Ad imageAd image

Agriculture | सरसकट कर्जमाफी करा, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा; भाकपचे तहसील कार्यालयावर आंदोलन

कर्जमाफीच्या नावाखाली बँकांची वसुली; शेतकऱ्यांना न्याय द्या

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

शेवगाव | १२.६ | रयत समाचार

(Agriculture) महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत अनेक अटी व शर्ती घातल्यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे ही कर्जमाफी फसवी असून राज्य सरकारने विनाअट व सरसकट सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करावा, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव ॲड. कॉम्रेड सुभाष लांडे यांनी केली.

(Agriculture) भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेच्या वतीने राज्यातील सर्व शेतकऱ्यांना विनाअट व सरसकट कर्जमाफी मिळावी, या मागणीसाठी शुक्रवारी शेवगाव तहसील कार्यालयावर निदर्शने आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांना मार्गदर्शन करताना ॲड. लांडे बोलत होते.

(Agriculture) ते म्हणाले की, राज्य सरकारने घोषित केलेल्या कर्जमाफीमध्ये अनेक अटी घातल्यामुळे प्रत्यक्षात शेतकऱ्यांना लाभ मिळणार नसून केवळ बँकांची वसुली होणार आहे. त्यामुळे या योजनेचा शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नाही. शेतकऱ्यांना संपूर्ण आणि सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

Agriculture
भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेच्या वतीने राज्यातील सर्व शेतकऱ्यांना विनाअट व सरसकट कर्जमाफी मिळावी, या मागणीसाठी शुक्रवारी शेवगाव तहसील कार्यालयावर निदर्शने आंदोलन करण्यात आले.

याशिवाय खतांच्या वाढत्या किमती आणि टंचाईबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. शेतकऱ्यांना खतांच्या दुकानांसमोर तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागत असून अनेक ठिकाणी मुक्काम करण्याची वेळ येत आहे. तरीही आवश्यक प्रमाणात खते उपलब्ध होत नसल्याची परिस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी तहसीलदार आकाश दहाडदे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा, खरीप हंगामासाठी मुबलक प्रमाणात व स्वस्त दरात खतांचा पुरवठा करावा तसेच कापूस व इतर पिकांसाठी आवश्यक बियाणे सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्यावीत, अशा मागण्या करण्यात आल्या.

आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव ॲड. सुभाष लांडे, तालुका सचिव संदीप इथापे, बापूराव राशिनकर, भिवा घोरपडे, अशोकराव नजन, दत्तात्रय आरे, रामभाऊ लांडे, गोरक्ष काकडे, विष्णू गोरे, ॲड. भागचंद उकिर्डे, मुरलीधर काळे, सर्जेराव खोसे, अंकुश खोसे, अर्जुन खैरे, संतोष खोसे, आकाश काळे, बाबुलाल सय्यद यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading