इतिहासवार्ता | ४.७ | प्रभाकर ढगे
(Aguada Escape) गोवा मुक्ती संग्रामातील झुंजार स्वातंत्र्यसैनिक नामदेव हरमलकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या जन्मगावी तुये येथे ४ जुलै २०१८ रोजी आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा योग आला. त्यावेळी नामदेव हरमलकर यांच्या पराक्रमाचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेले ८५ वर्षीय स्वातंत्र्यसैनिक भैय्या देसाई, स्वतः अंधत्व आलेले असतानाही आवर्जून उपस्थित होते. तसेच गोवा श्रमिक पत्रकार संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष किशोर नाईक गावकर, इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझाचे तत्कालीन अध्यक्ष संजय हरमलकर आणि नामदेव हरमलकर यांच्या कन्या भारती मोदी यांचीही उपस्थिती लाभली.
(Aguada Escape) यावेळी गोवा मुक्ती संग्रामाचा इतिहास उलगडताना अनेक दुर्लक्षित पराक्रमांवर प्रकाश टाकण्यात आला. भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गोवा मुक्तीसाठीच्या चळवळींना अधिक वेग आला. फेब्रुवारी १९५० मध्ये पोर्तुगालने गोवा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघाकडे सोपविण्यास नकार दिला. १९५४ मध्ये दादरा-नगरहवेली भाग पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त झाला. त्यानंतर तेथे आपल्या फौजांना मुक्त प्रवेश मिळावा, या मागणीसाठी पोर्तुगालने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली; मात्र १२ एप्रिल १९६० रोजी न्यायालयाने पोर्तुगालविरोधात निकाल दिला.
हे ही वाचा : योगदिन : यम-नियमांची एैशी तैशी; टी.एन. परदेशी यांचा ‘योगसंवाद’ वाचा
(Aguada Escape) दरम्यान, डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या प्रेरणेने गोव्यात पोर्तुगीजांविरोधातील आंदोलन अधिक तीव्र झाले. १९५५ मध्ये हजारो सत्याग्रहींनी गोमंतकात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. आझाद गोमंतक दल, गोवा लीग, गोवा मुक्ती फौज, विमोचन समिती यांसारख्या अनेक संघटनांनी गोवा मुक्तीचा लढा निर्णायक टप्प्यावर नेला. अखेर १८ डिसेंबर १९६१ रोजी भारतीय सैन्याने लष्करी कारवाई सुरू केली आणि १९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त झाल्याची अधिकृत घोषणा झाली.
गोवा मुक्तीच्या या महान संग्रामात शेकडो ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता योगदान दिले. दुर्दैवाने त्यांपैकी अनेकांच्या शौर्यकथा इतिहासाच्या पानांवर पुरेशा ठळकपणे उमटल्या नाहीत. स्वातंत्र्यवीर नामदेव हरमलकर हे त्यापैकीच एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व होय.
हरमलकर आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांनी पोर्तुगीजांच्या कडक पहाऱ्यातून सुटका करण्यासाठी आग्वाद किल्ल्यातील तुरुंगाच्या तब्बल ३० फूट उंच तटावरून थेट समुद्रात उडी घेतली. मृत्यूला डोळ्यासमोर ठेवून केलेली ही धाडसी झेप यशस्वी ठरली आणि ते कैदेतून सुटले. त्यानंतरही त्यांनी भूमिगत राहून गोवा मुक्तीसाठीचा संघर्ष अखंड सुरू ठेवला.
इतिहासाच्या दृष्टीने ही घटना अत्यंत रोमांचकारी आणि प्रेरणादायी असली, तरी या चार शूरवीरांची आग्वादातील ऐतिहासिक उडी गोमंतकीय इतिहासात अपेक्षित स्थान मिळवू शकली नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मार्सेलिस येथील ऐतिहासिक उडीचा गौरव महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर झाला; मात्र नामदेव हरमलकर यांच्या आग्वादातील अद्वितीय पराक्रमाकडे गोव्यातही अपेक्षेइतके लक्ष गेले नाही, ही खंत आजही कायम आहे.
साडेचारशे वर्षांच्या पोर्तुगीज राजवटीत गोव्याने अनेक सशस्त्र आणि लोकआंदोलने अनुभवली. कुंकळ्ळीचा लढा, नरवीर दीपाजी राणे यांचे उठाव, फादर पिंटोचे बंड, कुष्टोजी राणे यांचे आंदोलन तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या गोव्यावरील मोहिमा अशा अनेक ऐतिहासिक घटनांनाही इतिहासलेखनात अपेक्षित न्याय मिळालेला नाही.
गोवा मुक्तीनंतरही नामदेव हरमलकर यांनी पत्रकारिता, समाजसेवा, तंटामुक्त गाव अभियान आणि विविध लोकचळवळींमधून समाजकार्य सुरू ठेवले. स्वातंत्र्यसैनिक म्हणूनच नव्हे, तर एक जागरूक पत्रकार, समाजभिमुख कार्यकर्ता आणि लोकनेता म्हणून त्यांनी आयुष्यभर कार्य केले.
आज त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्या अदम्य साहसाला आणि राष्ट्रनिष्ठेला विनम्र अभिवादन. इतिहासातील अशा दुर्लक्षित शौर्यगाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार तथा रयत समाचारचे समूह संपादक आहेत)
India news | आरक्षण, स्पर्धा परीक्षा आणि लॅटरल एन्ट्री : नेमकं कुणासाठी चाललंय सरकार?
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


