Yoga Day | 21जून आंतरराष्ट्रीय योगदिन : यम-नियमांची एैशी तैशी; टी.एन. परदेशी यांचा 'योगसंवाद' वाचा - Rayat Samachar
Ad imageAd image

Yoga Day | 21जून आंतरराष्ट्रीय योगदिन : यम-नियमांची एैशी तैशी; टी.एन. परदेशी यांचा ‘योगसंवाद’ वाचा

योग म्हणजे केवळ आसने नव्हेत; यम-नियमांचे पालन, चित्तशुद्धी आणि नैतिक जीवनशैलीशिवाय योग अपूर्ण

रयत समाचार वृत्तसेवा
3 Min Read
योगाचे तत्त्वज्ञान, यम-नियम आणि चित्तशुद्धी यावर मार्गदर्शन करणारे टी.एन. परदेशीSubEditor | Dipak Shirasath

योगसंवाद | २२.६ | टी.एन. परदेशी

(Yoga Day) काल सगळीकडे ‘योगा’ चा बोलबाला होता. बहुतेक सर्वच ठिकाणी ‘योग’च्या नावावर काही योगासने, सूर्यनमस्कार व काही व्यायाम करवून घेण्यात आले. योगाविषयी, अष्टांग योगाविषयी कोठे एखादे व्याख्यान झालेही असेल, पण योग म्हणजे नेमके काय हे समजावून सांगणाऱ्या व्याख्यानांचा अगदीच अभाव होता. मात्र भारतीय योग विद्या भवनतत्सम अनेक संस्थांमधे Yoga Day योगाविषयी परिपूर्ण शिक्षण दिले जाते.

यम व नियम ही अष्टांग योगाची पहिली दोन व सर्वात महत्वाची अंगे आहेत. ही दोन अंगे संपूर्णत: अंगीकारणे अशक्य असले तरी त्यातील काही महत्वाच्या गोष्टींचे अनुसरण केल्याशिवाय योग Yoga Day अगदीच अपूर्ण ठरतो. यम नियमांमधे प्रामुख्याने वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक नियमांचा समावेश असतो. अहिंसा, सत्य,अस्तेय ही एकादश. अकरा तत्वे किंवा बुद्धाचा पंचशील उपदेश हे यम नियमच आहेत.

वृद्धांचा आदर करणे, आईवडीलांना वृद्धापकाळात सांभाळणे, हा सार्वकालिक यम नियम आहे. द्वेष, इर्षा, मत्सर, काम, क्रोध, मोह, लोभ हे सारे शत्रु. त्यांचा संसर्ग काही मानवी जीवनास चुकत नाही, परंतु काही विशेष मर्यादा घालून घेणे कठीण नसते. अवघे गावखेडे भाऊबंदकीने नासवले आहे. विज्ञानयुगातही ‘बांध कोरणे’ काही बंद होत नाही. हा उपद्रव चालू ठेवून कोणी ‘योग’ Yoga Day करू पाहील तर तो सफल होणार नाही.

हे ही पहा : RSYT : अडीच हजार वर्षांपूर्वी विटांवर कोरलेल्या ‘सिंह सेनापती’ कादंबरीचा मराठी अनुवाद

शहरात वाहतूकीचे नियम सर्वत्र बिनदिक्कत तोडले जातात. काल पुण्यात बाणेरला कार घासली म्हणून, महागड्या कार्सचे दोन मालक यात महिलांचाही समावेश होता, भरगर्दीत मारामारी करत होते. कालच बोपदेव घाटात अशाच क्षुल्लक कारणावरून पी.एम.टी. बसच्या ड्रायव्हरला दोनतीन लोक बेदम मारहाण करत होते. ही मंडळी आज कदाचित जवळपासच्या बागेत ‘योगा डे’च्या कार्यक्रमात सहभागी झाली असतीलही !
योगाचा प्रमुख उद्देश ‘चित्तवृत्ती प्रक्षोभ’ कमी करणे. हा जसा योगाचा एक उद्देश आहे तसाच ‘चित्तशुद्धी’ हाही आहे. कपटी कारस्थानी वृत्तीची, चहाडीचुगली करणारी माणसे दिसायला गरीब, पण अनेकदा एखाद्याचे जगणे अशक्य करून सोडतात. अशी माणसे रोज वर्षानुवर्षे ‘योग’ करत असल्याचा टेंभा मिरवतात तेव्हा ते योगासनांच्या माध्यमातून फक्त शरीराचा व्यायाम करत असतात.
एखाद्याचा मानसिक छळ करणे, ही एक भयानक विकृती आहे. यामुळे छळ होत असलेला माणूस व अनेकदा त्याचे कुटुंब उध्वस्त झाल्याचे आपण पाहतो. पुण्यात एकाने अधिकारी व सहकारी यांच्याकडून होणाऱ्या सामूहिक छळास कंटाळून आत्महत्या केली. आता ही छळ करणारी मंडळी जर योगाच्या क्लासला जात असतील तर त्यांच्या अंगी योग उतरला किती हा प्रश्न राहतो.
असा एक भयानक विकृत अधिकारी मी पाहिला आहे ! तो गृहस्थ कोणा गुरूकडून उपदेश, अनुग्रह घेतलेला, पहाटे उठून योगा, ध्यान व गुरूमंत्राचे पठण करणारा. त्या मार्गाची तासदीडतास साधना करणारा होता. प्रत्यक्ष व्यवहारात मात्र कट्टर जातीयवादी, पूर्वग्रहबाधित व परपीडक असा होता.
अशांची साधना, योग व गुरुमंत्राचे पठण म्हणजे निव्वळ अवडंबर असते. त्यास प्रमुख कारण म्हणजे योगमार्ग, साधना म्हणजे काय याचे आकलनच झालेले नसते व याच्या मूळाशी असते ते यम-नियमांच्या महात्म्याविषयीचे घोर अज्ञान !
संपर्क क्रमांक : 9970307110
(लेखक यांचे ‘गर्भगिरीतील नाथपंथ‘ आणि ‘महायोगी शिव गोरक्षनाथ‘ हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत)

Human Right | लोकशाहीचा प्राणवायू धोक्यात? महाराष्ट्राच्या नव्या RTI कायद्याविरोधात जनांदोलनाची गरज

- Advertisement -

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading