पुणे | ३०.७ | रयत समाचार
(Modi Script Course) इतिहास संशोधक, विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा देणारे तसेच मोडी लिपी आणि ऐतिहासिक कागदपत्रांचा अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या अभ्यासकांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाने एक महत्त्वाची संधी उपलब्ध करून दिली आहे. ‘मोडी लिपी आणि कागदपत्रांचा चिकित्सक अभ्यास’ हा पायाभूत अभ्यासक्रम २४ ऑगस्ट २०२६ पासून ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा संमिश्र (Hybrid) पद्धतीने सुरू होत असून, या अभ्यासक्रमासाठी मर्यादित प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती इतिहास विभाग प्रमुख डॉ. श्रध्दा कुंभोजकर यांनी दिली.
(Modi Script Course) अधिक माहिती देताना डॉ. कुंभोजकर म्हणाल्या, या अभ्यासक्रमाचे मार्गदर्शन इतिहास विषयातील ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. गिरीश मांडके करणार आहेत. त्यामुळे अनुभवी आणि तज्ज्ञ प्राध्यापकांकडून मोडी लिपी शिकण्याची ही दुर्मिळ संधी मानली जात आहे.
(Modi Script Course) अभ्यासक्रमासाठी बारावी उत्तीर्ण ही किमान शैक्षणिक पात्रता असून, ६० तासांचा हा अभ्यासक्रम मराठी माध्यमातून शिकवला जाणार आहे. वर्ग सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ७ ते ८.३० या वेळेत होतील. अभ्यासक्रमाचे शुल्क ₹५,००० असून, शुल्क भरण्याची अंतिम तारीख १४ ऑगस्ट २०२६ आहे.
विशेष म्हणजे, महाराष्ट्रासह देशातील कोणत्याही भागात राहणारे इच्छुक विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी अर्ज करू शकतात. अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्याची छाननी करून पात्र उमेदवारांच्या नावे शुल्क चलन तयार केले जाईल आणि त्यांच्या मोबाईल क्रमांकावर ऑनलाइन पेमेंटसाठी लिंक पाठविण्यात येईल. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश’ या तत्त्वावर प्रवेश निश्चित केला जाणार असल्याने इच्छुकांनी विलंब न करता अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे, छायाचित्र आणि स्वाक्षरी जोडून [email protected] या ई-मेलवर किंवा पोस्टाद्वारे इतिहास विभागाकडे पाठविता येईल.
अभ्यासक्रमात मोडी लिपीची पूर्वपीठिका, वर्णमाला, लेखन-वाचन सराव, ऐतिहासिक लेखन पद्धती, कालगणना, वजन-मापे तसेच महसूल, न्यायदान, राजकीय आणि आर्थिक स्वरूपाच्या ऐतिहासिक कागदपत्रांचा चिकित्सक अभ्यास अशा महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे.
📜 मोडी लिपी शिकण्याची सुवर्णसंधी!
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागात प्रा. डॉ. गिरीश मांडके यांच्या मार्गदर्शनाखाली २४ ऑगस्टपासून ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू होत आहे. मर्यादित जागा असल्याने इच्छुकांनी त्वरित अर्ज करावा. #ModiLipi #SPPU #History #RayatSamachar
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


