अहमदनगर | १४ नोव्हेंबर | प्रतिनिधी
Voting अहमदनगर शहर मतदारसंघ वगळता जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात आजपासून गृह मतदानास (होम वोटिंग) सुरूवात झाली. ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांसाठी निवडणूक आयोगाने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा व मतदानापासून कोणीही मतदार वंचित राहू नये, यासाठी लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात १४ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत गृह मतदान होणार आहे. आज मतदानाच्या पहिल्या दिवशी अकोले विधानसभा मतदारसंघात २५५ पैकी १३३ ज्येष्ठ नागरिक, १६ दिव्यांग असे एकूण १४९ मतदारांनी गृहमतदान केले. संगमनेर मतदारसंघात २५२ पैकी ९८ ज्येष्ठ नागरिक, २४ दिव्यांग असे एकूण १२२, शिर्डी मतदारसंघात १९८ पैकी ८५ ज्येष्ठ नागरिक, १३ दिव्यांग असे एकूण ९८, कोपरगाव मतदारसंघात २१८ पैकी ७७ ज्येष्ठ नागरिक, २२ दिव्यांग असे एकूण ९९, श्रीरामपूर मतदारसंघात ७० पैकी ५९ ज्येष्ठ नागरिक, ८ दिव्यांग असे एकूण ६७, नेवासा मतदारसंघात १९४ पैकी १३६ ज्येष्ठ नागरिक, २१ दिव्यांग असे एकूण १५७, राहूरी मतदारसंघात १४४ पैकी ६३ ज्येष्ठ नागरिक, १२ दिव्यांग असे एकूण ७५, पारनेर मतदारसंघात २३८ पैकी ८२ ज्येष्ठ नागरिक, ९ दिव्यांग असे एकूण ९१, कर्जत – जामखेड मतदारसंघात ३१० पैकी १३३ ज्येष्ठ नागरिक, १५ दिव्यांग असे एकूण १४८ मतदारांनी गृह मतदान केले.
मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व सूक्ष्म निरीक्षक यांचा समावेश असलेल्या पथकांच्या माध्यमातून गृह मतदान मोहीम राबविण्यात येत आहे.
जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, बाळासाहेब कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी गृह मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत.
हे हि वाचा : Election: मतदान करण्याची ऑनलाईन शपथ घ्या आणि जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र मिळवा