History | इंडो- पाक युध्दातील ऐतिहासिक अहमदनगरचे शूरवीर : वीरचक्र विजेते हवालदार गोपीनाथ भिंगारदिवे

असिफखान दुलेखान लिखित स्मृतिवार्ता वाचा

रयत समाचार वृत्तसेवा
8 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

रयत समाचार 

स्मृतिवार्ता | २०.४ | असिफखान दुलेखान

(History) ऐतिहासिक अहमदनगर जिल्ह्यातील भिंगार येथील हवालदार गोपीनाथ भिंगारदिवे यांनी १९६५ च्या भारत-पाक युद्धादरम्यान कच्छच्या रणातील ‘सरदार पोस्ट’वर शौर्य, कर्तव्यनिष्ठा आणि अद्वितीय धैर्याचे दर्शन घडवले. सततच्या गोळीबार आणि सुरुंगांच्या धोक्यातही त्यांनी गंभीर जखमी सहकाऱ्याला सुरक्षित परत आणत जीव वाचवला. हा पराक्रम त्यांनी २० एप्रिल १९६५ च्या पहाटे एक वाजता केला. त्यांच्या या पराक्रमाबद्दल त्यांना भारतीय लष्कराकडून ‘वीरचक्र’ प्रदान करण्यात आले.

(History) हवालदार गोपीनाथ भिंगारदिवे यांचा जन्म १ जुलै १९३६ रोजी महाराष्ट्रातील ऐतिहासिक अहमदनगर (नवे नाव अहिल्यानगर)   जिल्ह्यातील भिंगार या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अहिलाजी भिंगारदिवे. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी, १८ जानेवारी १९५७ रोजी ते भारतीय लष्कराच्या १ महार रेजिमेंटमध्ये दाखल झाले. ते घरी न सांगता परस्पर लष्करात भरती झाले आणि काही दिवसांनंतर थेट लष्करी गणवेशात घरी येवून ज्येष्ठांना सॅल्यूट घातला. तेंव्हा सर्वजण आश्चर्यचकीत झाले. १९६५ च्या भारत- पाकिस्तान युद्धादरम्यान, हवालदार भिंगारदिवे गुजरातमधील कच्छ भागातील ‘सरदार पोस्ट’वर तैनात होते. मॉर्टर व मशीनगनच्या गोळीबारात एका सहकारी सैनिकाचा जीव वाचवताना त्यांनी विलक्षण शौर्य आणि कर्तव्यनिष्ठा दाखवली.

(History) महार रेजिमेंटमध्ये सुरुवातीला फक्त महार जातीतील व्यक्तींचा समावेश करण्याचा उद्देश होता. आज ती भारतीय सैन्यातील सर्वात वैविध्यपूर्ण रेजिमेंटपैकी एक आहे. १९व्या शतकात, त्यांची भरती ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीद्वारे केली जात असे आणि ते कंपनीच्या बॉम्बे आर्मीचा भाग होते. तथापि, १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धानंतर ‘वर्ग रेजिमेंट’ धोरण लागू झाल्यावर, ब्रिटिश सरकारने महार सैनिकांना सैन्यातून मुक्त केले. १९१४ मध्ये जेव्हा पहिले महायुद्ध सुरू झाले, तेव्हा ब्रिटिश सरकारला आपली भरती धोरणे विस्तारण्यास भाग पडले आणि १९१७ मध्ये १ महार बटालियन उभारण्यात आली.
युद्ध संपल्यानंतर, मार्च १९२१ मध्ये ही बटालियन पुन्हा बरखास्त करण्यात आली. १९४१ मध्ये, जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेवर नियुक्ती झाली, तेव्हा त्यांनी महार सैनिकांना सैन्यात भरती करण्यासाठी ब्रिटिश सरकारवर दबाव आणला. ऑक्टोबर १९४१ मध्ये, बेळगाव येथे १ महार बटालियन उभारण्यात आली, आणि अशा प्रकारे सध्याच्या महार रेजिमेंटचा उगम झाला.
दोन महायुद्धांच्या दरम्यान, महार रेजिमेंट उभारण्याची मागणी करण्यात आली. रेजिमेंटची युद्धगर्जना होती ‘बोलो हिंदुस्तान की जय’. महार रेजिमेंटला हा मान आहे की, जनरल के.व्ही. कृष्णराव (१ जून १९८१- ३१ जुलै १९८३) आणि जनरल के.एस. सुंदरजी (१ फेब्रुवारी १९८६- ३१ मे १९८८) हे दोन्ही लष्करप्रमुख याच रेजिमेंटचे होते.
भारत-पाक संघर्षाची सुरुवात १९४७ सालापासून झाली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वादाचे मूळ कारण म्हणजे पाकिस्तानने कोणत्याही मार्गाने तत्कालीन जम्मू आणि काश्मीर राज्याला आपल्या राज्यात सामील करून घेण्याचे केलेले प्रयत्न. जम्मू आणि काश्मीरमधील शस्त्रसंधी रेषा आणि पाकिस्तानसोबतची आपली सीमा अनेक वर्षांपासून एक संवेदनशील क्षेत्र राहिली. पाकिस्तानने या सीमांवरील अनेक ठिकाणी वेळोवेळी गोळीबार, घुसखोरी आणि अतिक्रमण केले, ज्यामुळे भारताला बचावात्मक उपाययोजना करणे भाग पडले. पाकिस्तानच्या या प्रयत्नांना भारतीय सशस्त्र दलांनी प्रशंसनीय शौर्य आणि पोलादी धैर्याने तोंड दिले, परंतु संघर्ष वाढू नये यासाठी नेहमीच मोठा संयम राखला.
१९६५ चे भारत- पाक युद्ध हे या दोन सीमावर्ती देशांमध्ये लढले गेलेले दुसरे युद्ध होते. भारत १९६२ च्या चीन-भारत युद्धाच्या नुकसानीतून सावरत असतानाच, पाकिस्तानने भारताला संरक्षण तयारीच्या बाबतीत कमकुवत समजून, जम्मू आणि काश्मीर ताकदीने मिळवण्याची ही एक संधी म्हणून पाहिले.
ता. २४ एप्रिल १९६५ रोजी युद्धाला सुरुवात झाली, जेव्हा पाकिस्तानी सैन्याने कच्छच्या रणात भारताच्या भूभागावर हल्ला केला. भारतीय हद्दीत सहा ते आठ मैल आत घुसखोरी केली. भारतीय भूभागावरील हा अवैध कब्जा, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सनदेनुसार, भारत-पाक सीमा करार १९६० आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन होता. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याने ‘ऑपरेशन जिब्राल्टर’ सुरू करून काश्मीरमध्ये घुसखोरी केली.
विगोकोट चौकीवर संभाव्य हल्ल्याच्या शक्यतेने, ९ एप्रिल रोजी १७ राजपुताना रायफल्सची ‘सी’ कंपनी विगोकोट चौकीवर दाखल झाली. त्यानंतर लगेचच, २ शीख लाईट इन्फन्ट्रीदेखील सामील झाली. ११ एप्रिल रोजी, ११ फील्ड रेजिमेंटची एक बॅटरीसुद्धा विगोकोट येथे तैनात करण्यात आली. ११ एप्रिल रोजी, २ शीख लाईट इन्फन्ट्रीची एक स्थायी गस्त (एका कंपनीच्या ताकदीची) सरदार चौकीवर पाठवण्यात आली. त्याचवेळी, खावडा येथे तैनात असलेल्या लेफ्टनंट कर्नल (नंतरचे जनरल के.एस. सुंदरजी) यांच्या नेतृत्वाखालील १ महार रेजिमेंटला सुद्धा १२ एप्रिल रोजी सरदार चौकी येथे जाण्याचा आदेश देण्यात आला.

रणगाडाविरोधी सुरुंग पेरणीचे काम १७ एप्रिल रोजी विगोकोट येथे आणि सरदार चौकी परिसरात पूर्ण झाले.

सरदार पोस्टवरील अयशस्वी प्रयत्नानंतर, पाकिस्तानने त्या भागात अधिक सैन्य तैनात केले. ता. १० ते १९ एप्रिल दरम्यान, दोन्ही बाजूंनी गस्त आणि तोफगोळ्यांची एक्स्चेंज केली. ता. १२ एप्रिल रोजी, सरदार पोस्टच्या उत्तरेला भारतीय तोफखान्याने पाकिस्तानी गस्ती पथकावर हल्ला केला, ज्यात किमान सहा जण ठार झाले. १५ एप्रिल रोजी झालेल्या आणखी एका गस्ती पथकाच्या चकमकीत, कांजरकोटच्या दक्षिणेला पळून जाणाऱ्या काही पाकिस्तानींची जीवितहानी झाली. विशेष म्हणजे, १९ एप्रिलपर्यंत या सर्व घडामोडी केवळ विगोकोट-सरदार पोस्ट परिसरापुरत्याच मर्यादित होत्या.
ता. २० एप्रिल रोजी पाकिस्तानने पुन्हा सरदार पोस्टवर तोफांचा मारा सुरू केला. १ महार बटालियनचे हवालदार गोपीनाथ भिंगारदिवे हे सरदार पोस्टवरील कंपनीत तैनात असलेले ‘मोबाईल फायर कंट्रोलर’ होते. पाकिस्तानी घुसखोरांकडून सतत गोळीबार होत असूनही, त्यांनी स्वतःच्या सुरक्षेची पर्वा न करता सरदार पोस्टवरील आपल्या मुक्कामादरम्यान निरीक्षण चौकीवर आपले कर्तव्य बजावणे सुरूच ठेवले.
पहाटे सुमारे एक वाजता, गस्त घालताना गंभीर जखमी झालेला एक शिपाई सरदार चौकीकडे परत येत असताना भारताच्या संरक्षक सुरुंग क्षेत्रात अडखळत शिरला आणि कोसळला. त्यावेळी बटालियनच्या संरक्षणाखालील क्षेत्रावर शत्रूच्या मोर्टार आणि मशीनगनचा मारा सुरू होता. मोर्टार आणि मशीनगनच्या माऱ्यात सुरुंग क्षेत्रातून जाण्याचा धोका पूर्णपणे माहीत असूनही, हवालदार भिंगारदिवे निर्भयपणे पुढे गेले, त्या बेशुद्ध शिपायाला उचलले आणि चौकीवर परत आणले. आपल्या या ऐनवेळी केलेल्या शौर्यपूर्ण कृतीने त्यांनी आपल्या सहकाऱ्याचा जीव वाचवला.

ऐतिहासिक अहमदनगरचे (अहिल्यानगर) हवालदार गोपीनाथ भिंगारदिवे यांनी अतुलनीय शौर्य, मैत्री आणि उच्च दर्जाची कर्तव्यनिष्ठा दाखवली. त्यांच्या शौर्याबद्दल त्यांना वीरचक्र प्रदान करण्यात आले.

शेवटच्या काळात ते भिंगार परिसरात रहिवासी होते तसेच काही काळानंतर ते मध्यप्रदेशात सागर येथे गेले. त्यांची एकुलती एक मुलगी सुजाता हिचा जेऊर येथील वसंत यमाजी पाटोळे यांच्यासोबत विवाह झाला. त्यांचे पुतणे गौतम आणि महेंद्र भिंगारदिवे हे भिंगार येथेच रहिवासी आहेत. ‘वीरचक्र विजेते हवालदार गोपीनाथ भिंगारदिवे’ यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रदीप जाधव, गौतम, महेंद्र, संभाजी, मच्छिंद्र व भाऊ भिंगारदिवे तसेच सादीक सय्यद हे काम करत असून अहमदनगर इतिहासप्रेमी मंडळ सहकार्य करत आहे.
• हवालदार गोपीनाथ अहिलाजी भिंगारदिवे.
वीरचक्र, १९६५ चे इंडो-पाक युध्द. युनिट – १ महार रेजिमेंट. सेवा क्रमांक – ४५३४२५९. सेवा रूजू – १८ जानेवारी १९५७. पत्नी – बालनबाई भिंगारदिवे, मुलगी – सुजाता वसंत यमाजी पाटोळे, कोकणवाडी, जेऊर (बा), ता.जि. अहिल्यानगर

History (लेखक असिफखान दुलेखान  हे दैनिक रयत समाचारचे उपसंपादक असून इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष आहेत)

दैनिक रयत समाचारमधे वीरचक्र विजेते हवालदार गोपीनाथ भिंगारदिवे यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रसिद्ध झालेला असिफखान दुलेखान यांचा लेख वाचा

Biodiversity | अहिल्यानगरचा ‘किंगफिशर’ आता पाण्याच्या बाटलीवर; ‘डेक्कन व्हॅली’ मिनरल वॉटर

India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading