नवी दिल्ली | २४.६ | रयत समाचार
(BJP Fascism) संघ-भाजपाच्या राजकारणाने महाराष्ट्रात आणि देशात द्वेष, फूट, फॅसिस्ट सत्तापद्धती आणि लोकशाही संस्थांचे अवमूल्यन वाढवले असून, या सर्वांविरोधात जनतेचा व्यापक जनक्षोभ उसळल्याशिवाय पर्याय नाही, असा घणाघात अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉम्रेड राजन क्षीरसागर यांनी केला आहे. शिवसेना, तृणमूल काँग्रेस, जनता दल (युनायटेड), अण्णा द्रमुक, बसपा, तेलंगणा राष्ट्र समिती आणि राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षांच्या नेतृत्वाला आतून पोखरण्याचा भाजपाचा ठरवून राबवलेला राजकीय पॅटर्न देशासमोर उघड झाला असल्याचा आरोपही त्यांनी केला.
(BJP Fascism) क्षीरसागर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या लेखी प्रतिक्रियेत महाराष्ट्राच्या राजकीय अधःपतनावर भाष्य करताना म्हटले की, टपोरी आणि दंगेखोर प्रवृत्तींना कधी ‘खान की बाण’ तर कधी ‘घरात नाही पीठ आणि कशाला मागता विद्यापीठ’ अशा उत्तेजक भाषेत राजकीय प्रतिष्ठा देत ज्या प्रवाहाची उभारणी झाली, त्यालाच पुढे संघ-भाजपाने आपल्या आश्रयाने वाढवले आणि नंतर आतून पोखरत ताब्यात घेतले. श्रीकृष्ण आयोगाचा अहवाल बासनात गुंडाळून ठेवणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राच्या आजच्या बरबादीची बीजे पेरल्याचा आरोपही त्यांनी केला.
(BJP Fascism) ‘भाजपाचा पॅटर्न म्हणजे पक्षांत फूट, क्रमांक २ नेत्यांना वश करून नेतृत्व निष्प्रभ करणे’ : राजन क्षीरसागर यांनी भाजपावर गंभीर आरोप करताना म्हटले की, देशभरातील प्रादेशिक आणि विरोधी पक्षांवर घाला घालण्यासाठी भाजपाने एक ठराविक पॅटर्न विकसित केला आहे. त्यानुसार संबंधित पक्षातील दुसऱ्या क्रमांकाच्या नेत्यांना वश करून, त्यांना आमिषे दाखवून किंवा दबावाखाली आणून मूळ नेतृत्व निष्प्रभ करण्याची नीती राबवली जाते. शिवसेना, तृणमूल काँग्रेस, जनता दल (यू), अण्णा द्रमुक, बसपा, तेलंगणा राष्ट्र समिती, जनता दल (देवेगौडा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांसारख्या पक्षांच्या अनुभवातून हा पॅटर्न स्पष्ट दिसतो, असा दावा त्यांनी केला.
‘लोकशाही संस्थांना दावणीला बांधून सत्तेसाठी धर्म-जातीच्या द्वेषाचे राजकारण’ : केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधताना क्षीरसागर म्हणाले की, न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग यांसारख्या संवैधानिक संस्थांनाही दावणीला बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे धर्म-जातीच्या द्वेषाची नशा ही सत्ता मिळविण्याचा शॉर्टकट असल्याचे राजकारण जाणीवपूर्वक रुजवले गेले. त्यामुळे देशातील लोकशाही मूल्यांवर गंभीर आघात झाला असून, सर्वंकष जनआंदोलनाशिवाय ही दिशा बदलणे शक्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
NEET पेपर लीक, बेरोजगारी, अदानी-अंबानी मक्तेदारी; ‘रोज नवे पितळ उघडे पडतेय’ : संघ-भाजपाच्या कारभाराचे ‘पितळ’ रोज उघडे पडत असल्याचा आरोप करताना त्यांनी NEET पेपर लीक प्रकरण, नौदल अधिकाऱ्यांचा मृत्यू, अदानी-अंबानींची मक्तेदारी, बेरोजगारी, राम मंदिरातील दानातील कथित गैरव्यवहार, न्यायाधीशांच्या घरातील रोकड अशा विविध मुद्द्यांचा उल्लेख केला. या सर्व घटनांमधून सत्ताधाऱ्यांची सडकी विचारसरणी आणि भ्रष्ट व्यवहार जनतेसमोर उघडे पडत असून, त्याविरोधात लोकक्षोभ उफाळल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
‘परिस्थिती बदलतेय; जनतेच्या सर्वंकष लढ्याची वेळ आली’ : संघ-भाजपाविरोधातील लढा अवघड वाटत असला, तरी जनतेच्या सर्वंकष संघर्षाशिवाय लोकांची जाणीव बदलणार नाही आणि राजकारणाची दिशाही बदलणार नाही, असे नमूद करत क्षीरसागर यांनी विरोधी आणि प्रगतिशील शक्तींनी व्यापक लोकआंदोलन उभारण्याचे आवाहन केले. सध्या वेगाने बदलणाऱ्या परिस्थितीत सत्ताधाऱ्यांच्या कारभारातील विरोधाभास उघड होत असून, याचातून मोठा जनक्षोभ निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कॉम्रेड राजन क्षीरसागर हे क्रांतिसिंह नाना पाटील एकेकाळी राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष असून, शेतकरी, कामगार, लोकशाही हक्क आणि धर्मनिरपेक्ष राजकारणाच्या मुद्द्यांवर ते सातत्याने भूमिका मांडत असतात. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडी, विरोधी पक्षांतील फूट आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर त्यांनी या लेखी प्रतिक्रियेतून थेट हल्लाबोल केला आहे.
Human Right | लोकशाहीचा प्राणवायू धोक्यात? महाराष्ट्राच्या नव्या RTI कायद्याविरोधात जनांदोलनाची गरज
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


