संपादकीय | विशेष वृत्त | महाराष्ट्र
श्रीरामपूर | १४.७ | रयत समाचार
शनिवारी दुपारी आकाश दुबय्या या तरुणाची त्यांच्याच हॉटेलमध्ये निर्घृण हत्या झाली. अतिशय क्षुल्लक कारणावरून हे हत्याकांड घडले आणि संघटित गुन्हेगारीच्या विरोधात सर्व पक्षीय श्रीरामपूरकर एकवटले. श्रीरामपूरकरांनी सलग चार दिवस बंद ठेवून एक नवा इतिहास घडविला. शहरवासीयांच्या या भावनेचा पोलीस प्रशासन आणि राज्यशासन कसा विचार करते आणि काय उपाययोजना करते याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
शहरामध्ये मागील काही वर्षांमध्ये गुंडगिरीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. पोलीससुद्धा हतबल झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. हिंदू-मुस्लिम वाद वाढीस लागला. त्यातून शहराचा सामाजिक सलोखा बिघडवण्याचा अनेकदा प्रयत्न झाला परंतु सर्वसामान्य श्रीरामपूरकर या सर्व प्रकारांना बळी पडले नाहीत.
मात्र आकाश दुबय्याच्या हत्येने शहराची कायदा आणि सुव्यवस्था मोडकळीस निघाल्याने सर्वच श्रीरामपूरकरांना हळहळ वाटली आणि मग सर्वांनी एक होऊन संघटित गुन्हेगारीच्या विरोधात आवाज उठविला. राजकीयदृष्ट्या एकमेकांच्या विरोधात असणारे सर्व नेते, कार्यकर्ते एकवटले आणि चार दिवसांचा ऐतिहासिक बंद शहरात पाळला गेला.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीदेखील शहराच्या कायदा सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करून याबाबत महिनाभरामध्ये उपाययोजना करणार असल्याचे जाहीर केलेले असले तरी त्यांनी आंदोलकांशी संवाद साधून त्यांना विश्वास देणे आवश्यक होते, अशी सार्वत्रिक भावना आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये शहरांमध्ये व्यसनाधीन तरुणांचे प्रमाण वाढले. ड्रग्स विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. त्याचबरोबर गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले. व्यापाऱ्यांना हप्ते मागितले जात असल्याच्या तक्रारीमध्ये मोठी वाढ झाली परंतु दुर्दैव म्हणजे या सर्व प्रकाराविरुद्ध आवाज उठवण्याची हिंमत कोणामध्येच नव्हती कारण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेऊन गेल्यानंतर त्यांची दखलच घेतली जात नव्हती. उलट “हे नाव घेऊ नका, ते नाव घेऊ नका, आपसात मिटवून घ्या.” अशा प्रकारचे सल्ले दिले जात होते. यासर्व बाबी आता समोर आल्यात.
आमदार हेमंत ओगले व नगराध्यक्ष करण ससाणे यांनी सर्व पक्षातील नेत्यांशी संपर्क करून राजकारण बाजूला ठेवून ‘आम्ही श्रीरामपूरकर’ म्हणून शहराच्या शांततेसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला सर्वपक्षीयांनी मोठा प्रतिसाद दिला आणि त्यातून चार दिवसाचा अभूतपूर्व ‘श्रीरामपूर बंद’ यशस्वी झाला.
कधीकाळी शांतताप्रिय शहर म्हणून श्रीरामपूरची ओळख होती परंतु गेल्या काही दिवसांमध्ये ती आता पुसली गेली. शहरामध्ये विविध जातीधर्माचे लोक आजही एकोप्याने, सलोख्याने राहतात. सर्वांचे व्यवसाय एकमेकांवर अवलंबून आहेत. अनेकवर्षाचे ऋणानुबंध जपत सर्वजण गुण्यागोविंदाने राहत असताना मागील पाच-सात वर्षांमध्ये या वातावरणाला गालबोट लावण्याचे दुष्कृत्य केले गेले. त्याला राजकीय नेते मंडळींनी वेळोवेळी आपल्या सोयीनुसार भूमिका घेत खतपाणी घातले, यातून गुंडगिरी वाढली.
हिंदुत्वाच्या नावाखाली लोक एकवटण्याचे प्रयत्न होत असताना सर्वात जास्त त्रास हिंदूंना झाला, असे आता दिसून आले आहे. गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली त्यामध्ये अल्पवयीन मुलांना व्यसनाधीन करून वेगळ्या मार्गाला लावण्याचे प्रकार घडले आहेत. ड्रग्जचे व्यसन अतिशय घातक असते याचा प्रत्ययसुद्धा परवाच्या घटनेने आला. शहरामध्ये गुंगीच्या औषधाची इंजेक्शनने बिनदिक्कतपणे विक्री होत असताना पोलिसांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली, ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे.
पोलिसांवर ‘वरचा’ दबाव असल्याने तेसुद्धा काही करू शकत नव्हते, असे अनेक पोलीस खाजगीमध्ये बोलताना आजही दिसतात. राजकीय मंडळींनी सोयीनुसार भूमिका घेऊन गुंडगिरीला प्रोत्साहन दिल्याने आज शहरांमध्ये अत्यंत अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. कधी काय घडेल याचा नेम राहिलेला नाही. घरातून बाहेर पडलेला माणूस सुरक्षित घरी पडते याची शाश्वती नसल्याने शहरवासीय भयभीत झाल्याचे चित्र आज पहावयास मिळत आहे. अनेकजण तर आता श्रीरामपूर शहर सोडण्याची भाषा करीत आहेत. हे चित्र अतिशय भयाण व भीतीदायक आहे. भावी पिढीचे या शहरात भवितव्य काय? असा प्रश्न आता महिलावर्ग सुद्धा विचारीत आहे.
गेली काही वर्ष सातत्याने एका सामाजिक वर्गाविरुद्ध ओरड करून शहराचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न झाला, मात्र आता आपल्याच निष्पाप लेकराचा बळी गेल्याने सर्वजण खडबडून जागे झाले आणि त्यातूनच अभूतपूर्व असे हे आंदोलन उभे राहिले.
आज चौथा दिवस असूनही राज्यशासनाकडून या आंदोलनाची पाहिजे तशी दखल घेतली गेलेली नाही. मात्र आज होणाऱ्या मोर्चाला पालकमंत्री सामोरे जाणार का आणि ते शहरवासीयांना शांततेचा संदेश आणि विश्वास देणार का ? असा प्रश्न सर्वसामान्य श्रीरामपूरकर विचारत आहे.
शहरामध्ये सर्व धर्मीय लोक अतिशय सलोख्याने आजपर्यंत राहत आलेले आहेत. गुंडगिरी करणारे दोन्हीकडे ठराविक माणसे आहेत. या लोकांपासून समाज खूप दूर आहे, यांना समाजाचा अजिबात पाठिंबा नाही परंतु कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याने गुंडगिरी वाढण्यास मदत झाली आहे. हे गुंडगिरी मोडून काढण्यासाठी आणि शहरांमध्ये कायमस्वरूपी शांतता आणि सुव्यवस्था राहण्यासाठी प्रभावी उपाययोजनांची गरज आहे.
सर्वपक्षीय आणि सर्वधर्मीय नागरिकांचे हे आंदोलन भावी श्रीरामपूरसाठी मैलाचा दगड ठरेल. श्रीरामपूरच्या भविष्याचा नवीन अध्याय पुन्हा लिहिला जाईल अशी अपेक्षा प्रत्येक नागरिक व्यक्त करीत आहेत.
🚨 श्रीरामपूरच्या इतिहासातील अभूतपूर्व आंदोलन!
आकाश दुबय्या हत्येनंतर सर्वपक्षीय आणि सर्वधर्मीय नागरिक संघटित गुन्हेगारीविरोधात एकत्र आले. सलग चार दिवसांचा बंद पाळून श्रीरामपूरकरांनी शांतता, सलोखा आणि कठोर कायदा-सुव्यवस्थेची मागणी केली.
संपूर्ण वृत्त वाचा : Rayat Samachar
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



