Education | सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारा रमजान रोजा इफ्तार कार्यक्रम; रवीशंकर विद्यामंदिरात हिंदू-मुस्लिम विद्यार्थ्यांचा सहभाग

८१ जणांनी रोजा ठेवत भाईचाऱ्याचा आदर्श

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

कर्जत | ८.३ | रयत समाचार

(Education) समाजातील वाढत्या दूषित वातावरणात सलोखा, सहिष्णुता आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारा अनोखा उपक्रम कर्जत येथील रवीशंकर विद्यामंदिरात आयोजित करण्यात आला. रमजान महिन्यानिमित्त सर्वधर्मसमभाव रोजा इफ्तार कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात मुस्लिम विद्यार्थ्यांसह हिंदू विद्यार्थ्यांनीही रोजा ठेवत सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी आदर्श घालून दिला.

(Education) विद्यामंदिराच्या वतीने रोजा ठेवलेल्या विद्यार्थ्यांसाठी खजूर व फळांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात एकूण १७ मुस्लिम विद्यार्थी, ६४ हिंदू विद्यार्थी, १० शिक्षक तसेच संस्थेचे कार्यवाहक नाना तथा नंदकुमार लांगोरे यांनीही रोजा ठेवत भाईचाऱ्याचा सुंदर संदेश दिला.

(Education) यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, जनसेवा हीच ईश्वर- अल्लाहची खरी सेवा आहे. प्रत्येक धर्मात माणुसकी आणि परस्पर आदराची शिकवण दिली आहे. रमजानचा रोजा असो किंवा एकादशीचा उपवास हे भक्तीचे मार्ग आहेत; मात्र देश हा धर्मापेक्षाही मोठा आहे. धर्मग्रंथांची भाषा वेगवेगळी असली तरी त्यातील संदेश एकच आहे. प्रेम, स्नेह आणि परस्पर आदर.

या कार्यक्रमाबद्दल प्रतिक्रिया देताना राहुल नवले म्हणाले, आज समाजातील दूषित वातावरण शुद्ध करण्याचे काम खऱ्या अर्थाने रवीशंकर विद्यामंदिराने केले आहे. पुरोगामी विचारांचे मार्गदर्शक नाना तथा नंदकुमार लांगोरे आणि सर्व आयोजकांचे मी मनापासून आभार मानतो.

कार्यक्रमाला हभप दयानंद महाराज कोरेगावकर, मौलाना आखलाक अहमद, प्रवीण महाराज मुळे, संदीप महाराज तनपुरे, नंदकुमार लांगोरे, सेवानिवृत्त कृषी अधिकारी धोंडिबा मुळे, डॉ. यशवंत लांगोरे, मुख्याध्यापिका सविता बळे, इल्लूभाई पठाण, तात्या क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्वधर्मसमभाव, सहिष्णुता आणि राष्ट्रीय एकात्मतेचे मूल्य रुजवण्याचा महत्त्वपूर्ण संदेश समाजासमोर आला.

Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading