Nimblak: निंबळक रेल्वे गेट बंद करण्यापूर्वी पर्यायी मार्गाची व्यवस्था करा : डॉ. दिलीप पवार; नागरिकांच्या मागणीनंतर रेल्वे प्रशासनाचे लेखी आश्वासन; तीन दिवसांऐवजी आता दोनच दिवस गेट राहणार बंद - Rayat Samachar

Nimblak: निंबळक रेल्वे गेट बंद करण्यापूर्वी पर्यायी मार्गाची व्यवस्था करा : डॉ. दिलीप पवार; नागरिकांच्या मागणीनंतर रेल्वे प्रशासनाचे लेखी आश्वासन; तीन दिवसांऐवजी आता दोनच दिवस गेट राहणार बंद

rayatsamachar
2 Min Read
Subeditor | Dipak Shirsath

अहिल्यानगर | ०१.११ | रयत समाचार

Nimblak: निंबळक येथील रेल्वे गेट लोहमार्ग दुरुस्तीच्या कामासाठी २, ३ व ४ नोव्हेंबर असे सलग तीन दिवस बंद ठेवण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले होते. मात्र, परिसरातील नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आता रेल्वे गेट केवळ दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच, दोन दिवसांत पर्यायी रस्त्याचे काम पूर्ण करून तो वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात येईल, असे लेखी आश्वासन रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

निंबळक, इसळक, खारेकर्जुने, टाकळी, खातगाव, जखणगाव, हिंगणगाव आदी गावांतील हजारो नागरिकांसह एमआयडीसीमध्ये कामासाठी जाणाऱ्या कामगारांसाठी हा रेल्वे गेट महत्त्वाचा मार्ग आहे. रेल्वे गेट बंद झाल्यास नागरिकांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागतो. त्यामुळे गेट बंद करण्यापूर्वी पर्यायी रस्त्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली होती.

या संदर्भात पंचायत समितीचे माजी उपसभापती डॉ. दिलीप पवार यांनी मध्य रेल्वेच्या वरिष्ठ सेक्शन इंजिनिअर शैलेश कुमार सिंह यांच्याकडे निवेदन देऊन रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले. दरवर्षी लोहमार्ग दुरुस्तीच्या कारणास्तव आठ ते दहा दिवस रेल्वे गेट बंद ठेवले जात असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो. त्यातच निंबळक रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने ही समस्या कायम आहे.

रेल्वे गेट बंद असताना उपलब्ध असलेले पर्यायी मार्ग शेतातून आणि खडकाळ रस्त्यांमधून जात असल्याने ते वाहतुकीसाठी अत्यंत गैरसोयीचे आहेत. याचा सर्वाधिक फटका शाळकरी विद्यार्थी, दूध व्यावसायिक आणि एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना बसतो. तसेच, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना रुग्णालयात पोहोचविताना मोठ्या अडचणी निर्माण होतात.

निंबळक रेल्वे गेटचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात कधी होणार, याबाबत रेल्वे प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर ठोस कार्यवाही न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही डॉ. दिलीप पवार, बी.डी. कोतकर, महेश म्हस्के, सोमनाथ खांदवे आणि शिवाजी दिवटे यांनी दिला आहे.

दरम्यान, रेल्वे गेट आता तीन दिवसांऐवजी दोन दिवसच बंद राहणार असल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानुसार पर्यायी रस्त्याचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी डॉ. दिलीप पवार यांनी केली आहे.

सविस्तर वाचा : सावित्रीबाई फुलेंच्या शिक्षिका सिंथिया फरार यांच्या समाधीचा नगरमध्ये शोध, जाणून घ्या त्यांचं कार्य

- Advertisement -

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading