अहिल्यानगर | २५.९ | पंकज गुंदेचा
Sadguru Shri Sahebrao Aware Library: नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई येथे सद्गुरु श्री साहेबराव आवारे प्रतिष्ठानच्या वतीने साकारण्यात आलेल्या ‘सद्गुरु श्री साहेबराव आवारे वाचनालय’ तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या पाणपोईचा उद्घाटन समारंभ गुरुवार, तारीख २४ सप्टेंबर रोजी इंदुबाई साहेबराव आवारे आणि बायजाबाई कैलास मगर यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.

‘तमसो मा ज्योतिर्गमय – अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे’ या विचाराला केंद्रस्थानी ठेवून उभारण्यात आलेले हे वाचनालय विद्यार्थी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व वाचकांसाठी ज्ञान आणि विचारांचे नवे व्यासपीठ ठरणार आहे. वाचनाच्या माध्यमातून ज्ञानवृद्धी, ज्ञानातून प्रगती आणि त्यातून समाजाच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे.
वाचनालयाच्या उभारणीसाठी अनेक व्यक्तींनी पुस्तकांच्या माध्यमातून सहकार्य केले आहे. सद्गुरु श्री साहेबराव आवारे यांनी सांगितले की, माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी यशवंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रारंभी १५० पुस्तके दिली. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे माजी असिस्टंट जनरल मॅनेजर विलास तुळशीराम होडे यांनी स्वतःची सुमारे ४०० पुस्तकांची लायब्ररी वाचनालयासाठी दिली. ह.भ.प. सिद्धनाथ मेटे महाराज यांनीही सुमारे २०० पुस्तके दिली आहेत. याशिवाय अनेकांनी पुस्तके देऊन वाचनालय समृद्ध केले आहे.

अक्षर प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी साहित्यिकांचा सन्मान केला जातो. या उपक्रमांतर्गत साहित्यिकांकडून मिळणाऱ्या पुस्तकांमुळेही वाचनालयात दरवर्षी मोठ्या प्रमाणात नवीन पुस्तके उपलब्ध होत असल्याने वाचनालयाचा पुस्तकसाठा सातत्याने अद्ययावत राहणार असल्याचे आवारे यांनी सांगितले.
यावेळी सद्गुरु श्री साहेबराव आवारे म्हणाले, “माजी सैनिक आणि निवृत्तीनंतर आपले आयुष्य समाजसेवेसाठी वाहून घेण्याचा संकल्प केलेल्या श्री. नवनाथ मगर यांच्या पुढाकारातून हे सार्वजनिक वाचनालय सुरू झाले आहे. हे वाचनालय सर्वांसाठी पूर्णपणे विनामूल्य आहे. शालेय विद्यार्थ्यांना आवश्यक पुस्तके, स्पर्धा परीक्षेची पुस्तके तसेच विविध विषयांवरील अद्ययावत साहित्य येथे उपलब्ध करून देण्यात आले आहे.”
वाचनालयाच्या शेजारी पाणपोईची व्यवस्था करण्यात आली असून स्वतंत्र आरओ यंत्रणा बसविण्यात आली आहे. दररोज सुमारे ३०० ते ४०० लिटर पाणी शुद्ध करण्याची क्षमता या यंत्रणेची आहे. शाळकरी विद्यार्थी, वाटसरू तसेच परिसरातील नागरिकांना या पाणपोईचा लाभ होणार आहे.

याशिवाय परिसरात सुरू असलेल्या वारकरी शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण, भोजन आणि निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून शालेय शिक्षणासोबत पखवाज, भगवद्गीता आणि संस्कृतचे शिक्षण दिले जात असल्याचे आवारे यांनी सांगितले.
काकासाहेब देशमुख यांनी नवनाथ मगर यांच्या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, मोबाईल संस्कृती फोफावत असताना पुढील पिढीला वाचनाकडे प्रवृत्त करण्यासाठी सार्वजनिक वाचनालय सुरू करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. ज्ञानाची तहान असलेल्या व्यक्तीला पुस्तक उपलब्ध करून देणे आणि तहानलेल्या व्यक्तीला पाणी देणे, या दोन्ही गोष्टी अनुकरणीय आहेत.
ह.भ.प. सिध्दिनाथ मेटे महाराज म्हणाले, या वाचनालयाचा आदर्श विद्यालयातील विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. आज सोशल मीडिया आणि वाचन संस्कृतीमध्ये मोठी तफावत दिसत असताना नवनाथ मगर यांनी समाजाच्या हितासाठी वाचनालय सुरू करण्याचा घेतलेला निर्णय महत्त्वाचा आहे. वाचनालयात विविध क्षेत्रांतील मोठ्या प्रमाणात पुस्तके उपलब्ध आहेत. ज्यांच्याकडे पुस्तके आहेत त्यांनी ती वाचनालयाला द्यावीत, जेणेकरून त्याचा अनेक वाचकांना लाभ होईल.
पाणपोईच्या माध्यमातून आदर्श विद्यालयातील विद्यार्थ्यांसह नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाचेही त्यांनी कौतुक केले.
ह.भ.प. सुदाम दारकुंडे महाराज यांनी जेऊर आणि पंचक्रोशीतील नागरिक, भाविक तसेच विद्यार्थ्यांनी वाचनालयाचा लाभ घेऊन आपल्या ज्ञानात भर घालावी, असे आवाहन केले. ज्ञानदानाच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेला हा उपक्रम समाजासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी सद्गुरु श्री साहेबराव आवारे यांनी वारकरी संप्रदायाची सेवा आणि वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वारकरी केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वरसेवा मानून या माध्यमातून भाविकांना आवश्यक सुविधा देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी ह.भ.प. रघुनाथ तोडमल महाराज, ह.भ.प. मच्छिंद्र तवले महाराज, आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक जगन्नाथ जगदाळे, नगर मार्केट कमिटीचे चेअरमन मधुकरअण्णा मगर, जेऊर सोसायटीचे चेअरमन बाबासाहेब तोडमल यांच्यासह परिसरातील मान्यवर, ग्रामस्थ, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सद्गुरु श्री साहेबराव आवारे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संचालक नवनाथ मगर यांच्या पुढाकारातून हा उपक्रम साकारण्यात आला.
Observational Short Film | चित्रपटनिर्मिती शिकणाऱ्यांसाठी : निरीक्षणप्रधान लघुपट म्हणजे काय?
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


