पाथर्डी (राजेंद्र देवढे) १७.६.२०२४
तालुक्यातील सुसरे येथे लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेले प्राथमिक आरोग्य उपकेंद्र गेल्या वर्षापासून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत धूळ खात पडले आहे. त्यामुळे, खाजगी दवाखान्याचा खर्च परवडत नसलेल्या गरजू रुग्णांची हेळसांड होत आहे.
जिल्हा परिषदेच्या निधीतून बांधलेली ही इमारत सध्या केवळ शोभेची वास्तू म्हणून उभी आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने ग्रामस्थांना, साथीच्या आजारांची हमखास लागण होते. तसेच ग्रामस्थांना, खास करुन शेतकऱ्यांना विंचू दंशही होत असतात. अशावेळी ग्रामस्थांना उपचारांसाठी तालुक्याच्या ठिकाणी धाव घ्यावी लागते. त्यामुळे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात मोफत आणि वेळेवर मिळणाऱ्या उपचारांसाठी खाजगी दवाखान्यात जाऊन पैसे मोजावे लागतात. गेल्या चार वर्षांपासून या इमारतीचे उद्घाटन का झाले नाही, हा प्रश्न ग्रामस्थांना सतावत आहे.
आमदार मोनिका राजळे यांचे लाडके गांव अशी सुसऱ्याची ओळख आहे. त्यांच्या प्रयत्नांतूनच या कामाला मंजुरी मिळाली होती. त्यानुसार २०२० साली या उपकेंद्राच्या बांधकामाची सुरुवात झाली होती. त्यांनंतर वीज जोडणी, प्लंबिंग, कुंपणाची भिंत व आवारातील फरसबंदीचे कामही गेल्या वर्षी पुर्णत्वास गेले आहे. परंतु, आजवर येथे अधिकारी व इतर स्टाफची नियुक्ती झालेली नाही. ती लवकरात लवकर व्हावी अशी ग्रामस्थांची इच्छा आहे.
सुसरे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे काम टप्याटप्याने गेल्या वर्षी पूर्णत्वास गेले आहे. काम पूर्ण होताच स्टाफच्या मागणीचा प्रस्ताव सादर केला आहे. परंतु, लोकसभेच्या व आता पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता दीर्घकाळ लागू असल्याने अजून स्टाफनिश्चीती झाली नसावी. आचारसंहिता संपताच ते पूर्ण होईल, अशी माहिती माजी सरपंच तथा विद्यमान ग्रा.पं. सदस्य दादा पाटील कंठाळी यांनी दिली.
प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत २०२० मध्ये पूर्ण करण्यात आली. नव्याने बांधण्यात आलेल्या सुसज्ज इमारतीचे काम पूर्ण झाले असून प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी पुरेसा स्टाफ व आवश्यक साधनसामग्री उपलब्ध नसल्याने या इमारतीला सुमारे तीन वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. उद्घाटनाच्या प्रतिक्षेत दीर्घकाळ धूळखात पडून असलेल्या या इमारतीच्या परिसरात गवत उगवले आहे, असे सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर कंठाळी म्हणाले.
जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी तात्काळ लक्ष घालावे.