Teacher Panch Duty | शिक्षक आता वर्गात की पोलीस ठाण्यात? तपासपंच म्हणून नियुक्ती, शिक्षकांमध्ये संताप - Rayat SamacharTeacher Panch Duty राहुरीत शिक्षकांची पोलीस पंच म्हणून नियुक्ती; अशैक्षणिक कामांमुळे शिक्षकांमध्ये नाराजी

Teacher Panch Duty | शिक्षक आता वर्गात की पोलीस ठाण्यात? तपासपंच म्हणून नियुक्ती, शिक्षकांमध्ये संताप

जनगणना, एसआयआर, बीएलओ आणि प्रशिक्षणाच्या जबाबदाऱ्यांनंतर आता पोलीस तपासासाठीही शिक्षकांची नियुक्ती

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read

राहुरी | १.६ | रयत समाचार

(Teacher Panch Duty) राज्यात आधीच जनगणना, विशेष मतदार पुनर्पडताळणी (SIR), बीएलओची जबाबदारी आणि नव्या अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणामुळे प्राथमिक शिक्षकांवर कामांचा प्रचंड ताण असताना राहुरी तालुक्यातील शिक्षकांना आता आणखी एका नव्या जबाबदारीला सामोरे जावे लागणार आहे. राहुरी पोलीस ठाण्यात गुन्ह्यांच्या तपासासाठी पंच म्हणून शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

(Teacher Panch Duty) पंचायत समिती राहुरीच्या गटशिक्षणाधिकारी जयश्री कारले यांच्या स्वाक्षरीने ३० जून रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार जुलै २०२६ महिन्यात राहुरी तालुक्यातील विविध केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक व प्राथमिक शिक्षक यांची दररोजच्या तारखेनुसार पोलीस तपासातील पंच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित दिवशी पोलीस ठाण्यातून दूरध्वनी आल्यास तात्काळ उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले असून, कॉल आला किंवा आला नाही याचा अहवाल दुसऱ्या दिवशी कार्यालयात सादर करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

(Teacher Panch Duty) आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की, पंच म्हणून नियुक्त केलेल्या दिवशी शिक्षक अनुपस्थित राहिल्यास किंवा पंचनामा प्रक्रियेत अडथळा निर्माण झाल्यास त्यासाठी संबंधित शिक्षक जबाबदार राहतील.
यापूर्वीच एसआयआरच्या कामासाठी अनेक शिक्षकांना महिनाभर शाळांमधून कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर जनगणना, बीएलओची कामे आणि नव्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण सुरू असल्याने वर्गातील अध्यापनावर परिणाम होत असल्याची तक्रार शिक्षकांकडून सातत्याने केली जात आहे. अशा परिस्थितीत पोलीस तपासासाठीही शिक्षकांची नियुक्ती केल्याने “शिक्षकांनी नेमके अध्यापन करायचे की शासनाची विविध कामे?” असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर या निर्णयाचा प्रतिकूल परिणाम होणार असल्याची चिंता पालकांनी व्यक्त केली आहे. शिक्षक वर्गाबाहेर राहिल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचेही मत व्यक्त केले जात आहे.
शिक्षक संघटनांनी या निर्णयावर आक्षेप घेत जनगणना, एसआयआर, बीएलओ आणि इतर निवडणूकविषयक जबाबदाऱ्या आधीच शिक्षकांवर आहेत. त्यामुळे पोलीस तपासासाठी पंच म्हणून नियुक्ती करण्याऐवजी इतर विभागांतील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली आहे. अलीकडेच पाथर्डी येथे अशैक्षणिक कामांच्या मानसिक तणावातून एका महिला शिक्षिकेचा मृत्यू झाल्याच्या घटनेचा उल्लेख करत शिक्षकांनी शासनाने शिक्षकांवरील वाढता अशैक्षणिक कामांचा बोजा तातडीने कमी करण्याची मागणी केली आहे.

Teacher Panch Duty | शिक्षक आता वर्गात की पोलीस ठाण्यात? तपासपंच म्हणून नियुक्ती, शिक्षकांमध्ये संताप


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading