SPPU Decisions | विद्यार्थी हिताला मोठा दिलासा! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे महत्त्वपूर्ण निर्णय; 19 कोटींच्या गुणवत्ता सुधार योजना - Rayat SamacharSPPU Decisions सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मोठे निर्णय; तृतीयपंथीय शुल्कमाफी, OBC वसतिगृह, MSc व्हायरॉलॉजीला मंजुरी

SPPU Decisions | विद्यार्थी हिताला मोठा दिलासा! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे महत्त्वपूर्ण निर्णय; 19 कोटींच्या गुणवत्ता सुधार योजना

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना शुल्कमाफीला तत्त्वतः मान्यता; OBC वसतिगृह, MSc व्हायरॉलॉजी, परदेशी विद्यापीठांशी करार

रयत समाचार वृत्तसेवा
5 Min Read

पुणे | २५.६ | रयत समाचार (पंकज गुंदेचा यांच्याकडून)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या काल ता.२४ रोजी झालेल्या (SPPU Decisions) बैठकीत विद्यार्थी हित, सामाजिक न्याय, आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्य, संशोधन विस्तार आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देणारे अनेक महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. विद्यापीठाच्या सर्वसमावेशक आणि विद्यार्थीकेंद्रित धोरणाची स्पष्ट झलक या निर्णयांतून दिसून आली असून, विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण, संशोधन, कौशल्यविकास आणि सुरक्षेच्या दृष्टीने नवे मार्ग खुले होणार आहेत.

 

व्यवस्थापन परिषदेत रशियातील मॉस्को येथील रशियन पीपल्स फ्रेंडशिप युनिव्हर्सिटी (RUDN), जर्मनीतील बायरॉईथ विद्यापीठ आणि युनायटेड किंग्डममधील ससेक्स विद्यापीठ यांच्यासोबत शैक्षणिक, संशोधन आणि विद्यार्थी देवाणघेवाण कार्यक्रमांसाठी सामंजस्य करारांना मान्यता देण्यात आली. (SPPU Decisions) या करारांमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थी, संशोधक आणि प्राध्यापकांना जागतिक दर्जाच्या शैक्षणिक व संशोधन संधी उपलब्ध होणार आहेत.

 

- Advertisement -
 (SPPU Decisions) भारतीय ज्ञानपरंपरा आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाला चालना देण्यासाठी पुण्यातील श्री सद्गुरू समूहाच्या सहकार्याने भारतीय भाषा आणि भारतीय ज्ञान प्रणाली केंद्र तसेच भारतीय जीवनशैली आणि मूल्य शिक्षण या उपक्रमांच्या अंमलबजावणीसही मंजुरी देण्यात आली. नव्या शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर भारतीय ज्ञानव्यवस्थेला आधुनिक शिक्षणाशी जोडण्याचा हा प्रयत्न महत्त्वाचा मानला जात आहे.

 

तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख आणि कौशल्याधारित शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी एड्युलॅब एज्युकेशन एक्स्चेंज प्रा. लि. यांच्या सहकार्याने विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागामार्फत विविध प्रमाणपत्र आणि पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. उद्योगस्नेही शिक्षण, रोजगारक्षम कौशल्ये आणि नवतंत्रज्ञानातील प्रशिक्षण यामुळे विद्यार्थ्यांना करिअरच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

 

जैवतंत्रज्ञान आणि विषाणूशास्त्र या क्षेत्रांतील वाढत्या गरजांचा विचार करून पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (National Institute of Virology) यांच्या सहकार्याने विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागात एम.एस्सी. (व्हायरॉलॉजी) हा विशेष पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासही मान्यता देण्यात आली. यामुळे संसर्गजन्य आजार, सार्वजनिक आरोग्य आणि संशोधन या क्षेत्रांत विशेष प्रावीण्य मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

 

विद्यार्थी हित आणि सामाजिक न्यायाला प्राधान्य : व्यवस्थापन परिषदेत विद्यार्थी कल्याणाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. अहिल्यानगर उपकेंद्रात इतर मागासवर्गीय (OBC) विद्यार्थ्यांसाठी नवीन वसतिगृह उभारण्यास मंजुरी देण्यात आली. ग्रामीण आणि सामाजिकदृष्ट्या मागास घटकांतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आवश्यक निवास सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
याचबरोबर, तृतीयपंथीय विद्यार्थ्यांकडून कोणतेही शैक्षणिक शुल्क न आकारण्यास तत्त्वतः मान्यता देण्यात आली. उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात तृतीयपंथीय विद्यार्थ्यांचा सन्मानपूर्वक आणि सशक्त सहभाग वाढवण्यासाठी हा निर्णय सामाजिक न्यायाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणारा आहे.

 

विद्यार्थी सुरक्षा, ग्रंथसंपदा संरक्षण आणि आपत्कालीन सहाय्य : विद्यापीठाच्या समृद्ध ज्ञानसंपदेचे जतन करण्यासाठी जयकर ग्रंथालयाच्या विमा पॉलिसीच्या नूतनीकरणास मंजुरी देण्यात आली. दुर्मिळ ग्रंथ, हस्तलिखिते आणि संशोधन साहित्य सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
तसेच विद्यार्थी अपघात सुरक्षा विमा योजनेच्या कराराचे नूतनीकरण करण्यास मंजुरी देण्यात आली. या योजनेचा लाभ विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना मिळणार असून, अपघाती घटनांमध्ये आर्थिक संरक्षण आणि मदत मिळण्याचा मार्ग अधिक मजबूत होणार आहे. याशिवाय विद्यार्थी विकास मंडळाच्या विद्यार्थी सुरक्षा विमा योजना आणि विद्यार्थ्यांना आपत्कालीन सहाय्य या अर्थशीर्षांतील तरतुदीत वाढ करण्याचाही निर्णय घेण्यात आला.

 

2026-27 साठी 19 कोटींच्या गुणवत्ता सुधार योजनांना मान्यता : व्यवस्थापन परिषदेत विद्यापीठ गुणवत्ता सुधार योजना 2026-27 अंतर्गत 19 कोटी रुपयांच्या अनुदान वाटपास मान्यता देण्यात आली. या निधीतून संलग्न महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त परिसंस्थांमध्ये विविध विकासकामे आणि शैक्षणिक उपक्रम राबवले जाणार आहेत.

 

या योजनांमध्ये प्रामुख्याने परीक्षा कामकाजासाठी CCTV खरेदी अर्थसहाय्य योजना. नियमित अभ्यास मंडळ कार्यशाळा आयोजनासाठी अर्थसहाय्य. NEP 2020 अभ्यासक्रम आढावा आणि पदवीच्या चौथ्या वर्षाच्या तयारीसाठी कार्यशाळा. विद्यार्थी परिसंवाद आणि कार्यशाळा योजना. इंटर्नशिप कार्यशाळांसाठी अर्थसहाय्य. अमली पदार्थविरोधी जनजागृती व कार्यशाळा योजना. संलग्न महाविद्यालयांमध्ये सोलर सिस्टिम बसवण्यासाठी अर्थसहाय्य योजना यांचा समावेश आहे.
या योजनांमुळे महाविद्यालयीन शिक्षणाची गुणवत्ता, परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता, कौशल्यविकास, रोजगाराभिमुखता, पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.
दूरगामी परिणाम करणारे निर्णय : विद्यार्थी कल्याण, सामाजिक न्याय, आंतरराष्ट्रीय सहकार्य, संशोधन आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण या सर्व क्षेत्रांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला अधिक सक्षम, प्रगत आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मक बनविण्याच्या दृष्टीने व्यवस्थापन परिषदेत मंजूर झालेले हे निर्णय महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारे ठरणार असल्याची भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली.

 

- Advertisement -
SPPU व्यवस्थापन परिषदेचे ठळक ठराव :  RUDN, बायरॉईथ आणि ससेक्स विद्यापीठांशी शैक्षणिक करारांना मंजुरी. भारतीय भाषा, भारतीय ज्ञान प्रणाली आणि मूल्य शिक्षण उपक्रमांना मान्यता. एड्युलॅबच्या सहकार्याने तंत्रज्ञानाधारित अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या सहकार्याने MSc व्हायरॉलॉजी अभ्यासक्रमाला मंजुरी. अहिल्यानगर उपकेंद्रात OBC विद्यार्थ्यांसाठी नवीन वसतिगृह. तृतीयपंथीय विद्यार्थ्यांसाठी शुल्कमाफीला तत्त्वतः मान्यता. जयकर ग्रंथालय विमा पॉलिसी नूतनीकरणास मंजुरी. विद्यार्थी अपघात सुरक्षा विमा योजना आणि आपत्कालीन सहाय्यात वाढ. 2026-27 साठी 19 कोटींच्या गुणवत्ता सुधार योजनांना हिरवा कंदील.

India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading