पुणे | १६ जून | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य कृषी विभागाच्या दृश्य माध्यमांमधील सशक्त ओळख निर्माण करण्यासाठी एक अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. विभागाने नवीन बोधचिन्ह (Logo) व घोषवाक्य (Tagline) तयार करण्यासाठी राज्यभरातील सर्व नागरिकांसाठी स्पर्धा आयोजित केली आहे.
ही स्पर्धा सर्वसामान्य जनतेसाठी खुली असून, सृजनशील आणि प्रेरणादायी संकल्पना विभागाकडे सादर करून सहभागी होण्याची ही एक अनोखी संधी आहे. शेतकरी कल्याण, शाश्वत शेती, कृषी संशोधन यांचा समावेश असलेले बोधचिन्ह आणि विभागाच्या कार्याशी सुसंगत घोषवाक्य अपेक्षित आहे. घोषवाक्य केवळ मराठी भाषेत असावे व त्याबाबत १०० शब्दांतील स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे.
स्पर्धेतील पारितोषिके पुढीलप्रमाणे –
Logo विभाग:
▪ प्रथम पारितोषिक – ₹1,00,000
▪ 2 उत्तेजनार्थ पारितोषिके – प्रत्येकी ₹10,000
Tagline विभाग:
▪ प्रथम पारितोषिक – ₹50,000
▪ 2 उत्तेजनार्थ पारितोषिके – प्रत्येकी ₹5,000
संपूर्ण कलाकृती JPEG/PNG तसेच AI/SVG/PDF या स्वरूपात [email protected] या ईमेलवर २५ जून २०२५ पर्यंत पाठवाव्यात. अधिक माहितीसाठी ०२०-२५५३७८६५ या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी.
“तुमच्या कल्पनाशक्तीला द्या एक नवी दिशा — राज्याच्या कृषी विकासात घ्या सर्जनशील सहभाग!” या घोषणेने कृषी विभागाने सर्जनशील व्यक्तींना एक नवा मंच उपलब्ध करून दिला आहे.