World news | पाकिस्तानातील ऐतिहासिक नावांच्या पुनर्स्थापनेचे स्वागत; शीख धर्मगुरूंच्या पवित्र जन्मस्थळांच्या जतन, सुशोभीकरणाची येलुलकर यांची मागणी

रयत समाचार वृत्तसेवा
3 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

अहमदनगर | २१.५ | रयत समाचार

(World news) पाकिस्तानमधील शहरांसह पंजाब प्रांतातील अनेक भागांना स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदू देवदेवतांची, ऐतिहासिक व्यक्तींची तसेच सांस्कृतिक वारशाशी निगडित नावे होती. फाळणीनंतर अनेक ठिकाणांची नावे बदलून नव्याने मुस्लिम नावे देण्यात आली होती. मात्र अलीकडे पंजाब प्रांत प्रशासनाने पुन्हा काही ऐतिहासिक व पारंपरिक नावांचा विचार सुरू केल्याची बाब अत्यंत स्वागतार्ह असून, ती सामाजिक ऐक्य, सांस्कृतिक समन्वय आणि इतिहास संवर्धनाला प्रेरणा देणारी आहे, असे मत सामाजिक अभ्यासक रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलुलकर यांनी व्यक्त केले.

(World news) भारत पाकिस्तान फाळणीपूर्व पंजाबचा इतिहास हा विविध धर्म, संस्कृती आणि परंपरांचा संगम राहिला आहे. शीख साम्राज्याचे संस्थापक महाराजा रणजीत सिंह यांचे जन्मस्थळ गुजराणवाला येथे असून, शीख धर्माचे चौथे गुरु गुरुराम दास यांचा जन्म लाहोर येथे झाला होता. ही स्थळे संपूर्ण शीख समाजासाठी अत्यंत पवित्र आणि प्रेरणादायी मानली जातात.

(World news) इतिहास हा कोणत्याही एका धर्माचा किंवा समुदायाचा नसून तो संपूर्ण मानवजातीचा सांस्कृतिक ठेवा असतो. त्यामुळे पाकिस्तान सरकारने ज्या प्रकारे ऐतिहासिक नावांच्या पुनर्स्थापनेचा सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारण्यास सुरुवात केली आहे, तो जागतिक स्तरावर शांतता, सहअस्तित्व आणि एकात्मतेचा संदेश देणारा ठरेल. यामुळे पाकिस्तानची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक सकारात्मक उंचावण्यास मदत होईल, असेही येलुलकर यांनी नमूद केले.
याचे औचित्य साधून पंजाबमधील शीख धर्मगुरू व ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांच्या जन्मस्थळांचे जतन, सुशोभीकरण आणि पर्यटनदृष्ट्या विकास करण्यात यावा. त्या परिसरात माहिती केंद्र, चित्रदालन, ऐतिहासिक छायाचित्रे, डिजिटल माहिती फलक, संशोधन साहित्य तसेच पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यास जागतिक स्तरावरील पर्यटक, अभ्यासक आणि शीख बांधवांसाठी हे स्थळ प्रेरणास्थान ठरतील, असे त्यांनी म्हटले.
शीख साम्राज्याचे संस्थापक महाराजा रणजीत सिंह यांचा जन्म १३ नोव्हेंबर १७८० रोजी गुजराणवाला येथे झाला. हे ठिकाण पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात येते. त्यांना ‘शेर- ए- पंजाब’ म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी १९व्या शतकात पंजाबमध्ये शक्तिशाली शीख साम्राज्य उभारले.
गुरुराम दास यांचा जन्म लाहोर येथे झाला होता. ते शीख धर्माचे चौथे गुरु होते आणि त्यांनी पुढे अमृतसर शहराची स्थापना केली. अमृतसरमधील प्रसिद्ध हरमिंदर साहिब (सुवर्ण मंदिर) हे शीख धर्मातील अत्यंत पवित्र स्थळ त्यांच्या कार्याशी संबंधित आहे.
इतिहास जतन करणे म्हणजे भविष्यातील पिढ्यांना सांस्कृतिक समन्वयाची शिकवण देणे होय. त्यामुळे अशा ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी सर्व स्तरांतून सकारात्मक प्रयत्न होणे आवश्यक आहे, असेही जयंत येलुलकर यांनी शेवटी म्हटले आहे.

India news | आरक्षण, स्पर्धा परीक्षा आणि लॅटरल एन्ट्री : नेमकं कुणासाठी चाललंय सरकार?


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading