अहिल्यानगर | १२ ऑगस्ट | रिजवान शेख
Rohit Pawar: कर्जत-जामखेड मतदारसंघातील प्रलंबित विविध प्रश्नांवर आमदार रोहित पवार यांनी अहिल्यानगर येथे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्यासह विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत तब्बल चार तास मॅरेथॉन बैठक घेतली. रस्त्यांची संथगतीने सुरू असलेली कामे, निकृष्ट कामांची चौकशी, वीजपुरवठ्याच्या समस्या, शासकीय इमारतींची रद्द झालेली कामे, कर्जत-जामखेड शहरातील अस्वच्छता, पाणीपुरवठा, शेतीविषयक प्रश्न आणि कायदा-सुव्यवस्थेसह विविध विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत तसेच तक्रारी असलेल्या कामांची चौकशी करून आवश्यक कारवाई करावी, अशा सूचना आमदार रोहित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
तालुका पातळीवर सातत्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन जनहिताचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न होत असला तरी काही प्रश्न जिल्हा पातळीवर प्रलंबित असल्याने ही बैठक घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
२३९ पाणंद रस्ते रद्द; विहिरींच्या कामांवरून अधिकाऱ्यांना धारेवर
मतदारसंघातील २३९ पाणंद रस्ते कोणतेही कारण न देता रद्द करण्यात आल्याचा मुद्दा आमदार रोहित पवार यांनी बैठकीत उपस्थित केला. रोजगार हमी योजनेतून कर्जत तालुक्यात १,५२० आणि जामखेड तालुक्यात ९३० विहिरी मंजूर झाल्या असतानाही कामे सुरू न झाल्याने त्या रद्द करण्यात आल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
बळीराजा शेतपाणंद रस्ते योजनेअंतर्गत मतदारसंघातील १,१६८ रस्त्यांचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र केवळ ३५ किलोमीटर अंतराच्या रस्त्यांना मंजुरी मिळाली असून उर्वरित १,१३३ रस्त्यांनाही निधी मंजूर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मोजणीला होणारा विलंब दूर करून मोजणीची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
भूसंपादन, पिकविमा आणि तलाठी कार्यालयांवर चर्चा
सिद्धटेक येथील सभामंडपाच्या कामातील अतिक्रमण हटविणे, पोटखराबा जमिनीची लागवडीयोग्य नोंद करण्यास होणारा विलंब, पिकविमा योजनेतील शेतकऱ्यांच्या तक्रारी आणि रेशनकार्डधारकांचे प्रश्न यावर चर्चा झाली.
निमगाव गांगर्डा, पाटेगाव, चापडगाव, आंबी जळगाव आणि कुळधरण येथील तलाठी कार्यालयांसाठी जागा उपलब्ध न झाल्याने रद्द झालेली कामे पुन्हा मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली.
औटेवाडी येथील ग्रामस्थांना शिल्लक प्लॉट उपलब्ध करून देणे, कुकडी डावा कालवा प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाचे प्रलंबित ४७ प्रस्ताव, तसेच खैरी प्रकल्पातील कालवाग्रस्त शेतकऱ्यांना प्रलंबित मोबदला देण्याबाबतही चर्चा झाली.
कर्जत-जामखेड शहरातील पाणी, स्वच्छता आणि नागरी प्रश्न
कर्जत शहरातील अस्वच्छता, रमाई आवास योजनेतील घरकुलांचा प्रश्न, व्यापार संकुलातील गाळ्यांची सुरक्षा, भटके कुत्रे व मोकाट जनावरांचा त्रास, शहरातील सीसीटीव्ही यंत्रणेचा विस्तार आणि पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर चर्चा झाली.
जामखेडमधील मलनिःस्सारण प्रकल्पाच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबतच्या तक्रारी, कामे न करता बिले काढल्याच्या तक्रारी, कचरा डेपोमुळे आयटीआयच्या विद्यार्थ्यांना होणारा त्रास, शहरातील अस्वच्छता आणि व्यापारी संकुलासाठी वीजपुरवठा याबाबतही अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली.
जन्म दाखल्यांसाठी नागरिकांना तीन-चार महिने प्रतीक्षा करावी लागत असल्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या खेड-शिंपोरा रस्त्यावरील नांदणी नदीवरील पूल नव्याने उभारण्याबरोबरच तोपर्यंत आर्मी बेली ब्रिज उभारण्याची मागणी करण्यात आली.
रस्त्यांच्या दर्जाबाबत चौकशीचे निर्देश
जामखेड शहरातील महामार्गाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. तसेच श्रीगोंदा-जामखेड रस्त्याला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याचे सांगण्यात आले.
जलजीवन मिशनअंतर्गत काही गावांतील कामे निकृष्ट दर्जाची झाल्याच्या तक्रारींचीही दखल घेण्यात आली. कर्जत आणि जामखेड तालुक्यातील संथगतीने सुरू असलेली रस्त्यांची कामे वेगाने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत. निकृष्ट कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशा सूचना देण्यात आल्या.
कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये रिक्त असलेल्या ७४ शिक्षकांची तातडीने नियुक्ती करण्याची मागणीही रोहित पवार यांनी केली.
खत-बियाण्यांच्या साठेबाजीवर कारवाईची मागणी
यंदा पावसाला उशीर झाला असताना खत आणि बियाण्यांची साठेबाजी करून चढ्या भावाने विक्री केली जात असल्याच्या तक्रारी बैठकीत मांडण्यात आल्या. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असल्याचे सांगत साठेबाजी आणि चढ्या दराने विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
वीजपुरवठ्याच्या समस्यांवरही चर्चा
जामखेड तालुक्यातील काही तलाठी कार्यालयांच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले. काही कार्यालये सुरू होऊन बंद पडली असून काही अद्याप सुरू झालेली नसल्याचा मुद्दा मांडण्यात आला.
कृषी फिडरवरील काही वाड्या-वस्त्यांना सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत वीज मिळत नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. सिंगल फेज वीजपुरवठ्याची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करणे, जळालेले रोहित्र तातडीने बदलणे तसेच सोलार योजनेतील अडचणी दूर करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या.
कायदा-सुव्यवस्थेवरही अधिकाऱ्यांचे लक्ष
कर्जत-जामखेड मतदारसंघातील कायदा-सुव्यवस्थेबाबतही बैठकीत चर्चा झाली. मतदारसंघात अवैध धंदे सुरू असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी तसेच खोटे गुन्हे दाखल होत असल्याच्या तक्रारी आमदार रोहित पवार यांनी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या.
निरपराध नागरिकांना नाहक त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. भरोसा सेलच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे काम करण्याची गरजही व्यक्त करण्यात आली.
कर्जत आणि जामखेड शहरातील विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांची गस्त वाढविणे, बसस्थानकांवर सीसीटीव्ही बसविणे तसेच पोलीस विभागासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
“पुढील काही दिवसांत प्रश्न वेगाने मार्गी लागतील”
आमदार रोहित पवार म्हणाले, “माझ्या कर्जत-जामखेड मतदारसंघात तालुका पातळीवर सातत्याने अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन जनहिताचे निर्णय मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न असतो. मात्र वरिष्ठ पातळीवर सोडवायचे असलेले प्रश्न जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत मांडण्यात आले.”
“रस्ते, पाणीपुरवठा, पिकविमा, सार्वजनिक विकासकामे, वैयक्तिक लाभार्थ्यांचे प्रश्न, कायदा-सुव्यवस्था, वीजपुरवठा, खत-बियाण्यांचा काळाबाजार आणि सार्वजनिक कामांमधील गुणवत्तेचा प्रश्न अशा प्रत्येक विषयावर सविस्तर चर्चा झाली. हे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. पुढील काही दिवसांत हे सर्व प्रश्न वेगाने मार्गी लागतील, अशी अपेक्षा आहे,” असे रोहित पवार यांनी सांगितले.
Observational Short Film | चित्रपटनिर्मिती शिकणाऱ्यांसाठी : निरीक्षणप्रधान लघुपट म्हणजे काय?
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


