Ad imageAd image

World news | अमेरिकेकडून भारतीय खलाशांच्या हत्येचा डाव्या पक्षांनी केला तीव्र निषेध; देशव्यापी आंदोलनाचा इशारा

केंद्र सरकारने ठोस भूमिका घेण्याची मागणी

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

नवी दिल्ली | १५.६ | रयत समाचार

(World news) भारतीय खलाशांवर झालेल्या अमेरिकन नौदलाच्या हल्ल्याचा देशातील पाच प्रमुख डाव्या पक्षांनी तीव्र निषेध करत केंद्र सरकारने अमेरिकेकडे कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी केली. भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), भारतीय कम्युनिस्ट पक्ष, सीपीआय (एमएल) लिबरेशन, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक आणि रिव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टी यांनी सोमवारी ता.१५ रोजी संयुक्त निवेदन प्रसिद्ध करून ही भूमिका मांडली.

(World news) निवेदनात म्हटले की, होर्मूझ सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या भारतीय खलाशांसह व्यापारी जहाजांवर अमेरिकन नौदलाने हल्ला केला असून त्यात तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाला. भारतीय कर्मचाऱ्यांवरील हा तिसरा हल्ला असल्याचा दावा करत या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.

(World news) डाव्या पक्षांनी अमेरिकेच्या कारवाईवर टीका करत ती संयुक्त राष्ट्रांच्या सनदेच्या तसेच आंतरराष्ट्रीय समुद्री वाहतुकीच्या स्वातंत्र्याच्या तत्त्वांच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेचे वर्चस्ववादी धोरण जागतिक शांततेसाठी धोकादायक असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला.

याचबरोबर केंद्रातील भाजपप्रणीत सरकारवरही निशाणा साधत, भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाला धक्का पोहोचत असल्याची टीका करण्यात आली. भारतीय नागरिकांच्या मृत्यूबाबत अमेरिकेकडून स्पष्ट दिलगिरी आणि जबाबदारीची मागणी करण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप डाव्या पक्षांनी केला.

निवेदनात पुढे म्हटले की, अमेरिकेच्या इराण आणि पश्चिम आशियातील कारवायांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असून ऊर्जा, खते आणि इतर अत्यावश्यक वस्तूंच्या किमती वाढत आहेत. जागतिक दक्षिणेतील महत्त्वाचा देश म्हणून भारताने अमेरिकेच्या आक्रमक धोरणांचा निषेध करावा आणि विकसनशील देशांच्या आवाजाचे नेतृत्व करावे, अशी मागणी करण्यात आली.

मृत भारतीय खलाशांच्या कुटुंबियांना योग्य नुकसानभरपाई देण्यात यावी, तसेच या प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यासाठी सर्व राजनैतिक मार्गांचा वापर करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. देशभरातील डाव्या पक्षांच्या संघटनांमार्फत अमेरिकेच्या विरोधात निदर्शने आयोजित करण्यात येणार असल्याचाही इशारा या निवेदनातून देण्यात आला.

या संयुक्त निवेदनावर सीपीआयचे सरचिटणीस डी. राजा, सीपीआय (एम) चे एम.ए. बेबी, सीपीआय (एमएल) लिबरेशनचे दीपांकर भट्टाचार्य, आरएसपीचे मनोज भट्टाचार्य आणि फॉरवर्ड ब्लॉकचे जी. देवराजन यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Cultural Politics | एकात्मिक मानववाद, ढोंगाचा बाजार आणि पंडीत दीनदयाळ यांची फसवणूक 


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading