तसेच त्यांना पुरस्कार देण्यात येणार नाही.
पुरस्कारासाठी प्रस्ताव दि. १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत महाराष्ट्र पक्षिमित्रच्या पत्त्यावर पाठवावेत. प्रस्ताव कार्यवाह, महाराष्ट्र पक्षिमित्र, द्वारा प्रा. डॉ. गजानन वाघ, ६३, अरण्यार्पण, समता कॉलनी, कठोरा रोड, व्हीएमव्ही पोस्ट, अमरावती – ४४४६०४ या पत्त्यावर पाठविता येतील. तसेच संपूर्ण प्रस्ताव स्कॅन करून PDF स्वरूपात संस्थेच्या [email protected] या ई-मेलवर पेपरलेस पद्धतीनेही पाठविता येईल.
ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात पुरस्कारार्थींची नावे जाहीर करण्यात येणार आहेत. अर्जाचा नमुना आणि पुरस्कारांची सविस्तर माहिती महाराष्ट्र पक्षिमित्रच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र पक्षिमित्रचे कार्याध्यक्ष डॉ. सुधाकर कु-हाडे यांनी दिली.
Observational Short Film | चित्रपटनिर्मिती शिकणाऱ्यांसाठी : निरीक्षणप्रधान लघुपट म्हणजे काय?
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


