Bhausaheb Firodia Jayanti: शिक्षणमहर्षी भाऊसाहेब फिरोदिया यांची 141 वी जयंती साजरी

Bhausaheb Firodia Jayanti: शिक्षणमहर्षी भाऊसाहेब फिरोदिया यांची १४१ वी जयंती साजरी; इतिहासप्रेमी मंडळाचा पुढाकार

rayatsamachar
5 Min Read
Subeditor | Dipak Shirsath

अहमदनगर | १२.११ | रयत समाचार

Bhausaheb Firodia Jayanti: येथील अहमदनगर इतिहासप्रेमी मंडळाच्यावतीने ज्येष्ठ शिक्षणमहर्षी कुंदनमल सोभाचंद तथा भाऊसाहेब फिरोदिया यांची १४१ वी जयंती अभिवादन करून साजरी करण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष आसिफखान दुलेखान, सचिव तथा फिरोदिया शाळेचे माजी विद्यार्थी इंजि. अभिजित एकनाथ वाघ आणि भैरवनाथ वाकळे यांनी ऐतिहासिक मेनहॉल इमारतीवरील भाऊसाहेब फिरोदिया यांच्या भित्तिचित्राला गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी इंजि. अभिजित वाघ यांनी कै. भाऊसाहेब फिरोदिया यांच्या जीवनकार्याची सविस्तर माहिती दिली.

इंजि. वाघ यांनी सांगितले की, या शाळेचा मी माजी विद्यार्थी असल्याचा मला अभिमन आहे. भाऊसाहेब फिरोदिया शिक्षण, समाजकारण आणि राजकारणाचा समन्वय साधणारे व्यक्तिमत्त्व होते. भाऊसाहेब फिरोदिया यांचा जन्म १२ नोव्हेंबर १८८५ रोजी अहमदनगर येथे झाला. त्यांचे माध्यमिक शिक्षण अहमदनगरच्या सोसायटी हायस्कूलमध्ये झाले. पुढे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी बी.ए.ची पदवी मिळविली आणि मुंबईच्या लॉ कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणानंतर त्यांनी अहमदनगर येथे वकिली व्यवसायास प्रारंभ केला. सचोटी, बुद्धिमत्ता, मेहनत आणि सौजन्यशील स्वभावामुळे त्यांनी अल्पावधीतच समाजात प्रतिष्ठा मिळविली.

Bhausaheb Firodia

ते पुढे म्हणले, पुण्यात शिक्षण घेताना भाऊसाहेबांनी अभ्यासाबरोबरच खेळ, टेनिस आणि तालमीची आवड जोपासली. राष्ट्रीय विचारांच्या विद्यार्थ्यांच्या सहवासातून त्यांच्यात राष्ट्रप्रेम आणि सार्वजनिक जीवनात कार्य करण्याची प्रेरणा निर्माण झाली.
अध्यक्ष असिफखान यांनी सांगितले, स्वातंत्र्यलढा आणि राजकीय योगदान फार मोठे होते. भाऊसाहेबांनी १९१७ मध्ये अहमदनगर म्युनिसिपालिटीच्या निवडणुकीत विजय मिळवून सार्वजनिक जीवनात सक्रिय प्रवेश केला. जवळपास वीस वर्षे त्यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून शहराची सेवा केली. सॅनिटरी, बिल्डिंग, मॅनेजिंग आणि स्टँडिंग कमिटीच्या अध्यक्षपदांसह विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. २१ फेब्रुवारी १९४० रोजी त्यांची अहमदनगर नगरपालिकेच्या अध्यक्षपदी निवड झाली.
असिफखान यांनी पुढो माहिती देताना सांगितले, १९३७ मध्ये काँग्रेसच्या उमेदवारीवर ते मुंबई असेंब्लीवर निवडून गेले. दुसऱ्या महायुद्धात भारतीय जनतेला विश्वासात न घेता ब्रिटिश सरकारने भारताला युद्धात सहभागी केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेला अनुसरून त्यांनीही राजीनामा दिला. १९४१ मध्ये युद्धाला काँग्रेसचा पाठिंबा नसल्याचे प्रतिज्ञापत्र जाहीर सभेत वाचण्याच्या सत्याग्रहासाठी त्यांनी नगरपालिकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. या सत्याग्रहामुळे त्यांना एक वर्ष कारावास भोगावा लागला. १९४६ मध्ये ते पुन्हा मुंबई विधिमंडळावर निवडून आले. त्यानंतर मुंबई विधिमंडळाच्या सभापतीपदाची जबाबदारी त्यांनी पाच वर्षे सांभाळली. कायद्याचे सखोल ज्ञान, विस्तृत वाचन, धीरगंभीर स्वभाव, साधी राहणी आणि सहिष्णू वृत्ती यांमुळे त्यांनी सभागृहात लोकशाही मूल्यांना पोषक वातावरण निर्माण केले.

Bhausaheb Firodia

- Advertisement -
भैरवनाथ वाकळे यांनी भाऊसाहेब फिरोदिया यांची माहिती देताना सांगितले, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात भाऊसाहेब फिरोदिया यांचे भरीव योगदान होते. त्यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान विशेष उल्लेखनीय आहे. अहमदनगर एज्युकेशन सोसायटीमध्ये त्यांनी १९३८ ते १९४१ या काळात सचिव, १९४८ ते १९५० या काळात उपाध्यक्ष आणि १९५० ते १९६५ या काळात अध्यक्ष म्हणून काम केले. संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
वाकळे पुढे म्हणाले, त्यांच्या स्मरणार्थ अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलला ‘भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल’ असे नाव देण्यात आले. १ जुलै १९७३ रोजी अच्युतराव पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात शाळेचे हे नामकरण करण्यात आले. त्यांच्या सुपुत्रांनी शाळेच्या नावासाठी संस्थेला एक लाख अकरा हजार रुपयांची देणगीही दिली होती. शिक्षणाबरोबरच सहकार, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांनी मोलाचे कार्य केले. १९३० ते १९४२ या काळात ते अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष होते. त्यांच्या कारकिर्दीत बँकेची प्रगती झाली आणि बँकेची भव्य इमारत उभारण्यात आली. गोरक्षणासाठी कार्यरत असलेल्या पांजरापोळ संस्थेचे त्यांनी सुमारे वीस वर्षे सचिवपद सांभाळले. ‘देशबंधू’ आणि ‘संघशक्ती’ या साप्ताहिकांच्या संपादकीय कार्यातही त्यांचा सहभाग होता.

Bhausaheb Firodia

अधिक माहिती देताना इंजि. अभिजीत वाघ यांनी सांगितले, अहमदनगर वाचनालयाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. महाराष्ट्र साहित्य संमेलन आणि ग्रंथालय-वाचनालय परिषद यांच्या आयोजनातही त्यांचा सहभाग होता. अहमदनगर राष्ट्रीय पाठशाळा, जिल्हा काँग्रेस कमिटी आणि जिल्हा लोकल बोर्ड अशा विविध संस्थांमध्ये त्यांनी कार्य केले. वयाच्या एकसष्टाव्या वर्षी त्यांनी ६१ हजार रुपयांचा ट्रस्ट स्थापन केला. या ट्रस्टच्या व्याजातून नगर शहर आणि जिल्ह्यातील गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळण्याची व्यवस्था केली.

Bhausaheb Firodia

भाऊसाहेब फिरोदिया हे अहिल्यानगरच्या शैक्षणिक आणि सामाजिक इतिहासातील महत्त्वपूर्ण वारसा आहेत. वकिली व्यवसाय, स्वातंत्र्यलढा, नगरपालिका प्रशासन, विधिमंडळाचे सभापतीपद, सहकार, सामाजिक कार्य आणि शिक्षणसंस्थांचे नेतृत्व अशा विविध क्षेत्रांत भाऊसाहेब फिरोदिया यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. त्यांचे जीवनकार्य अहिल्यानगरच्या सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक इतिहासाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यांच्या कार्याचे स्मरण करणे आणि नव्या पिढीपर्यंत त्यांचा प्रेरणादायी वारसा पोहोचविणे आवश्यक असल्याची भावना इतिहासप्रेमी मंडळाच्या सदस्यांनी यावेळी व्यक्त करण्यात आली.

हे हि वाचा :   सावित्रीबाईंच्या शैक्षणिक वारशाची शाळा वाचवा! सिंथिया फॅरार ते क्लेरा ब्रुस : अहिल्यानगरच्या ऐतिहासिक मुलींच्या शाळेचे भवितव्य काय? ऐतिहासिक शाळेला ‘आदर्श मॉडेल स्कूल’ चा दर्जा द्या


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading