श्रीरामपूर | २९.११ | रयत समाचार
(Politics) आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेतर्फे तपोवन परिसरात साधुग्राम उभारण्यासाठी १८०० हून अधिक झाडे तोडण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या वृक्षतोडीला भारतीय कम्युन्स्ट पक्ष, स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि विविध सामाजिक संस्थांचा तीव्र विरोध आहे.
(Politics) पर्यावरणीय संतुलन बिघडवणारा आणि तपोवनाचे पावित्र्य धोक्यात आणणारा हा निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी आ. हेमंत ओगले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. तसे पत्र दिले. कुंभमेळ्यासारखा जागतिक धार्मिक सोहळा नैसर्गिक समतोल राखूनही आयोजित करता येतो परंतु साधुग्रामसाठी तपोवनातील हजारो झाडांची तोड आवश्यक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
(Politics) आ. ओगले यांनी पत्रात नमूद केले की, कुंभमेळ्यात साधू-संत मोठ्या संख्येने येतात; पण ज्या भूमीवर ते निवास करतात, त्याच भूमीतील १८०० झाडे तोडली गेल्याचे कळल्यास त्यांना आनंद नव्हे तर खंतच वाटेल. तपोवनाचे पावित्र्य आणि पर्यावरण अबाधित राखणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे.
तपोवन परिसर हा नाशिक शहराचा महत्त्वाचा हरितकणा असून अनेक नागरिक, संत-महंत, पर्यावरणतज्ज्ञ व स्वयंसेवी संस्थांनीही या प्रस्तावाला ठाम विरोध दर्शवला आहे. विकासकामे आणि धार्मिक आयोजन करताना पर्यावरणाचा समतोल राखत पर्यायी जागांचा विचार करण्याची मागणीही सातत्याने केली जात आहे.
नागरिकांच्या भावना आणि पर्यावरणीय संवेदनशीलता लक्षात घेऊन प्रस्तावित वृक्षतोडीवरील निर्णयास तात्काळ स्थगिती देण्यात यावी, अशी जोरदार मागणी पुन्हा एकदा पुढे येत आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
