कोणत्याही समाजघटकांवर अन्याय होत असेल तर त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आमची - शाहू छत्रपती - Rayat Samachar

कोणत्याही समाजघटकांवर अन्याय होत असेल तर त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आमची – शाहू छत्रपती

रयत समाचार वृत्तसेवा

कोल्हापूर | प्रतिनिधी

येथील खासदार शाहू छत्रपती यांनी राज्यसरकार, जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलिस प्रशासन यांचे अपयश उघड केले आहे. विशाळगडावरील अतिक्रमणे काढण्याविषयी झालेल्या हिंसाचाराचा निषेध करत त्यांनी जनतेला ठामपणे सांगितले आहे की, कोणत्याही समाजघटकांवर अन्याय होत असेल तर त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आमची आहे.

त्यांनी सांगितले की, विशाळगड येथील अतिक्रमणे हटवण्याच्या निमित्ताने झालेला हिंसाचार आमच्या मनाला प्रचंड वेदना देणारा असून घडलेल्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचाराने प्रगल्भ असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात अशी घटना घडली, हे अत्यंत क्लेशदायक आहे.

ते पुढे म्हणाले, यासंदर्भात प्रशासनाने विशाळगड प्रश्न गांभीर्याने घेऊन माजी खासदार संभाजीराजे व मुख्यमंत्री यांची भेट तसेच चर्चा घडवून आणावी, अशा सूचना आम्ही जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुखांना या घटनेपूर्वी दिल्या होत्या. परंतु, राज्यशासन, प्रशासन आणि पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची योग्य ती खबरदारी गांभीर्याने घेतली नाही, त्यामुळे ही घटना घडली. हे जिल्हा प्रशासन व पोलिसांचे अपयश आहे. राज्यसरकारने रविवारी अतिक्रमण काढण्या संदर्भात जिल्हा प्रशासनाला जे आदेश दिले तेच आदेश यापूर्वी दिले असते तर ही घटना टळली असती. या हिंसाचाराबाबत संबंधितांवर कारवाई करावी.

माजी खासदार संभाजीराजे यांनी याप्रश्नी आंदोलनाचे नेतृत्व केले आणि सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली. परंतु त्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर जो हिंसाचार झाला, त्याचा आम्ही स्पष्ट शब्दात तीव्र निषेध करतो.

हिंसाचारामध्ये ज्या निष्पाप लोकांचे नुकसान झाले, त्यांना सरकारने तातडीने नुकसान भरपाई द्यावी. सरकारने काही केले नाही, तर कोल्हापूरची जनता त्यासाठी पुढाकार घेईल. उद्या मंगळवारी आम्ही घटनास्थळी भेट देवून पाहणी करणार आहोत. कोणत्याही समाजघटकांवर अन्याय होत असेल तर त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आमची आहे.

VIRAJ TRAVELS
Ad image

त्यांनी प्रशासनाला स्पष्टपणे सांगितले की, विशाळगडावरील अतिक्रमणे सरसकट काढण्याची कारवाई प्रशासनाने तातडीने करावी. त्या संदर्भात कोणताही दुजाभाव केला जाऊ नये.

Share This Article
1 Comment