कायदा सुव्यवस्थेबाबत तीव्र नाराजी, गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी
श्रीरामपूर | १५ जुलै | सलीमखान पठाण
(Shrirampur Crime Protest) आकाश दुबय्या या व्यावसायिकाच्या निर्घृण हत्येनंतर संतप्त झालेल्या श्रीरामपूरकरांनी सलग चार दिवस कडकडीत बंद पाळल्यानंतर बुधवारी संघटित गुन्हेगारीविरोधात अभूतपूर्व जनआक्रोश महामोर्चा काढला. सर्वपक्षीय नेते, व्यापारी, उद्योजक, सामाजिक संघटना आणि हजारो नागरिकांच्या सहभागामुळे शहरातील हा मोर्चा ऐतिहासिक ठरला. भगव्या टोप्या परिधान केलेल्या हजारो नागरिकांनी गुंडगिरीविरोधात एकजुटीचे शक्तिप्रदर्शन करत कठोर कारवाईची मागणी केली.
(Shrirampur Crime Protest) सकाळी अकरा वाजता हनुमान मंदिरात महाआरती झाल्यानंतर महामोर्चाला प्रारंभ झाला. महात्मा गांधी चौक, मेन रोड आणि छत्रपती शिवाजी रोड मार्गे निघालेला मोर्चा शिवतीर्थ येथे पोहोचल्यानंतर त्याचे जाहीर सभेत रूपांतर झाले.
(Shrirampur Crime Protest) सभेत अशोक थोरे, सुनील मुथा, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी आमदार लहु कानडे, माजी सभापती दीपक पटारे, संतोष मेटे, रमादेवी धिवर, नगरसेविका वैशाली चव्हाण, सचिन गुजर, प्रकाश चित्ते आणि आमदार हेमंत ओगले यांनी मनोगते व्यक्त केली.
वक्त्यांनी शहरातील वाढती गुंडगिरी, संघटित गुन्हेगारी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर तीव्र चिंता व्यक्त केली. अनेकांनी विविध घटनांचा उल्लेख करत नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीचे चित्र मांडले.
माजी आमदार लहु कानडे यांनी कायदा-सुव्यवस्थेवर कठोर शब्दांत टीका करत काही पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी काही गंभीर आरोप करत या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली.
प्रकाश चित्ते यांनी शहरातील गुंडगिरीमुळे सामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाची विविध उदाहरणे दिली. यावेळी एका गावच्या सरपंचाला धमकी दिल्याचा दावा करण्यात आलेली ऑडिओ क्लिपही सभेत ऐकविण्यात आली.
रमादेवी धिवर यांनी आकाश दुबय्या यांच्या हत्येबद्दल तीव्र संताप व्यक्त करत युवकांमध्ये वाढते व्यसन, अमली पदार्थांचा पुरवठा आणि त्यामागील साखळी उघड करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
हे ही वाचा : Tukaram Abhang | संतवाणी : ‘संतां नाहीं मान’ तुकोबांच्या अभंगाचा खरा अर्थ !
समारोपात आमदार हेमंत ओगले यांनी, श्रीरामपूरकरांनी सलग चार दिवस बंद पाळून एक नवा इतिहास घडविला आहे. बार असोसिएशनने आरोपींचे वकिलपत्र स्वीकारणार नसल्याचा निर्णय घेतला असून व्यापारी संघटनांनीही या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे. पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानुसार लवकरात लवकर गुन्हेगारांवर कठोर कारवाई झाली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला.
मोर्चात शहरासह ग्रामीण भागातील नागरिक, व्यापारी, उद्योजक, कामगार, युवक आणि विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मानणारा गटही मोर्चात सक्रिय दिसून आला.
दुपारी दोन वाजता मोर्चाची सांगता झाल्यानंतर शहरातील बंद मागे घेण्यात आला आणि व्यापाऱ्यांना दुकाने सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले.
पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवर आणि पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, आंदोलनानंतर पोलीस यंत्रणा अधिक सक्रिय झाली असून रात्री उशिरापर्यंत कोंबिंग ऑपरेशन राबवून काही ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईत काही हत्यारे व साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
सभेदरम्यान आमदार हेमंत ओगले यांनी काही पोलिसांबाबत गंभीर आरोप करत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. हे आरोप संबंधित लोकप्रतिनिधींनी सभेत केलेले असून त्याबाबत अधिकृत चौकशी किंवा न्यायालयीन निष्कर्ष अद्याप समोर आलेले नाहीत.
📌 हायलाइट्स : आकाश दुबय्या हत्येनंतर श्रीरामपूरकरांचा अभूतपूर्व जनआक्रोश. सलग चार दिवसांच्या बंदनंतर हजारोंचा महामोर्चा. सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती; गुंडगिरीविरोधात एकमुखी भूमिका. कठोर कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा. पोलिसांचे कडेकोट बंदोबस्त; कोंबिंग ऑपरेशन सुरू.
🚨 श्रीरामपूरकरांचा संताप रस्त्यावर!
आकाश दुबय्या हत्येनंतर हजारो नागरिकांचा संघटित गुन्हेगारीविरोधात जनआक्रोश महामोर्चा. सलग चार दिवसांच्या बंदनंतर शहराने गुंडगिरीविरोधात ऐतिहासिक एकजूट दाखवली.
📍 संपूर्ण बातमी वाचा : Rayat Samachar
#Shrirampur #Crime #Janakrosh #Ahmednagar #RayatSamachar #BreakingNews #MaharashtraNews
संपादकीय टीप: या बातमीत काही व्यक्तींविरुद्ध करण्यात आलेले आरोप हे संबंधित वक्त्यांनी सार्वजनिक सभेत केलेल्या वक्तव्यांवर आधारित आहेत. त्या आरोपांची अधिकृत चौकशी किंवा न्यायालयीन पुष्टी झालेली नाही.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



