अहिल्यानगर | २३.९ | दिपक शिरसाठ
Rabi Jowar Training Islak: महाराष्ट्र शासनाचे राज्यव्यापी ‘सेवा संकल्प अभियान’ संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि कृषी विभाग, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे इसळक, ता. नगर येथे दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी रब्बी ज्वारी पिकाविषयी शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
राज्यभरात दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पौष्टिक तृणधान्य प्रकल्पाची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. या प्रकल्पाला शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून तृणधान्यांच्या पिकाखालील क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी ज्वारी सुधार प्रकल्पाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. दत्तात्रय पाचरणे यांनी रब्बी ज्वारीचे उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेल्या पंचसूत्री तंत्रज्ञानाची माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने मुळस्थानी पाणी व्यवस्थापन, जमिनीच्या प्रकारानुसार वाणांची निवड, बीजप्रक्रिया व योग्य पेरणी, पेरणीनंतरचे ओलावा व्यवस्थापन आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन या बाबींवर शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
डॉ. सुनील अडांगळे यांनी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रात्यक्षिकांची माहिती देऊन शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादन व उत्पन्न वाढवावे, असे आवाहन केले.

प्रा. आत्तार यांनी कोरडवाहू भागासाठी उपयुक्त फळबाग लागवड तसेच कृषीमाल प्रक्रिया उद्योगातील संधींबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कृषी विभागाचे उपकृषी अधिकारी श्री. विजय सोमवंशी यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या फळबाग लागवड आणि अन्नप्रक्रिया उद्योगासंबंधी योजनांची माहिती दिली. सहाय्यक कृषी अधिकारी श्री. योगेश घोलप यांनी महिला शेतकरी सक्षमीकरण अभियानासाठी नोंदणी करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास इसळक गावचे सरपंच श्री. संजय पाटील गेरंगे, सोसायटीचे चेअरमन श्री. भाऊसाहेब गायकवाड, प्रगतशील शेतकरी पोपट गाडगे, राजमोहमद सय्यद, दत्ता पाटील शेळके, आतिश कोतकर व त्यांचे सहकारी तसेच कर्जुनेखारे, निंबळक आणि पंचक्रोशीतील शेतकरी गटांचे शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यापीठामार्फत शेतकरी गटांना रब्बी ज्वारीच्या ‘फुले रेवती’ वाणाचे बियाणे प्रात्यक्षिकासाठी मोफत वितरित करण्यात आले. सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून विद्यापीठाचे कृषी तंत्रज्ञान आणि कृषी विभागाच्या योजना थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असल्याने या उपक्रमाचे शेतकऱ्यांनी स्वागत केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार सहाय्यक कृषी अधिकारी चैतन्य बडवे यांनी मानले.
Observational Short Film | चित्रपटनिर्मिती शिकणाऱ्यांसाठी : निरीक्षणप्रधान लघुपट म्हणजे काय?
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


